Commonwealth Games-India makes historical impact

झंडा उंचा रहे हमारा

नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने दैदीप्यमान कामगिरी केली. २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान इंग्लंड मधील बर्मिंगहॅम येथे रंगलेल्या बारा दिवसांच्या या स्पर्धेत भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदके जिंकत एकूण ६१ पदकांची लयलूट केली. चार वर्षांपूर्वी गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे भारताने ६६ पदके जिंकली होती. यात १६ पदके ज्या खेळात भारताने जिंकली त्या नेमबाजीचा मात्र यावेळेस स्पर्धेत समावेश नव्हता. त्यामुळे भारताची पदकसंख्या कमी होईल हे अपेक्षित होतं. यामुळेच भारत आपली अपेक्षित पदकसंख्या वाढवण्यासाठी कुस्तीवर अवलंबून होता आणि कुस्तीगीरांनीही आपल्याला निराश केले नाही.

राष्ट्रकुल समूह म्हणजे अशा देशांचा समूह ज्यांच्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं. त्यामुळे एकूण ७२ सदस्य संख्या असलेला हा गट सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय गटांपैकी एक आहे. अर्थात इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड ही चारही ब्रिटिश राज्ये या स्पर्धेत वेगवेगळे संघ म्हणून भाग घेतात. या समूहातील कॅनडा, कॅमेरून आणि मॉरिशस या देशांवर ब्रिटिशांसोबत फ्रेंचांनीही राज्य केलं होतं; पण या तीनही देशांनी राष्ट्रकुल समूहात राहणे पसंत केले आहे. वीस वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात २८० सुवर्णपदकांसाठी जवळजवळ ४००० पेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेऊन क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

भारताचे पथकाचे खातं उघडलं ते सांगलीच्या संकेत महादेव सरगर या वेटलिफ्टरने. ५५ किलो वजनी गटात स्नॅच आणि क्लीन अँड जर्क यात एकूण २४८ किलो वजन उचलत त्याने रौप्य पदक जिंकले. भारताची प्रसिद्ध वेटलिफ्टर टोकियो ऑलिंपिक मधील रौप्यपदकाची मानकरी असलेली मीराबाई चानू हिने एकूण २०१ किलो वजनभार उचलत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या मीराबाईने यंदाही सुवर्णपदकाची पुनरावृत्ती करताना स्पर्धा विक्रम तर केलाच; पण त्याबरोबर रौप्य पदक विजेतीपेक्षा २९ किलो जास्त वजन उचलले.

पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात जेरेमी लालरिंगनुंगा याने आणि ७३ किलो वजनी गटात अचिंता शेऊली याने सुवर्णपदके मिळवली. जेरेमीने ३०० किलो आणि अचिंताने ३१३ किलो भार उचलत आपापल्या गटात स्पर्धा विक्रम नोंदवले. संकेत सरगर आणि बिंदिया राणी यांची सुवर्णपदके केवळ एक किलोने हुकली. पुरुषांच्या ५५ किलो गटात मलेशियाच्या वेटलिफ्टरने २४९ किलो वजन उचलत २४८ किलो वजन उचलणाऱ्या संकेतला रौप्य पदकावर ढकलले. याचीच पुनरावृत्ती महिलांच्या ५५ किलो वजनी गटातही झाली. नायजेरियन वेटलिफ्टरने २०३ किलो वजन उचलत २०२ किलो वजन उचलणाऱ्या बिंदीयाराणीवर मात केली. वेटलिफ्टिंगमध्ये ३७ देशातील १७४ (९० पुरुष आणि ८४ महिला) खेळाडूंनी आठ पुरुष आणि आठ महिला वजन गटात भाग घेतला. भारताने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकत वेटलिफ्टिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले.

पण या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली ती भारतीय मल्लांनी. पुरुष आणि महिला वर्गाच्या बारा गटात प्रत्येक भारतीयाने पदक जिंकले. कुस्तीत सहा सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्यपदकांसह एकूण १२ पदके जिंकणाऱ्या कुस्तीगीरांनी भारताला पदकतालिकेत अव्वल पाच क्रमांकात आणले. ५७ किलो वजनी गटात टोकियो ऑलिंपिकमधील रौप्य पदक विजेत्या रवी दहीया याने अपेक्षेप्रमाणे बर्मिंगहॅमला सुवर्णगवसणी घातली. ६५ किलो गटात भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनिया याने २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील आपली विजयी परंपरा कायम राखत सुवर्णपदक जिंकले. देशासाठी मिळवलेले प्रत्येक पदक हे खासच असते असे म्हणणाऱ्या बजरंगची पूर्ण नजर २०२४ च्या ऑलिंपिक सुवर्ण पदकावर असेल हे नक्की. १९ वर्षीय नवीन मलिक याने ७४ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद ताहीर चा ९-० असा पाडाव करत आपले पहिलेच आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकले. अपेक्षेप्रमाणे ८६ किलो वजनी गटात दीपक पुनिया याने पाकिस्तानच्या मोहम्मद इनाम ला ३-० असे हरवून सुवर्णवेध घेतला. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात विनेश फोगट हिने अक्षरशः कमाल केली. साखळी पद्धतीने झालेल्या या गटवार स्पर्धेत विनेशने दोघींना चीतपट केले तर नायजेरियन कुस्तीगीर चीतपट होता होता राहिली. राष्ट्रकुल, एशियाड, आशियाई आणि जागतिक स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या विनेशकडून भारतीयांना आता ऑलिंपिक पदकाची अपेक्षा आहे. २०१६ रिओ ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिक ने बर्मिंगहॅम येथे ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घालून टीकाकारांची तोंडं बंद केली. साक्षीचा धडाका एवढा जबरदस्त होता की उपांत्य फेरीत तिने कॅमरूनच्या प्रतिस्पर्ध्याला १०-० असे सपशेल हरवले; तर उपांत्यपूर्व आणि अंतिम फेरीत तिने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चीतपट केले.

महिला ५७ किलो वजनी गटात अंतिम फेरीत नायजेरियाच्या ओडूनायो समोर अंशू मलिक ची डाळ शिजली नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्रिक करणाऱ्या या नायजेरियन कुस्तीपटूविरुद्ध गुणांवर पराभूत होणाऱ्या अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दीपक नेहरा (९७ किलो), मोहित ग्रेवाल (१२५ किलो), पूजा गेहलोत (५० किलो), दिव्या काकरान (६८ किलो) आणि पूजा सिहाग (७६ किलो) यांनी भारताच्या खात्यात पाच कांस्यपदकांची भर घातली. प्रत्येक वजनी गटात पदक जिंकणाऱ्या भारतीय कुस्तीगीरांची राष्ट्रकुल स्पर्धेतील ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी.

मुष्टीयुद्धात १६ वजनी गटात (१० पुरुष आणि ६ महिला) एकूण १२ भारतीयांनी भाग घेतला होता. अपेक्षेप्रमाणे अमित पंघल (पुरुष फ्लायवेट) आणि निखत झरीन (महिला लाईट फ्लायवेट) यांनी सुवर्णपदकांवर आपली नावे कोरली. टोकियो ऑलिंपिकमध्ये तत्कालीन विश्व क्रमांक एक असलेल्या अमितकडून सुवर्णपदकाची अपेक्षा संपूर्ण भारताला होती. परंतु उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या अमितने या स्पर्धेत मात्र अव्वल होण्यासाठी आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. अमितने आपल्या सर्व लढती निर्विवादपणे जिंकल्या. विश्वविजेत्या निखत झरीनने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत लाईट फ्लायवेट गटात सुवर्णपदक जिंकताना भारताची या वजनी गटातील दादागिरी कायम राखली. याच वजनी गटात चार वर्षांपूर्वी मेरी कोमने सुवर्ण जिंकले होते. निखतनेही मेरी कोमचा वारसा पुढे चालू ठेवला. महिलांच्या किमान वजनी गटात नीतू घंघस या २१ वर्षीय युवतीने सुवर्ण जिंकून आपली विश्व युवक स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीची पुनरावृत्ती केली.

सुपर हेवी वेट गटात २३ वर्षीय सागर अहलावत याने पदार्पणातच रौप्य पदकाची कमाई केली. मोहम्मद हुसमुद्दीन, रोहित टोकस आणि जास्मिन लांबोरिया यांनी ब्राँझ पदकाला गवसणी घातली. शिव थापा, सुमित, आशिष कुमार आणि संचित यांनी मात्र निराशा केली. परंतु सर्वात धक्कादायक आणि मनाला चटका लावणारा निकाल म्हणजे टोकियो ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेती लवलीना बोर्गोहाईलचा उपांत्यपूर्व फेरीतील पराभव. लाईट मिडलवेट गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या वेल्सच्या रोझी एक्सेल्सने लवलीनाला बर्मिंगहॅमहून रिकाम्या हाती परत पाठवले.

ॲथलेटीक्समध्ये भारताची मोठी परंपरा आहे. मिल्खा सिंग पासून पी. टी. उषा, शायनी विल्सन, अंजू बॉबी जॉर्ज असे दिग्गज भारताने तयार केले आहेत. त्यातच भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने दुखापतीमुळे शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने भारतीय आव्हान कमजोर झाले होते. जमेका, केनिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांचे तगडं आव्हान भारतासमोर होते. तरीही ३८ जणांच्या भारतीय ॲथलेटिक्स चमूने एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य पदके पटकावली. विशेष कौतुक करायला हवं ते महाराष्ट्राच्या अविनाश मुकुंद साबळे याचं. ३००० मीटर स्टीपलचेस या स्पर्धा प्रकारात असलेलं केनियाचं वर्चस्व अविनाशने मोडलं. १९९८ पासून २०१८ पर्यंत या शर्यतीतील तीनही पदके केनियाकडेच होती. याही वर्षी सुवर्ण आणि कांस्यपदक केनियाकडेच गेली. अविनाश लहानपणापासूनच शाळेत जाण्यासाठी जवळजवळ ६ किलोमीटर अंतर चालत किंवा धावत कापत असे. बालपणापासून भारतीय सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बघणारा अविनाश सध्या भारतीय सेनादलात महार रेजिमेंटमध्ये लान्स नायक या पदावर कार्यरत आहे. सलग नऊ स्पर्धांत आपली कामगिरी उंचावत नेताना प्रत्येक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम त्याने सुधारला. बर्मिंगहॅममध्ये केवळ ५० मिलिसेकंदांनी सुवर्ण हूकलेल्या अविनाशकडून भारतीयांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत.

दहा किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत प्रियांका गोस्वामी हिने रौप्य पदक कमावले. लहानपणी जिम्नॅस्टिक्समध्ये रुची घेणाऱ्या या बस कंडक्टरच्या मुलीने ४३ मिनिटे ३८.८३ सेकंदाची वेळ देत आपली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी बर्मिंगहॅम येथे केली. पण ॲथलेटिक्समध्ये भारताची छाप पडली ती पुरुषांच्या तिहेरी उडी या प्रकारात. यात भारताने सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली. एल्डोझ पॉल याने १७.०३ मीटर आणि अब्दुल्ला अबूबकर याने १७.०२ मीटर उडी मारत पहिल्या दोन जागा निश्चित केल्या. प्रवीण चित्रवेलचे कांस्यपदक केवळ तीन मिलिमीटरने हुकले. अन्यथा तिहेरी उडीत तीनही पदके भारताच्या झोळीत आली असती.

लांब उडीत मुरली श्रीशंकर याचे सुवर्ण पदक थोडक्यात हुकले. मुरली श्रीशंकर आणि सुवर्णपदक विजेता बहामाचा नैर्न या दोघांची सर्वोत्तम उडी ८.०८ मीटर होती. त्यामुळे ही बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी त्यांची दुसरी सर्वोत्तम उडी विचारात घेतली गेली. यात बहामाच्या ॲथलीटने बाजी मारली. या व्यतिरिक्त उंच उडीत तेजस्वी शंकर, दहा किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार आणि महिला भालाफेकीत अनू राणी यांनी ब्राँझ पदक कमावले. ॲथलेटिक्समध्ये ५५ सुवर्णपदकांपैकी फक्त एकच सुवर्ण भारत जिंकू शकला यावर भारताने खरोखरच विचार आणि कृती करणे अत्यावश्यक आहे.

आता वळूया अशा खेळाकडे ज्याचा उगम भारतात किंवा ब्रिटिश भारतात झाला तो म्हणजे बॅडमिंटन. बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी सोबत मिश्र सांघिक अशा सहा प्रकारात पदकांची स्पर्धा असते. चीन, कोरिया, इंडोनेशिया, जपान, डेन्मार्क या बॅडमिंटनमधील दादा खेळाडू देशांचा राष्ट्रकुलात समावेश नसल्याने भारताकडून मोठ्या अपेक्षा होत्या आणि भारतीय बॅडमिंटनपटूंनीसुद्धा भरभरून यश मिळवले. पुरुष एकेरीचे सुवर्ण जिंकले २१ वर्षीय युवा लक्ष्य सेन याने खरंतर किदंबी श्रीकांत उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने दोन भारतीयांमध्ये अंतिम सामना होऊ शकला नाही. पण श्रीकांतनेही कांस्यपदक मिळवत ही कमी भरून काढली. भारताची अव्वल दुहेरी जोडी सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत सुवर्णवेध घेतला. या स्पर्धेत दुसरे सीडिंग असलेल्या सात्विक-चिरागने तिसऱ्या सीडेड इंग्लिश जोडीला दोन सरळ गेम्स मध्ये पराभूत करून पोडियमवर सर्वोच्च स्थान पटकावले.

भारताची सर्वोत्तम शटलर पी. व्ही. सिंधू ने अपेक्षेप्रमाणे महिला एकेरीत कॅनडाच्या मिशेल लीचा दोन सरळ गेम्स मध्ये पराभव केला आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले. याअगोदर सिंधूने महिला एकेरीत २०१४ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य आणि २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं होतं. महिला दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने कांस्यपदक मिळवलं. मिश्र दुहेरीत मात्र भारताची पाटी कोरी राहीली.

राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनची सुरुवात झाली ती मिश्र सांघिक स्पर्धेने. १६ संघांची चार गटात विभागणी झाल्यावर प्रत्येक गटातील पहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. बाद फेरीत भारताने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेला ३-० आणि उपांत्य फेरीत सिंगापूरलाही ३-० असे पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत मलेशियाशी भारताची गाठ पडली. वैयक्तिक रँकिंग पाहता दुहेरीच्या तिन्ही प्रकारात मलेशिया भारतापेक्षा सरस असली तरी एकेरीत भारतीय शटलर्स मलेशियन शटलर्सपेक्षा वरचढ होते. तरीही श्रीकांतने आपला एकेरी सामना गमावला. सिंधूने आपली एकेरी लढत जिंकूनही भारताला मलेशियाकडून ३-१ अशी हार पत्करावी लागली. तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके मिळवत भारताने बॅडमिंटनमध्येही अव्वल स्थान पटकावले.

वय वर्ष १६ ते वय वर्ष ३५ हे क्रीडापटूंचे सर्वसाधारण वयोमान असते आणि त्यानंतर ते उतरणीस लागतात असा सर्वसाधारण समज आहे. पण हा समज खोटा ठरवला तो तामिळनाडूच्या अचंत शरद कमल या टेबल टेनिसपटूने. चाळीसाव्या वर्षी शरदने तीन सुवर्ण मिळवून भारताला राष्ट्रकुल टेटेमध्ये अव्वल स्थान मिळवून दिले. शरदने पुरूष सांघिक स्पर्धेत सुवर्ण मिळवताना संपूर्ण स्पर्धेत केवळ अंतिम सामन्यातच सिंगापूरच्या क्लेरेन्स च्यूकडूनच फक्त पराभूत झाला. पण सांघिक स्पर्धेतील त्याचे साथीदार साथियान गुणशेखरन आणि हरमित देसाई यांनी आपले एकेरी आणि दुहेरीचे सामने जिंकत सिंगापूरला ३-१ असे पराभूत केले.

पुरुष एकेरीत (वैयक्तिक) साथियान गुणशेखरनने चुरशीच्या लढतीत इंग्लंडच्या पॉल डिंकहॉलला ४-३ असे हरवून कांस्यपदक जिंकले. नंतर लगेचच झालेल्या अंतिम सामन्यात या स्पर्धेत चौथे सीडिंग मिळालेल्या अचंता शरद कमलने दुसऱ्या सीडेड इंग्लिश खेळाडू लियाम पीचफोर्ड याला ४-१ असे हरवत आपले २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेचे तिसरे सुवर्ण जिंकले. शरदने आपले वैयक्तिक दुसरे सुवर्ण मिश्र दुहेरीत श्रीजा अकुला हिच्या साथीने जिंकले. २४ वर्षीय श्रीजाचे हे पहिलेच राष्ट्रकुल सुवर्ण. भारताचा अव्वल टेटेपटू साथियान गुणशेखरन याला मात्र वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण मिळाले नाही. पुरुष दुहेरीत शरद कमल सोबत खेळताना इंग्लिश जोडी समोर ३-२ अशा चुरशीच्या लढतीत पराभूत झाल्याने साथियान-शरद जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

विशेष कौतुक करावं लागेल ते भावना पटेल आणि सोनलबेन पटेल यांचे. पॅरा टेबल टेनिस मध्ये त्यांनी भारताला सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकून दिलं. पॅरा पॉवरलिफ्टिंग मध्ये पुरुषांच्या हेवी वेट गटात सुधीर कुमार याने १३४.५ किलो भार उचलत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक गळ्यात मिरवले. भारतीयांना तसा अपरिचित असलेला ‘लॉन बॉल’ या खेळात महिला चमूने सुवर्णपदक पटकावून इतिहास घडवला. त्याचबरोबर आम्हीही काही कमी नाही हे दाखवत पुरुष संघाने रौप्य पदक पटकावले. भारतीयांना परिचित असलेला परंतु तेवढा लोकप्रिय नसलेल्या ज्यूडो क्रीडाप्रकारात दोन रौप्य आणि एक कांस्यपदक ज्यूडोकांनी पटकावली. महिला ४८ किलो वजनी गटात सुशीला लिखनाबम हिने आणि ७८ किलो वजनी गटात तुलीका मान हिने रौप्यपदकाची कमाई केली. ६० किलो पुरुषांच्या वजनी गटात विजयकुमार यादव कांस्यपदकापर्यंत मजल मारू शकला. खेळाडूंच्या स्टॅमिनाची परीक्षा घेणारा खेळ म्हणजेच स्क्वॉश. भारताच्या अनुभवी सौरभ घोषाल याने पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकले. हे त्याचे राष्ट्रकुल स्पर्धेतील वैयक्तिक एकेरी स्पर्धेतील पहिलेच पदक होते. त्याचबरोबर सौरभ घोषाल याने आपली मेहुणी आणि क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याची पत्नी दीपिका पल्लिकल हिच्यासोबत मिश्र दुहेरीचे कांस्यपदकही जिंकले.

यंदा प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आणि तोही केवळ महिला टी-20 चा. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने रौप्य पदक जिंकत इतिहास घडवला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय महिलांना २० षटकात १६२ धावांचे आव्हान दिले होते. भारताची सलामी जोडी लवकर गारद झाल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर हल्ला चढवत साडेचौदा षटकात भारताची धावसंख्या ११८ पर्यंत नेली. परंतु त्यानंतर केवळ आठ चेंडूंच्या अंतरात जेमिमा, पूजा वस्त्रकार आणि हरमनप्रीत बाद झाल्यावर सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकला. पराभूत झाल्यावर निराश झालेल्या हरमनप्रीतने हे रौप्य पदक भारतीय महिलांना आणि भारतीय महिला क्रिकेटला स्फूर्ती देईल असे उद्गार काढले.

या बारा दिवसात संपूर्ण भारताचे लक्ष होतं ते आपल्या राष्ट्रीय खेळ हॉकीकडे. पुरुष आणि महिला हॉकी संघांनी भारतीयांना निराश केलं नाही. महिलांनी चुरशीच्या कांस्यपदकाच्या लढतीत न्युझीलंड विरुद्ध पूर्ण वेळेत १-१ बरोबरीनंतर पेनल्टी शूटआउट मध्ये २-१ असा विजय संपादन करून सविता पुनियाच्या संघाने १६ वर्षानंतर भारताला प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक मिळवून दिले. उपांत्य फेरीत तांत्रिक चुकीचा फटका ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारतीयांना बसला. यामुळे वैतागलेल्या भारतीय संघाला भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षक जॅनेक शॉपमन यांनी मार्गदर्शन करताना सल्ला दिला, “तुम्हाला रागवण्याचा, वैतागण्याचा हक्क आहे. पण पुढे चला आणि महत्त्वाच्या कांस्यपदकाच्या लढतीसाठी तयार व्हा.” भारतीय महिला संघाच्या रागाला सकारात्मकतेकडे वळवून प्रशिक्षक शॉपमन यांनी सविता पुनिया आणि कंपनीकडून चांगली कामगिरी करून घेतली. उपांत्य फेरीपर्यंत धडाकेबाज खेळ करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाची अंतिम फेरीत गाठ होती ती जगातील अव्वल क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाशी. १९९८ पासून २०१८ पर्यंत अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतीय संघ चांगली लढत देईल अशी अपेक्षा असताना ऑस्ट्रेलियाने भारताला ७-० अशी धूळ चारली. या मानहानीकारक पराभवाने भारताला जरी रौप्य पदक मिळाले तरी त्याला दुःखाची काळी किनार होती हे मात्र नक्की.

२२ सुवर्ण मिळवत पदकतालिकेत चौथे स्थान मिळवणाऱ्या भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत आजवर २०० पेक्षा अधिक सुवर्णपदके मिळवली आहेत. हे करणारा भारत हा चौथा देश. १९५४ साली सुरू झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आजपर्यंत २०३ सुवर्ण, १९० रौप्य आणि १७० कांस्यपदकांसह एकूण ५६३ पदके मिळवली आहेत. केंद्रीय क्रीडामंत्री श्री अनुराग ठाकूर भारतीय पथकाचे अभिनंदन करताना म्हणाले, “पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम (TOPS) आणि खेलो इंडिया अभियानाअंतर्गत दिलेल्या प्रोत्साहनामुळे खेळाडूंना परदेशी प्रशिक्षक, राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था, खेळाडूंना परदेशी स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी दिलेली संधी यामुळे भारतीय खेळाडूंना हे घवघवीत यश मिळाले. सर्व भारतीय खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत.” राष्ट्रकुल स्पर्धेत आपला दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय चमूची नजर आता हाँगझू येथे २३ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या एशियाड २०२२ वर आणि नंतर २०२४ साली होण्याऱ्या पॅरिस ऑलिंपिक वर असेल. भारतीय संघाचे शतशः अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

©️ आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons