A Chess sensation of India- by Aneesh Date
प्रज्ञानंदची चित्तथरारक कामगिरी
मे २०२२ मध्ये जागतिक बुद्धिबळ विजेत्या मॅग्नस कार्लसनला एक विलक्षण जोरदार धक्का बसला. हा धक्का असा काही होता की , खडबडून जाग्या झालेल्या साऱ्या बुद्धिबळ जगाने विस्मयकारकरित्या डोळे विस्फारून पाहावे. सध्याचा जागतिक बुद्धिबळ विजेत्या मॅग्नस कार्लसनला नमवणारा प्रज्ञानंद रमेशबाबू हा सर्वात लहान वयाचा बुद्धिबळपटू बनला. बऱ्याच जणांना त्याचे हे यश म्हणजे एक प्रकारे फ्ल्यूक असावे असेच वाटले. खुद्द प्रज्ञानंदने या विजयानंतर ‘ अशा प्रकारे मिळवलेला हा विजय मला अपेक्षित नाही ‘ अशी दिलेली प्रतिक्रिया वाचून चक्रावलेल्या साऱ्या जगाची उत्सुकता आणखी ताणली गेली.
लगेच तीन महिन्यांच्या अवधीत जागतिक बुद्धिबळ विजेत्या मॅग्नस कार्लसनला दुसऱ्यांदा नमवत ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने गाठलेले हे मोठे यश म्हणजे आता केवळ योगायोगाचा फ्ल्युक नसल्याचे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.
विलक्षण प्रतिभा लाभलेल्या १६ वर्षांच्या तामिळनाडूच्या प्रज्ञानंद रमेशबाबू या मुलाने बुद्धिबळातील सध्याच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला तीन महिन्यांमध्ये तब्बल दोनदा हरवून एक अचाट अशी दैदिप्यमान कामगिरी करून दाखवली. युरोपमधील चेसेबल मास्टर्स या जागतिक दर्जाच्या मानांकित स्पर्धेत प्रज्ञानंद रमेशबाबू उपविजेता झाला. प्रज्ञानंदने या स्पर्धेत जगातील नंबर एकच्या कार्लसनशिवाय दुसऱ्या नंबरवरील डिंग लिरेनला आणि या स्पर्धेच्या विजेत्याला अंतिम फेरीतीळ दुसऱ्या फेरीत हरवून दाखवले. एवढेच नव्हे तर भारताचा दोन नंबरचा सुपर ग्रँडमास्टर खेळाडू विदित गुजराथी , हॉलंडचा सुपर ग्रँडमास्टर अनिश गिरी यांना देखील चिकाटीने खेळून हरवले. या स्पर्धेनंतर विजेत्या डिंग लिरेनने प्रज्ञानंदचे कौतुक करून त्याच्यामध्ये भविष्यात सुपर ग्रँडमास्टर खेळाडू बनण्याची क्षमता असल्याचे मत प्रांजळपणे व्यक्त केले.
प्रज्ञानंदचे हे यश खरोखर मोठे कौतुकास्पद म्हटले पाहिजे कारण त्याला या स्पर्धेदरम्यान खेळताना अकरावीच्या बोर्ड परीक्षेची मसनिक तयारी करावी लागली. भारतीय वेळेनुसार रात्री उशीरापर्यंत ऑनलाईन स्पर्धेतील सामने खेळून हा पठ्ठ्या दुसऱ्या दिवशी सकाळी न चुकता बोर्डाच्या परीक्षेला हजर राहिला. बुद्धिबळातील ग्रँडमास्टर दर्जाच्या या मुलाला स्पर्धेबरोबर साधी अकरावीची बोर्ड परीक्षा दयावी लागणे ही गोष्ट मोठी लाजिरवाणी आणि नामुष्कीची म्हटली पाहिजे. बोर्डाच्या परीक्षेचा ताण नसता तर ही स्पर्धा जिंकू शकलो असतो असे खुद्द प्रज्ञानंदने स्पर्धेनंतर दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवले.
एरव्ही क्रिकेटला नको इतके डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या या देशात बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धांमधून भारतीय मुले गेल्या काही वर्षांत विलक्षण थरारक कामगिरी करून दाखवत आहेत. इतका की येत्या २८ जुलै ते १० ऑगस्ट २०२२ या कालावधीत चेन्नईमध्ये जागतिक चेस ऑलिंपियाड स्पर्धा होणार असून अशी जागतिक स्तरावरील चेस ऑलिंपियाड स्पर्धा भारतात पहिल्यांदाच होत आहे. या स्पर्धेत भारताने गेल्या वेळी २०२० मध्ये रशियन संघाच्या जोडीने प्रथमच सुवर्णपदकाला गवसणी घातली. २०१४ मध्ये ट्रॉम्सो चेस ऑलिंपियाड स्पर्धेत भारतीय पुरुषांच्या संघाने ब्रॉन्झ पदक पटकावले. २०२१ साली महिलांच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय संघाने ब्रॉन्क्स पदक जिंकण्याचा पराक्रम केला. यंदाच्या जागतिक चेस ऑलिंपियाड स्पर्धेत भारताने दोन्ही पुरुष आणि महिला विभागात दोन संघ खेळवण्याचे निश्चित केले असून आता अनुभवी ग्रँडमास्टर्सच्या मार्गदर्शनाखाली जोरदार पूर्वतयारी सुरु आहे.
खुल्या गटातील भारतीय पुरुषांच्या अ संघामध्ये विदित गुजराथी , पेंड्याला हरिकृष्ण ,अर्जुन इरिगैसी ,सुनीलदयुत नारायणन आणि कृष्णन शशीकिरण या ग्रँडमास्टर खेळाडूंचा समावेश आहे. तर खुल्या गटातील ब संघातून निहाल सरीन , दोमाराजू गुकेश , भास्करन अधिबन , प्रज्ञानंद रमेशबाबू आणि रौनक साधवानी या दुसऱ्या ताकदवान ग्रँडमास्टर्स फळीचा समावेश आहे.
खुल्या गटातील भारतीय महिलांच्या अ संघामध्ये कोनेरू हंपी , द्रोणवल्ली हारिका , वैशाली रमेशबाबू , तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णीचा समावेश आहे. पैकी कोनेरू हंपी , द्रोणवल्ली हारिका या खुल्या जागतिक गटातील ग्रँडमास्टर्स असून इतर तिघी जणी महिला ग्रँडमास्टर्स आहेत. भारतीय महिलांच्या ब संघामध्ये वंतिका अगरवाल , सौम्या स्वामिनाथन , मेरी ॲन गोम्स , पद्मिनी राऊत आणि दिव्या देशमुख यांचा समावेश आहे. ब संघामधील या सर्व जणी महिला ग्रँडमास्टर्स आहेत.पैकी प्रज्ञानंद आणि वैशाली ही बंधू भगिनीची जोडी प्रथमच एकत्रपणे या चेस ऑलींपियाड स्पर्धेत खेळत आहे.
पुण्याचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे हे महिलांच्या पहिल्या संघाचे प्रशिक्षक असून नागपूरचे ग्रँडमास्टर स्वप्नील धोपडे हे दुसऱ्या संघाचे प्रशिक्षक आहेत.
थोडक्यात भारताचे चारी संघ ग्रँडमास्टर्स आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अनुभवी खेळाडू ग्रँडमास्टर्स दर्जाचे असून त्यांच्याकडून घरच्या पटावर आता मोठी कामगिरी अपेक्षित आहे.
बुद्धिबळाच्या खेळाचा उगम आणि प्रसार आपल्या देशातून झाला. १९८८ साली विश्वनाथन आनंदने भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनण्याचा पराक्रम केल्यावर गेल्या ३४ वर्षांमध्ये आज भारताचे तब्बल ७२ ग्रॅण्डमास्टर्स खेळाडू झाले आहेत. या ७२ खेळाडूंमध्ये तब्बल २४ ग्रॅण्डमास्टर्स एकट्या तामिळनाडूचे आहेत. यामागे भारताचा पहिला इंटरनॅशनल मास्टर मॅन्युएल एरन यांचे अत्यंत मोलाचे विशेष श्रम आहेत.
तामिळनाडूचा विशी आनंद जेव्हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर झाला. तेव्हा त्याच्या उदाहरणावरून स्फूर्ती घेत, चिकाटीने पाठपुरावा करत त्यांनी केलेल्या बहुमोल सूचनेचा तामिळनाडू सरकारने विचार केला. त्यानंतर तामिळनाडू राज्यात सर्वत्र बुद्धिबळ खेळाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात अभ्यासासाठी आणि मुलांच्या सर्वांगीण तसेच बौद्धिक विकासासाठी केला. त्याचा परिणाम असा घडला की तामिळनाडूमध्ये या खेळाचा खूप झपाटयाने प्रसार होत राज्यभर बुद्धिबळ खेळासाठी शालेय पातळीवरून राज्य पातळीपर्यंत स्पर्धात्मक उत्तेजन मिळत गेले. यातून नवनवीन खेळाडू घडत तयार होत गेले. आज याचे मोठे फलित प्रज्ञानंद रमेशबाबूने लहान वयात गाठलेल्या उत्तुंग यशामध्ये दिसते.
दुसऱ्या स्थानावरील पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राकडून प्रत्येकी ८ ग्रँडमास्टर खेळाडू तयार झाले आहेत. शरमेची गोष्ट म्हणजे तीन कोटी लोकसंख्येच्या महामुंबईतून अवघा एक आणि एकच बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे.तो म्हणजे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे.
खरं म्हणजे प्रवीण ठिपसे हे भारताचे पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले असते. ग्रँडमास्टर होण्यासाठी तीन नॉर्मस पूर्ण करावेत लागतात. त्यासाठी लागणारा पहिला नॉर्म पूर्ण करणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते. नंतर कारकिर्दीच्या ऐन उच्च दर्जात्मक भरात असताना ठिपसे अचानक आजारी पडले आणि आजारपणामुळे ते उच्च रेटिंग असणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळू शकले नाहीत. त्यांच्यामागून आलेला विशी आनंद संधी मिळेल तसा भराभर पुढे गेला आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनला हा भाग वेगळा. खेळासाठी सर्व बाबतीत पुरोगामी आणि आधुनिक विचारांना चालना देणाऱ्या महाराष्ट्र राज्याने बुद्धिबळ खेळाचा समावेश आपल्या राज्य शालेय शिक्षणात अभ्यासक्रमात सक्तीने केला पाहिजे.
महाराष्ट्र म्हणजे क्रीडा क्षेत्रातील उगवत्या खेळाडूंची खाण आहे आणि बुद्धीला खुराक पुरवणाऱ्या या खेळाचा समावेश अभ्यासक्रमात केल्यास मराठी मुले नक्कीच देश विदेश पातळीवर चमकतील असा विश्वास वाटतो. काय हो बुद्धिबळाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केलाच पाहिजे का असा प्रश्न कोणी विचारला तर त्याला हो असेच उत्तर आहे. आणि का नाही ? तामिळनाडू राज्याने हे तर सप्रमाण सिद्ध करूनच दाखवले आहे. जर शाळेतील सायन्स आणि मॅथ्स विषयांच्या मूलभूत तयारीतून पुढे दरवर्षी हजारो गुणवान मराठी मुले इंजिनीयर्स , डॉक्टर्स , सी ए , सनदी अधिकारी वगैरे बनत असतील तर शालेय अभ्यासक्रमात बुद्धिबळासारख्या विषयाच्या समावेशाने हजारो मराठी बुद्धिमान मुलांना बौद्धिक कौशल्याला चालना मिळून जागतिक स्तरावर चमकतील की नाही ते बघाच.
ही पोस्ट आपल्या परिचयातील सर्वांना आणि प्रसिद्धी प्रसार माध्यमांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करावी असे आग्रहाने सुचवत आहे.
धन्यवाद.
-अनीश दाते
भ्रमणध्वनी क्रमांक : ९३२४६२३६३०
इ मेल आय डी : dateaneesh@gmail.com