Kapil is much more than 175 against Zimbabwe..

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

६ जानेवारी
ऐंशीच्या दशकात भारतीय जनमानसावर भारुड करणारं नाव कोणतं हे विचारल्यावर कोणताही क्रिकेटप्रेमी एकच नाव घेईल ते म्हणजे कपिल देव निखंज याचं. आज ६ जानेवारी हा कपिलचा वाढदिवस. ६ जानेवारी १९५९ रोजी चंदिगड येथे राजकुमारी आणि रामलाल निखंज यांच्या घरी कपिलचा जन्म झाला. नियोजनबद्ध चंदीगड शहर हे त्या काळी ॲथलेटिक्स आणि हॉकी याकरता प्रसिद्ध होतं. तेथे देशप्रेम आझाद यांच्या प्रशिक्षणात कपिलने मध्यमगती गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीचे धडे गिरवले. यामुळे भारतीयांना एक अद्वितीय असा अष्टपैलू गवसला. 
१६ ऑक्टोबर १९७८ रोजी फैसलाबाद येथे पाकिस्तान विरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले. पहिल्या डावात एकही बळी घेऊन न शकलेल्या कपिलने दुसऱ्या डावात आपल्या हुकमी आउटस्विंगवर सादिक मोहम्मद याचा बळी घेतला. पण कपिलचा झंझावात कराची येथील तिसऱ्या कसोटीत दिसून आला. त्याने ८ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ४८ चेंडूत ५९ धावा फटकावल्या. पण कपिलने भारतीय क्रिकेट रसिकांवर खऱ्या अर्थाने जादू केली ती १९८३ च्या विश्वचषकात. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकात केवळ एकच सामना जिंकणारा भारत हा १९८३ साली कोणाच्याही खिजगणतीत नव्हता. पण कपिलच्या नेतृत्वाखाली भारताने धक्कादायक अशी सुरुवात केली. आपल्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य विंडीजला ३४ धावांनी तर झिम्बाब्वेला पाच गडी राखून पराभूत केले. पण ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्ध पुढच्या सामन्यांत पराभूत झाल्यावर उपांत्य फेरी गाठण्यासाठी उरलेले दोन सामने (झिंबाब्वे आणि ऑस्ट्रेलिया) जिंकणे भाग होते. १८ जून १९८३ या दिवशी झिंबाब्वेविरुद्ध या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची अवस्था ५ बाद १७ अशी झाली. पण सुरुवातीला संयमी फलंदाजी करणाऱ्या कपिलने नंतर आपल्या झंझावती खेळीचा नजराणा पेश केला. ६ उत्तुंग षटकार आणि १६ चौकार ठोकताना केवळ १३८ चेंडूत कपिलने नावात १७५ धावा केल्या. हा एकदिवसीय सामन्यातील तत्कालीन सर्वोच्च धावांचा विक्रम होता. या सामन्यातील विजयामुळे भारताचे मनोधैर्य उंचावले आणि शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ११८ धावांनी पराभूत करून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
उपांत्य फेरीत इंग्लंडवर सहा गडी राखून मात करताना भारताने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत भारताची गाठ विश्वचषक विजयाची हॅट्ट्रिक करण्यास उत्सुक असलेल्या विंडीजशी होती. पण २५ जून १९८३ या दिवशी मात्र कपिलच्या संघाने इतिहास घडवला. केवळ १८३ धावात गारद झाल्यावर भारतीय विजयाची कल्पना करणाऱ्याला कोणीही मुर्खात काढले असते. त्यात रिचर्ड्सच्या झंझावातासमोर भारतीय गोलंदाजी अगदीच हतबल झाली होती. आणि मग आला तो ऐतिहासिक झेल. मदनलालच्या गोलंदाजीवर रिचर्ड्सने मारलेला पूलचा फटका उंच उडाला आणि कपिलने जवळजवळ साठ फूट उलट धावत अप्रतिम झेल घेतला. झेल काय जणू विश्‍वचषक जिंकला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या विजयामुळे भारतात क्रिकेट वृद्धिंगत झालं असंही म्हणायला हरकत नाही. 
१९७०च्या दशकापासून क्रिकेट विश्वात चार महान अष्टपैलूंचा उदय झाला. इमरान, हॅडली, बोथम आणि कपिल. या चौघांनी कसोटीत तीन हजार पेक्षा जास्त धावा आणि तीनशेपेक्षा जास्त बळी घेतले आहेत. या सर्वांमध्ये सर्वाधिक धावा (५२४८) आणि सर्वाधिक बळी (४३४) घेणारा आपला कपिलच. आजही चार हजार पेक्षा जास्त धावा आणि चारशे बळी पेक्षा जास्त बळी घेणारा कपिल हा जगातील एकमेव क्रिकेटपटू. कसोटीत ४३४ बळी घेत कपिलने सर्वाधिक बळींचा विक्रम १९९४ साली केला होता. पद्मभूषण कपिल देव याची १९८३ साली विस्डेन पंचकात तर २०१० साली आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये निवड झाली होती. 
१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेतील झिंबाब्वेविरुध्दच्या सामन्यात कपिल-किरमाणी यांनी नवव्या विकेटकरीता नाबाद १२६ धावांची भागी केली होती. या सामन्याची आठवण सांगताना किरमाणी म्हणतो, “आपण करो या मरो या परिस्थितीत आहोत. मी एकेरी धावा घेतो. तू मोठे फटके मार.” यावर कपिलने आत्मविश्वासाने सांगितले, “किरी आपल्याला ३५ षटके खेळायची आहेत. आपण ठोकून काढू. मी पूर्ण प्रयत्न करेन.” आणि इतिहास घडला.
कपिल देव याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons