Double century and century on Test debut….His birthday today….

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

८ जानेवारी
पदार्पणातील कसोटीत पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतक झळकावणारा एकमेव  कसोटीपटू कोण? लॉरेन्स रो. आज ८ जानेवारी हा त्यांचा वाढदिवस. ८ जानेवारी १९४९ या दिवशी जमेका येथे जन्मलेला हा कृष्णवर्णीय प्रतिभावान फलंदाज आपल्या शैलीदार फलंदाजीमुळे प्रकाशझोतात आला. खरंतर बालपणी ते क्रिकेटपेक्षा फुटबॉल उत्तम खेळायचे. पण वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी आपले पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले. 
न्यूझीलंडविरुद्धची पदार्पणातील मालिका त्यांनी गाजवली. या मालिकेतील चार कसोटीतील सात डावात दोन शतके आणि एक अर्धशतकासह त्यांनी ४१९ धावांची लयलूट केली. त्यानंतरच्या पुढील मोसमात मात्र दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध रो फक्त दोनच कसोटी सामने खेळू शकले आणि १९७३ च्या आगामी इंग्लंड दौऱ्यालाही ते मुकले. तंदुरुस्त झाल्यावर १९७३-७४ साली पाहुण्या इंग्लंडची त्यांनी अक्षरशः पिसे काढली. पाच कसोटीतील सात डावात एक त्रिशतकासह (३०२) त्यांनी ६१६ धावा फटकावल्या. अत्यंत गुणी रो यांची कसोटी कारकीर्द त्यांच्या अप्रतिम फलंदाजी आणि दुखापतीमुळे गाजली. पण त्यांच्या कारकीर्दीचा अंत झाला तो वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामुळे. 
१९७१ च्या भारताच्या विंडीज दौऱ्यात भारतीय कर्णधार अजित वाडेकर यांनी लॉरेन्स रो आणि ऑल्विन कालिचरण यांना सराव सामन्यात पाहताच विंडीजचे भावी सुपरस्टार असे संबोधले. १९७२च्या पदार्पणानंतर रो यांची तुलना जाॅर्ज हेडली आणि डॉन ब्रॅडमन यांच्याशी होऊ लागली होती. यावर रो म्हणतात की दुखापतीमुळे ते मागे पडले. आपले समकालीन संघसहकारी ऑल्विन कालिचरण आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांच्याबद्दल रो म्हणतात, “विव्ह, काली आणि मी फ्रंटफूटवर आणि बॅकफूटवर उत्तम खेळू शकत होतो. विव्हपेक्षा माझ्याकडे नैसर्गिक गुणवत्ता जास्त होती; पण त्याने बरेच काही साध्य केलं. इंग्लंडविरुद्ध त्याची २९१ धावांची खेळी ही सर्वोत्तम होती आणि मला त्याच्यासोबत फलंदाजी करण्याचा बहुमान मिळाला.” 
रो यांच्या फलंदाजीची खासीयत म्हणजे ते चेंडू खेळताना शीळ घालत आणि एवढा वेळ त्यांच्याकडे फटका खेळण्यासाठी असे. पूल आणि हूक हे त्यांचे हुकमी फटके. आपल्या त्रिशतकी खेळीत बाॅब विलीसचा आखूड टप्प्याचा उसळता चेंडू हा त्यांच्या डोक्यापर्यंत उडालेला होता आणि त्या चेंडूवर त्यांनी केलेला पूल हा जमिनीला समांतर असा षटकार गेला होता. जणू काही बॅटमधून मिसाईल सुटल्याचा हा अनुभव होता. १९७४ च्या भारत दौऱ्यावर जाताना लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये संघसहकारी गॅरी अलेक्झांडर यांनी रो यांना मेन्यू कार्ड चेहऱ्याच्या अगदी जवळ धरलेले पाहिले. तपासणीअंती डाव्या डोळ्यावर ‘टेरीगियम’ चे निदान झाले. यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याची नजर कमजोर झाली; पण आपल्या उजव्या डोळ्याच्या उत्तम क्षमतेमुळे पुढे खेळू शकले. 
सबिना पार्क हे रो यांचे आवडते मैदान. या मैदानावर त्यांनी न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध शतके झळकावली. इंग्लंडमध्ये त्यांचा उजवा खांदा निखळला आणि त्यांच्या कसोटी कारकिर्दीची अखेर होण्याचे ते निमित्त होते असे रो यांचे म्हणणे आहे. पण १९८२-८३ चा वादग्रस्त दक्षिण आफ्रिका दौरा ही रो यांच्या क्रिकेट कारकिर्दीची अखेर ठरली. पण रो यांचे यावर मत मात्र वेगळे आहे. ते सुरुवातीला या दौऱ्यावर जाण्यास तयार नव्हते. पण दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना क्रिकेट ही फक्त श्वेतवर्णीय यांची मक्तेदारी नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी हा दौरा केला. परंतु या दौऱ्यानंतर जमेकात येण्याऐवजी सुरक्षेच्या कारणास्तव ते थेट अमेरिकेत गेले आणि तेथेच स्थायिक झाले. लॉरेन्स रो यांनी या दौर्‍याबद्दल पंचवीस वर्षांनी माफी मागितल्यावर २० जून २०११ रोजी सबिना पार्क येथील पॅव्हेलियनला रो यांचे नाव देण्यात आले. तसेच रो यांची पाच सर्वोत्तम जमेकन क्रिकेटपटूंमध्ये जमेका क्रिकेट बोर्डाने निवडही केली. परंतु यानंतर रो यांनी जमेकन क्रिकेट बोर्डाला पाठवलेल्या वकिली नोटिशीमुळे बोर्डाने पॅव्हेलियनला त्यांचे नाव देण्याचा निर्णय मागे घेतला. सर्वोत्तम पाच जमेकन क्रिकेटपटूंपैकी एक असलेले रो यांचे संघसहकारी मायकेल होल्डिंग यांनी लॉरेन्स रो हे त्यांनी पाहिलेले सर्वोत्तम फलंदाज असे गौरवले.
लाॅरेन्स रो यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons