He led Australia to 2 World Cups and 2 Champions Trophy wins.
He led Australia to 2 World Cups and 2 Champions Trophy wins.His birthday today..
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन
१९ डिसेंबर
लागोपाठ दोन वेळा विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा कर्णधार कोण? रिकी पॉंटिंग. आज रिकी पॉंटिंग उर्फ पंटर याचा वाढदिवस. १९ डिसेंबर १९७४ रोजी टास्मानिया येथे जन्मलेला पॉंटिंग आपला पहिला कसोटी सामना खेळला तो एकविसावा वाढदिवसाकरता अकरा दिवस असताना. श्रीलंकेविरुद्ध पदार्पण करताना त्याने ९६ धावा केल्या. त्रयस्थ पाकिस्तानी पंच खिझर हयात यांच्या सदोष पंचगिरीमुळे त्याचे शतक हुकले. ॲक्शन रिप्लेमध्ये चामिंडा वास याचा चेंडू यष्टीवरून जाताना दिसत होता. पण १९९५ साली पदार्पण करणाऱ्या पाँटिंगचे ऑस्ट्रेलियन कसोटी संघातील स्थान पक्क झालेलं नव्हतं. १९९९ साली टेलरच्या निवृत्तीनंतर स्टीव्ह वाॅकडे नेतृत्वाची धुरा आली आणि डॅरेन लीमनच्या अपयशानंतर मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. अर्थात एकदिवसीय सामन्यात मात्र तो ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीचा आधार स्तंभ होता.
१९९६ साली आपला पहिला विश्वचषक खेळणाऱ्या पॉंटिंगने २०११ पर्यंत पाच विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले. १९९९ च्या विजयी ऑस्ट्रेलियन संघातील मुख्य सभासद असलेल्या पॉंटिंगच्या गळ्यात २००२ साली नेतृत्वाची माळ पडली. कर्णधार झाल्यावर त्याची फलंदाजीही बहरली. कर्णधार असताना कसोटीत साडेसहा हजारांपेक्षा जास्त धावा करणाऱ्या पॉंटिंगने एकदिवसीय सामन्यात जवळजवळ साडेआठ हजार धावा कुटल्या. त्याच्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीत २००३ आणि २००७ साली त्याने विश्वचषक जिंकला. एवढंच नव्हे तर २००६ आणि २००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा पॉंटिंग हा एकमेव कर्णधार.
आपल्या कारकीर्दीत १०० सामने जिंकणारा पॉंटिंग हा पहिलाच खेळाडू. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात प्रत्येकी तेरा हजारापेक्षा जास्त धावा करणाऱ्या पॉंटिंगने कसोटीत ४१ तर एकदिवसीय सामन्यात ३० शतके ठोकली आहेत. पण याच पॉंटिंगवर १९९९ साली तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. सिडनीच्या उपनगरातील एका नाईट क्लबमध्ये मद्यप्राशनानंतर झालेल्या झटापटीत त्याचा डोळा काळा निळा पडला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पॉन्टिंगने दारूचा अंमल जास्त झाला होता हे मान्य केले. तसेच या दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी त्याने विशेष परिश्रम घेतले.
२००६ साली विस्डेन पंचकात निवड झालेल्या पाँटिंगला २०१८ साली आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले. निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये प्रथम मुंबई इंडियन्स आणि नंतर दिल्ली डेअरडेव्हिल्स करता प्रशिक्षण देणाऱ्या पॉन्टिंगने २०१७-१८ साली ऑस्ट्रेलिया संघाचे उपप्रशिक्षकपदही सांभाळले होते.
रिकी पाँटिंग याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस