This Wicketkeeper has 400 plus catches in Red and White ball cricket as well

This Wicketkeeper has 400 plus catches in Red and White ball cricket as well. His birthday is today, 14 November.

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

१४ नोव्हेंबर
अष्टपैलू म्हटला की डोळ्यासमोर येतात ते फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकणारे क्रिकेटपटू. पण अष्टपैलू शब्दाची व्याख्या बदलायला लावली ती ॲडम गिलख्रिस्ट या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने. यष्टीरक्षक फलंदाज गिलख्रिस्ट ऊर्फ गिली याचा आज पन्नासावा वाढदिवस. १४ नोव्हेंबर १९७१ रोजी न्यू साउथ वेल्स राज्यात जन्मलेला ॲडम हा स्टॅन  आणि जून गिलख्रिस्ट दाम्पत्याचं शेंडेफळ.
१९९६ साली आपला पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या गिलख्रिस्ट हा तडाखेबंद फलंदाजी आणि उत्तम  यष्टिरक्षणासाठी प्रसिद्ध होता. एकदिवसीय सामन्यात कर्णधार स्टीव्ह वॉ याने गिलख्रिस्टला सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली आणि त्याने त्याचा पूर्ण फायदा घेत ऑस्ट्रेलियाला बऱ्याच झंझावाती सलामी करून दिल्या. एकदिवसीय सामन्यात सलामी करणारा गिलख्रिस्ट कसोटीत सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत असे. 
१९९९ साली ब्रिस्बेन येथे पाकिस्तानविरुद्ध आपली पहिली कसोटी खेळताना पाकिस्तानच्या पहिल्या डावात त्याने तीन झेल घेतले. पाकिस्तानच्या ३६७ धावांसमोर ऑस्ट्रेलियाची दोन बाद ३११ वरून शोएब अख्तरने नव्या चेंडूवर ५ बाद ३४२ अशी अवस्था केली होती. पदार्पण करणाऱ्या गिलख्रिस्टने पाकिस्तानी गोलंदाजीची यथेच्छ धुलाई करत केवळ ८८ चेंडूत १० चौकारांसह ८१ धावा कुटल्या आणि ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत नेले. 
पहिल्या क्रमांकावर असो अथवा सातव्या, हे मात्र मान्य करावेच लागेल की गिलख्रिस्ट हा उत्साहाचा झरा होता. पंचांनी बाद देण्याची वाट न बघता बाद असल्यास स्वतःहून खेळपट्टी सोडणाऱ्या गिलख्रिस्टने कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अतिशय वेगवान द्विशतक झळकावले होते. रॉडनी मार्शप्रमाणे मोठी झेप घेऊन झेल पकडणे किंवा इयान हिलीप्रमाणे यष्टीरक्षणाची चतुराई जरी नसली तरी एक दिवसीय सामन्यात यष्टीमागे ४७२ बळी टिपणाऱ्या गिलख्रिस्टने त्याच्या निवृत्तीपर्यंत सर्वाधिक बळींचा विक्रम केला होता. कसोटीत ४१६ बळी टिपणारा गिलख्रिस्ट हा मार्क बाऊचर नंतरचा दुसरा यष्टीरक्षक. एकदिवसीय सामन्यांच्या एका मालिकेत सर्वाधिक बळी (२७) टिपण्याचा मान हा गिलख्रिस्टकडे आहे. 
२००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर गिलख्रिस्टने किंग्ज XI पंजाब आणि डेक्कन चार्जर्स, हैदराबाद यांसाठी आयपीएल मध्ये प्रतिनिधित्व केले. प्रसिद्ध सांखिकी अनंत नारायणन यांनी सरासरी आणि धावसंख्येनुसार ॲडम गिलख्रिस्ट याला सातव्या क्रमांकावरील कसोटीतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरवले. २००२ साली विस्डेन पंचकाचा मानकरी असलेल्या गिलख्रिस्टचे ‘ट्रू कलर्स’ हे वादग्रस्त आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. भारतातील त्याची लोकप्रियता लक्षात घेत वर्ल्ड व्हिजन ऑस्ट्रेलियाने दारिद्र्य निर्मूलन कार्यासाठी गिलख्रिस्टला सहभागी करून घेतले. गिलख्रिस्टने मुंबईतील घरकाम करणाऱ्या बाईच्या सात वर्षाच्या मुलाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे.
ॲडम गिलख्रिस्ट याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons