This legend cricketer walked almost 900 miles for Leukemia Patients

This legend cricketer walked almost 900 miles for Leukemia Patients and collected about ten million pounfs. His birthday today .

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

२४ नोव्हेंबर


१९७०च्या दशकात चार महान अष्टपैलूंचा क्रिकेट विश्वात उदय झाला. या चारही अष्टपैलूंनी कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजारपेक्षा अधिक धावा आणि तीनशेपेक्षा अधिक बळी मिळवून क्रिकेट जगतात आपला दबदबा निर्माण केला. हे चार अष्टपैलू म्हणजे इयान बोथम, कपिल देव, रिचर्ड हॅडली आणि इमरान खान. आज इंग्लिश अष्टपैलू इयान बोथम याचा वाढदिवस. २४ नोव्हेंबर १९५५ रोजी जन्मलेला इयान बोथम उर्फ बीफी याने प्रथम वेस्ट इंडिज विरुद्ध १९७६ साली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. पण बोथम या सामन्यात आपला ठसा उमटवू शकला नाही.


त्यानंतर १९७७ साली मायदेशात झालेल्या ॲशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर लाभ उठवत त्याने ७४ धावात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गुंडाळला. दोन्ही बाजूला स्विंग करत बोथमने ग्रेग चॅपेल, डग वॉल्टर्स, रॉडनी मार्श, मॅक्स वॉकर आणि जेफ थॉमसन यांना तंबूत धाडले. बोथमच्या गोलंदाजीचा करिष्मा पुढील कसोटीतही कायम राहिला आणि इंग्लंड संघाला एक महान अष्टपैलू क्रिकेटपटू गवसला.


१९८० पर्यंत बोथम इंग्लंडचा मुख्य आधारस्तंभ झाला. यामुळेच १९८० साली कर्णधारपदाची माळ त्याच्या गळ्यात पडली. पण कर्णधारपद बोथमला बिलकूल लाभदायक ठरले नाही. बारा कसोटीत नेतृत्व करणाऱ्या बोथमला चार कसोटीत दणदणीत पराभव स्वीकारावा लागला आणि एकाही कसोटीत विजयाची माळ काही गळ्यात पडली नाही. कर्णधारपदाच्या त्याच्या कारकीर्दीत त्याची वैयक्तिक कामगिरीही खालावली. या बारा कसोटीत केवळ २७६ धावा आणि ३५ बळी अशीच त्याची मिळकत होती. १९८१ च्या ॲशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना इंग्लंड बोथमच्या नेतृत्वाखाली पराभूत झाली; तर दुसऱ्या कसोटीतही बोथमच्या खराब कामगिरीमुळे बोथमने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पण हीच ॲशेस मालिका ‘बोथमची मालिका’ या नावाने प्रसिद्ध आहे. पहिल्या दोन कसोटीत केवळ ३४ धावा आणि सहा बळी घेणाऱ्या बोथमने सहा कसोटींच्या या मालिकेत इंग्लंडला ३-१ असे विजयी केले. उर्वरित चार कसोटीत दोन शतकांसह ३६५ धावा आणि २८ बळी टिपणारा बोथम हा मालिकावीर ठरला. १९८१ आणि १९८२ ही कॅलेंडर वर्षे बोथमला अव्वल अष्टपैलूंच्या यादीत विराजमान करणारी होती. या दोन वर्षात त्याने १७२४ धावा आणि १०९ बळी मिळवले.


१९८६ साली मादक द्रव्यसेवनाने त्याच्यावर दोन महिने बंदी घालण्यात आली. यामुळे भारताविरुद्धची मालिका हुकलेल्या बोथमने न्यूझीलंडविरुद्ध पुनरागमन करताना पहिल्या चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर ब्रुस एडगरला गूचकरवी झेलबाद करवले. यावर आश्चर्यचकित होतो गूचने बोथमला विचारले,” तुझं स्क्रिप्ट लिहितो कोण?” १९८६ साली लिलीचा ३५५ बळींचा विश्वविक्रम मोडून सर्वाधिक कसोटी बळींचा नवा विक्रम त्याने स्वतःच्या नावावर केला.


१९८५ साली टाँटन हॉस्पिटलात ल्युकेमियाग्रस्त मुलाला भेटल्यावर बोथमने त्याच्यासाठी मदत करण्याचे ठरवले. पाच आठवडे ८७४ मैल पायी चालत त्याने पाच लाख पाऊंड त्या मुलाच्या उपचारासाठी जमवले. यानंतर अशा बऱ्याच पदयात्रा करत ल्युकेमिया आणि लिंफोमा या कर्करोगांच्या संशोधनाकरीता बोथमने १.३ कोटी पाउंड ही रक्कम जमा केली. या पदयात्रांमध्ये पुष्कळ वेदना आणि तळपायाला आलेले फोड सहन करताना बोथमने पत्रकारांना सांगितले, “मी या वेदना कधीच विसरू शकत नाही. प्रत्येक ल्युकेमियाग्रस्त बालक वाचलं पाहिजे याची खात्री आपणास करायला हवी आणि बालकांच्या रक्ताच्या कर्करोगाला पराभूत करेपर्यंत मी थांबणार नाही.”
इयान बोथम याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons