This Indian cricketer had scored double hundred in his first Ranji Match but could not play for country.

This Indian cricketer had scored double hundred in his first Ranji Match but could not play for country. His birthday today.

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन
११ नोव्हेंबर

संपूर्ण क्रिकेट विश्वाने गौरवलेल्या परंतु एकही कसोटी न खेळू शकलेल्या अशा गुणी क्रिकेटपटूचा आज वाढदिवस. होय, मी अमोल मुजुमदार या अतिशय गुणी मुंबईकर क्रिकेटपटूबद्दल बोलतोय. आज ११ नोव्हेंबर हा त्याचा वाढदिवस. अमोल हा कसोटी दर्जा प्राप्त असलेल्या कोणत्याही संघात सहज फिट बसू शकेल असा दर्जेदार क्रिकेटपटू मात्र भारतीय क्रिकेट संघातून नेहमीच डावलला गेला. पण त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जग मात्र एका परिपूर्ण फलंदाजास मुकलं.

रणजी सामन्यात त्याचे पदार्पणही अगदी स्वप्नवत झालं. १९९३-९४ च्या मोसमात हरियाणा विरुद्ध पदार्पण करताना त्याने २६० धावा फटकावल्या. रणजी स्पर्धेतील पदार्पणातील सर्वोच्च धावांचा हा विक्रम चोवीस वर्षे अबाधित होता. यानंतर उपांत्य फेरीत महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात नाबाद शतक तर बंगालविरुद्ध अंतिम लढतीत अर्धशतक झळकावत भारतीय संघाचे दार ठोठावण्यास त्याने सुरुवात केली. १९९४ साली मी कलकत्त्याला गेलो असताना बऱ्याच बंगाली क्रिकेट रसिकांनी अमोल मुजुमदार हा बंगाली आहे असाच माझ्याशी वाद घातला होता. यावरून अमोलची लोकप्रियता संपूर्ण भारतभर पसरत होती हेच सिद्ध होते.

१९९३-९४ पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या अमोलने २००७ साली सर्वाधिक रणजी धावांचा विक्रम केला. फलंदाजीचे बाळकडू अमोलला त्याच्या वडिलांकडून म्हणजे अनिल मुजुमदार यांच्याकडून मिळालं. अनिल मुजुमदार हे त्यांच्या काळातील अतिशय तंत्रशुद्ध आणि नामवंत फलंदाज. सिद्धार्थ कॉलेज आणि बँक ऑफ बडोद्यातर्फे खेळलेल्या अनिल यांनी अमोलकडून प्रथम क्रिकेटचे धडे गिरवून घेतले आणि अमोलच्या भक्कम बचावाचा पाया घालून घेतला.

सचिनने १९९६ साली भारतीय कर्णधारपदाची सूत्रे हातात घेतल्यावर अमोलच्या भारतीय संघात वर्णी लागण्याचे वेध सर्वांनाच लागले. परंतु पारस म्हांब्रे, निलेश कुलकर्णी, अजित आगरकर आणि त्यानंतर वासिम जाफर, साईराज बहुतुले, समीर दिघे, रमेश पोवार प्रभृतींची वर्णी भारतीय संघात लागली. परंतु तेव्हाही अमोलसाठी भारतीय कसोटी संघाचं दार मात्र उघडलं गेलं नाही. एक वेळ तर अशीही होती की मुंबईचे अकरापैकी दहाजण हे भारताचे आजी किंवा माजी क्रिकेटपटू होते. बहुधा अमोल हा क्रिकेटमधील राजकारणाचा बळी ठरला.

२००६-०७ साली मुंबईच्या कर्णधारपदी नेमणूक झाल्यावर मुंबईला रणजी करंडक जिंकून देताना त्याने आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवली. परंतु २००९ साली बूचीबाबू करंडक स्पर्धेत मुंबईकडून निवड न झाल्याने अमोलने आसामकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि पुढील पाच वर्षे आसामचे प्रतिनिधित्व केले.

अतिशय सूज्ञ आणि क्रिकेटचे विविध कंगोरे जाणणारा अमोल २०१४ साली निवृत्त झाल्यावर प्रथम समालोचक म्हणून काम करत होता. यानंतर प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणाऱ्या अमोलने नेदरलॅंड्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मार्गदर्शन केले. केवळ राष्ट्रीय संघाकडून न खेळल्याची फार मोठी किंमत अमोलला आजही मोजावी लागत आहे. अमोल सध्या मुंबईच्या मुख्य प्रशिक्षक पदावर आहे.

अमोल मुजुमदार याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

©️आशिष पोतनीस

Show Buttons
Hide Buttons