Shreyas coverts Test Cap from Sunny into Coveted Crown!

Shreyas coverts Test Cap from Sunny into Coveted Crown!

पदार्पणातील मुंबईकर शतकवीर

आज २६ नोव्हेंबर २०२१. न्यूझीलंड गोलंदाज काईल जेमिसन याच्या गोलंदाजीवर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने स्लाईस ड्राईव्ह करत श्रेयस अय्यर याने दोन धावा घेतल्या आणि आपले शतक झळकावले. कसोटी पदार्पणात शतक झळकवणारा श्रेयस अय्यर हा सोळावा भारतीय आणि चौथा मुंबईकर. ग्रीन पार्क, कानपूर येथे कसोटी पदार्पण करताना भारतीय कॅप श्रेयसला मिळाली ते दस्तुरखुद्द लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्याकडून. आज सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रेयस म्हणाला, “सामन्याच्या पहिल्या दिवशी जे काही घडलं त्यामुळे मी खूप खूष झालो. त्यावेळी मला वाटलं की मला खूप चांगली झोप लागेल. पण काल रात्री मला बिलकुल झोप लागली नाही. आज खेळपट्टीवर उतरल्यावर शतक झळकावणे ही माझ्यासाठी सर्वोत्तम घटना होती. गावस्करांनी मला उत्तेजन देताना भूतकाळात न डोकावण्याची तसेच भविष्याची चिंता न करता वर्तमानात राहण्याचा सल्ला दिला.”

मुंबईकर श्रेयस अय्यर याने शिवाजी पार्क जिमखान्यात क्रिकेटचे धडे गिरवले हे माजी कसोटीवीर प्रवीण आमरे याच्याकडून. पदार्पणातील पहिला मुंबईकर शतकवीर आमरेच्या पावलावर पाऊल टाकत श्रेयस अय्यरनेही आपला ठसा उमटवला. या कसोटी अगोदर २१ एकदिवसीय आणि २९ टी-20 सामने खेळलेल्या श्रेयसला प्रवीण आम्रे यांनी खरमरीत सल्ला देताना म्हटलं, “XX काहीही कर. मागील दोन सामन्यात बाहेर बसून दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवत होतास. आता तिथे जाऊन खेळ. लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील.”

पदार्पणात शतक झळकावणारा पहिला मुंबईकर प्रवीण आमरेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दरबान येथे शतक झळकावले. डोनाल्ड, प्रिंगल, मॅकमिलन यांच्या तेज माऱ्याला तोंड देत प्रवीणने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १०३ धावा केल्या. जरी प्रवीण मुंबईकर असला तरी कसोटी पदार्पणात त्यावेळेस तो मुंबईऐवजी रेल्वेकडून रणजी खेळत होता.

पदार्पणात शतक झळकावणारा दुसरा मुंबईकर म्हणजे रोहित शर्मा उर्फ हिटमॅन. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी ईडन गार्डन्स कोलकाता येथे विंडीजविरुद्ध रोहितने शतक झळकावले. कसोटी पदार्पणात रोहित सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. सहाव्या क्रमांकावर पदार्पणातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम (१७७) रोहितच्या नावावर आहे. विंडीज विरुद्ध पदार्पणात शतक झळकावणारा आणखी एक मुंबईकर म्हणजे पृथ्वी शाॅ. भारतातर्फे सर्वात लहान वयात शतक झळकावणाऱ्या पृथ्वीचे पदार्पणाच्या वेळेस वय होते फक्त १७ वर्षे आणि ३२९ दिवस.

या सर्व पदार्पणातील शतकवीर मुंबईकरांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

©️ आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons