This cricketer had pair in first Test but went on to score six double hundreds in 90 Tests

This cricketer had pair in first Test but went on to score six double hundreds in 90 Tests. His birthday today.
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन
२२ नोव्हेंबर
आपण आजवर बऱ्याच फलंदाजांनी कसोटी पदार्पणात शतक झळकावलेले पाहिले व ऐकले असेलच. पण पदार्पणात भोपळ्याची जोडी म्हणजे चष्मा मिळवणारे फलंदाज फारच कमी. कसोटी पदार्पणात असा पराक्रम करणारा पहिला श्रीलंकन फलंदाज मर्व्हन अटापट्टू याचा आज वाढदिवस. २२ नोव्हेंबर १९७० रोजी जन्मलेल्या अटापट्टूची सुरुवात फारच अडखळत किंवा दयनीय म्हणता येईल अशीच होती. पहिल्या तीन कसोटीतील ६ डावात ५ शून्य आणि १ धाव अशी त्याची कमाई होती. ही एक धाव सुद्धा लेग बाय असताना पंचांच्या नजरचुकीने त्याला बहाल झाली होती.
१९९०-९१ ला भारताविरुद्ध पदार्पण करणाऱ्या अटापट्टूला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी जवळजवळ सात वर्षे आणि नऊ कसोटींची वाट पहावी लागली. पण १९९७-९८ चा भारत दौरा अटापट्टूला खूपच फलदायी ठरला. तोपर्यंत नऊ कसोटीतील १७ डावात १०.७० च्या सरासरीने त्याने फक्त १८२ धावाच केल्या होत्या. पण मोहाली कसोटीत आपले पहिले शतक (१०८) झळकावत धावांचा दुष्काळ त्याने संपवला. त्यानंतर वानखेडे येथील कसोटीत त्याचे शतक केवळ दोन धावांनी हुकले.
आपल्या कारकीर्दीत ९० कसोटी खेळणाऱ्या अटापट्टूने सोळा शतके झळकावली. यातील सहा तर द्विशतके होती. पण आपल्या कारकिर्दीबद्दल अटापट्टू म्हणतो, “९० कसोटी खेळलेल्या फलंदाजासाठी ४० ची सरासरी ही नक्कीच चांगली नाही. सहा द्विशतके करूनही कारकिर्दीच्या सुरुवातीला केलेल्या कमी धावसंख्येमुळेच माझी सरासरी खूपच कमी झाली.” याउप्पर अटापट्टू असेही म्हणतो की तुम्ही जेव्हा चांगल्या लयीत असाल तेव्हा धावांची भूक सतत वाढवायला हवी.
पदार्पणात चष्मा मिळवणाऱ्या अटापट्टूने कर्णधार असताना देखील चष्मा मिळवलेला आहे. असं करणारा तो श्रीलंकेचा एकमेव कर्णधार. २६८ एकदिवसीय सामने खेळताना अटापट्टूने साडेआठ हजारावर धावा केल्या आहेत. परंतु टी-20 क्रिकेट हे स्वतःच्या फलंदाजीला पोषक नसल्याची प्रांजळ कबुली तो देतो. एकदिवसीय सामन्यात ११ शतके केलेला अटापट्टू तब्बल ४० वेळा धावचीतही झालेला आहे. २००३ साली एकदिवसीय आणि २००४ साली कसोटी संघाच्या नेतृत्वाची माळ त्याच्या गळ्यात पडली. अतिशय तंत्रशुद्ध आणि आकर्षक अशा या फलंदाजाने क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षकाची भूमिकाही पार पाडली.
मर्व्हन अटापट्टू याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस
Show Buttons
Hide Buttons