He is only Indian who finds a place in Wisden list of top ten greatest test innings !

He is only Indian who finds a place in  Wisden list of top ten  greatest test innings ! His birthday today…

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

१ नोव्हेंबर
स्टीव्ह वॉचा जगज्जेता ऑस्ट्रेलियन संघ सलग १५ कसोटी सामने जिंकत भारतात दाखल झाला आणि मुंबईत १० गडी राखून भारताला पराभूत करून त्यांनी लागोपाठ सोळावा कसोटी विजय नोंदवला. यानंतर आली इडन गार्डन्स,  कोलकाता येथील ती प्रसिद्ध कसोटी. हरभजनने हॅट-ट्रिक घेऊनही ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांचा डोंगर उभा केला होता. पण भारताचा पहिला डाव केवळ १७१ धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियाने भारतावर फॉलोऑन लादला. ही कसोटी आणि पर्यायाने मालिका पराभवाचे सावट भारतावर होते. ४ बाद २३२ या धावसंख्येवरून भारताला या पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढत विजयपथावर नेण्याचे काम केले ते वांगीपुरापू वेंकटसाई लक्ष्मण या कलात्मक फलंदाजाने. आज एक नोव्हेंबर हा त्याचा वाढदिवस. 
११ ते १५ मार्च २००१ या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण करताना लक्ष्मणने द्रविडसोबत ३७६ धावांची भागी करत सतरा वर्षे जुना सुनील गावस्कर यांचा २३६ धावांचा एका डावातील सर्वोच्च भारतीय धावांचा विक्रम मोडला. आपल्या कारकिर्दीत सतरा शतके झळकावणाऱ्या लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा शतके झळकावली आहेत. यातील तीन तर त्याने सिडनी येथे फटकावली आहेत. ऑस्ट्रेलियाने लक्ष्मणचे ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ असे बारसेच केले होते. 
अर्थात हाच लक्ष्मण ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या दिग्विजयातही मोठा अडसर ठरला होता. यावेळी पाँटिंगचा संघ सलग सतरावा विजय मिळवून विश्वविक्रम करण्याच्या तयारीत असताना पर्थ येथे लक्ष्मणने दुसऱ्या डावात सर्वाधिक ७९ धावा करीत ऑस्ट्रेलियाला खडे चारले. शंभरावर कसोटी खेळलेला व्ही व्ही एस् मात्र विश्वचषक स्पर्धेत कधीही खेळू शकलेला नाही. 
२००२ साली विस्डेन पंचकात निवड झालेला लक्ष्मण हा पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराचाही मानकरी आहे. १ नोव्हेंबर १९७४ रोजी हैदराबाद येथे जन्मलेला लक्ष्मण हा भारतीय क्रिकेट वर्तुळात मोहम्मद अझरुद्दीन प्रमाणेच मनगटी फटक्यांसाठी प्रसिद्ध होता. सनरायझर्स हैदराबाद साठी फलंदाजी प्रशिक्षक असलेला लक्ष्मण हा सध्या खुमासदार शैलीत समालोचन करताना दिसतो.
व्ही व्ही एस् लक्ष्मण याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons