Un(like) Pak Sends India Packing !

Un(like) Pak Sends India Packing!

India vs Pakistan

16th Match, Group2 (N), Dubai (DSC), Oct 24 2021,

ICC Men’s T20 World Cup

काल (परत एकदा) संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवले. कुठल्याही क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताला हरवायची ही पहिलीच वेळ होती. माझ्यासारख्या काही जणांना ८० आणि ९०च्या दशकातले दिवस आठवले असतील जेव्हा भारत चांगली टीम असूनदेखील पाकिस्तानकडून शारजामध्ये बऱ्याचदा हरायचा तर काही जणांना भारताचे वर्ल्ड कपमधले जुने विजय आठवले असतील. पण सामान्यपणे बऱ्याच जणांना भारत फक्त आपल्या चुकांमुळे हरला असं वाटलं असेल.

 

गेले काही वर्ष आपण पाकिस्तानच्या विरुद्ध खेळत नाही – आणि देशाच्या दृष्टीने ते बरोबरही आहे. पण त्यामुळे त्यांच्या क्रिकेटविषयी पूर्वी जितकी माहिती असायची तितकी हल्ली सर्वसामान्यांना नसते. एकंदरीतच पाकिस्तानबरोबर सध्या खूप कमी देश खेळतात. त्यात त्यांच्या देशासमोरचे आणि देशातले असंख्य प्रश्न. त्यामुळे कालच भारतीय संघापुढचं आव्हान किती गंभीर आहे ह्याची आपल्या इथे बहुदा नीटशी कल्पनाच नव्हती. त्यात आपल्या देशातील प्रसार माध्यमे “मौका” सारख्या जाहिरातींत गुंतलेली. त्यात IPL ची धुंदी. ह्या सगळ्यामुळे बहुतांश जनतेला काल आपण जिंकणार ह्याची बऱ्याच प्रमाणात खात्रीच होती. आणि त्यामुळे काल आपली गाठ नक्की कशाशी पडली, नक्की काय झालं हेच अजून आपल्या गळी उतरत नाहीये आणि आपण कर्णधार विराट, कोच शास्त्री आणि एकंदरीत भारतीय संघ ह्यांच्या नावाने खडे फोडत बसलो आहोत.

 

पण शांतपणे विचार केला तर जाणवेल की ह्यावेळी क्रेडीट पाकिस्तान टीमला पण द्यायला हवे. देशात इतके प्रश्न, सतत दहशतवादाचे सावट, अर्ध्याहून अधिक जगाने पाठ फिरवलेली. अलीकडेच न्यूझीलंड सारखी टीम आली पण कुठे तरी फट्ट म्हणता ब्रह्महत्या झाली आणि ते निमित्त धरून ती टीम परत निघून गेली. पाकिस्तानच आणि तिथल्या क्रिकेटच काय होईल ह्याची पर्वा न करता! तर, ह्या सगळ्यातून सावरत वर्ल्डकपमध्ये आलेली ही पाकिस्तानची टीम. त्यांच्या देशवासियांना पण कदाचित त्यांच्याकडून फारशा अपेक्षा नसतील.

 

आणि त्यामुळेच काल ह्या टीमला खेळताना बघून, त्यांचा दृष्टीकोन बघून खरच आश्चर्य वाटलं. इतक्या शांतपणे खेळणारी पाकिस्तानी टीम खूप वर्षांनंतर बघायला मिळाली…… इम्रान, जावेद, झहीर, असिफ, मुश्ताकच्या काळानंतर प्रथमच. मध्यंतरी त्यांच्या टीममध्ये talent खूप असायचं पण कुठे तरी गोंधळ, गडबड…. त्यातून एक-दोन रन आउट्स व्हायचे, कधी क्षेत्ररक्षणात नेमक्या निर्णायक क्षणी चुका व्हायच्या, कधी सगळी मारलेली बाजी शेवटच्या क्षणी पलटायची तर कधी सुपर ओव्हर मध्ये गोंधळ व्हायचा. कधी कर्णधाराच्या जांभया, तर कधी जोशात येऊन प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करायची घाई ह्यांत कुठे तरी मोठी गफलत व्हायची आणि हातातली मॅच हरून मोकळे व्हायचे.

 

पण ह्यावेळी तस काही झाल नाही… ना फिल्डिंग करताना, ना बॅटिंग करताना. फिल्डिंग करताना बऱ्याचदा टीमचं वर्तन तर totally un-pakistani होतं. शांतपणे विचारपूर्वक निर्णय घेतले गेले. तेच बॅटिंग करताना. त्यांना डावाच्या सुरुवातीलाच लक्षात आलं की ह्या भारतीय गोलंदाजीत दम नाही. त्यात आपण गोलंदाजीत चुकीच्या वेळी चुकीचे बदल केले आणि पाकिस्तानी ओपनर्सनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. कप्तान बाबर आझमने एकदा हाती आलेली सूत्रे परत प्रतिस्पर्ध्याच्या हातात जाणार नाहीत ह्याची काळजी घेतली.  १४०-१५० ह्या पल्ल्यातले आव्हान बऱ्याचदा फसवं ठरू शकत. ते कठीण पण वाटत नाही आणि तितक सोप पण नसत. किती आणि कधी आक्रमक व्हायचं हे ठरवण मनात संम्रभ निर्माण करू शकत. आणि जर का त्या मानसिक गोंधळात जर एक-दोन विकेट गेल्या तर T20 मध्ये तिथून सावरायला वेळच मिळत नाही. IPL मध्ये असे बरेच सामने मुंबई इंडियन्स किंवा चेन्नई सुपर किंग्स सारख्या चॅम्पियन टीम्सनी खेचून काढले आहेत. पण काल बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान, दोघांनी शेवटपर्यंत उभे राहायचं ह्याचा निर्धार बांधत आपल्या बाजूला झुकलेला सामना परत भारताकडे झुकणार नाही ह्याची खात्री बाळगली.

 

ह्याउलट आपला संघ. काही पूर्वतयारी, प्रतिस्पर्ध्याची बलस्थाने, त्यांचे खेळाडू यांचा काही विचार केल्याचे जाणवतच नव्हते. जसे काही IPL मुळे आपले खेळाडू खूप फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे वर्ल्ड कप साठी इतर काही विशेष तयारीची गरज नाही अशा मनस्थितीत सगळे असल्यासारखे जाणवत होते. जी intensity, जिद्द ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये ताज्या दमाच्या कसोटी संघाने दाखवली होती, तिची कमी जाणवली. खूपच जाणवली.

 

चांगल्या प्रतीच्या लेफ्ट आर्म फास्ट बॉलिंग समोर, विशेषतः आत येणाऱ्या चेंडूंवर आपली सलामीची फळी – विशेषतः रोहित-  तीच चूक पुन्हा पुन्हा करते हे माहित असून ये सुधारण्याचा काही प्रयत्न झाला आहे असे वाटत नाही – अर्थात ह्याला फलंदाज वैयाक्तीक्रीत्या जास्त जबाबदार. २०१६ साली ढाक्यात (आशिया कप) आमिरने तसेच २०१९ साली वर्ल्ड मध्ये ट्रेंट बोल्टने आपल्या टॉप ऑर्डरला उघड पाडलं होत. (२०१६ साली नशिबाने पाकिस्तानचा स्कोर ८३ असल्यामुळे आणि विराटच्या शांत, जिद्दीच्या खेळीमुळे आपण वाचलो पण २०१९ साली हरलो). काल पाकिस्तानकडे शाहीन आफ्रिदी हा नवा चांगला डावखुरा फास्ट बॉलर आहे हे माहित तरी होतं की नाही आपल्या think tank ला, अशीच शंका यावी अशी परिस्थिती होती. तिथून जी डगमगायला सुरुवात झाली ती शेवटपर्यंत. २०१६ चा फलंदाज विराट आणि आजचा ह्यात फरक आहे. शिवाय तो एकटाच किती वेळा संभाळणार? त्याने प्रयत्न केले पण अपुरे पडले.

 

 

थोडं विषयांतर, पण डावखुऱ्या जलदगती गोलंदाजांचे आत येणार चेंडू ह्यावरून आठवलं….. इथे विराट आणि रोहित मधला फरक दिसतो. रोहित जास्त talented पण विराट जास्त committed. २०१६ ला आमिरने रोहितला तर २०१९ मध्ये बोल्टने विराटला अशा आत येणाऱ्या चेंडूवर पायचीत बाद केले. त्यानंतर रोहित काही वेळा असा बाद झाला आहे, तोही डावाच्या सुरुवातीला. पण विराट त्यानंतर एकदाही तसा बाद झाला नाही. त्याने स्वतःच्या फलंदाजीत प्रयत्नपूर्वक बदल केले. अशा चेंडूंना खेळताना त्याच डोकं चेंडूच्या वर येऊ लागलं, पाय टप्प्याच्या जवळ येऊ लागले, पावलाची दिशा योग्य रहायला लागली. कालही तो तसा खेळला, आणि परिणामत: त्याने धावा केल्या. असो….

 

तर… आपण IPL मधेच गुंग होतो अस वाटत होत. टॉप ऑर्डर फ्लॉप गेली तर काय, plan B तयारच नव्हता अस वाटल.. निदान सुर्यकुमार आला त्यावेळेस. आणि नंतरही. पंतच्या टॅलेंटबद्दल शंकाच नाही. पण टेस्ट मध्ये योग्य चेंडूची थोडी तरी वाट पाहता येते. इथे T20 मध्ये गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूसाठी योग्य फटका कुठला ह्याच प्रोसेसिंग एका क्षणार्धात करून दुसऱ्याच क्षणार्धात त्यावर तशी कार्यवाहीपण करावी लागते. ते जमेपर्यंत पंत लिमिटेड ओव्हर्सच्या सामन्यांत तितका विश्वासार्ह ठरणार नाही. त्यानंतर आला जडेजा, तोही पांड्याच्या आधी! जडेजा जर पांड्याच्या आधी येणार असेल तर पांड्या हवाच कशाला का हा प्रश्न पडला. त्यावेळेस काही षटक बाकी होती आणि संघाला धावांची नितांत गरज होती. जडेजापेक्षा जास्त चांगला फलंदाज असल्यामुळे पांड्याकडून धावांची अपेक्षा जास्त असू शकते, अर्थात तो फिट असेल तर. जर पांड्या त्याच्या फिटनेस प्रॉब्लेम्समुळे इतकीही षटके बॅटिंग करू शकणार नसेल तर त्याला मुळात नेलाच कशाला?

 

जी गोष्ट तीच गोष्ट बॅटिंगची बॉलिंग changes ची. भुवनेश्वर, शामी दोघेही शेल्फ लाईफ संपल्यासारखे वाटले.  भारताच्या डावात काही षटके चेंडू थोडासा थांबून येत होता असं वाटलं आधी पण हळूहळू ते सुधारत गेलं. वरील दोन्ही गोष्टी ध्यानात न घेता – जस काही आधीच ठरवलेलं होतं म्हणून – बुमराला पहिली ओव्हर न देता भुवनेश्वरला दिली आणि पाकिस्तानी ओपनर्सना स्थिरावायची संधी दिली. त्यात आपले स्पिनर्स म्हणजे जडेजा आणि चक्रवर्ती. गोलंदाजी करताना जडेजाचा आव साधारण बाविसाव्या शतकातला बेदी असल्यासारखा असतो. तसा तो गोलंदाज म्हणून बरा होता पण काही सुधारणा न झाल्यामुळे तोही आता गोलंदाजीच्या बाबतीत तितका विश्वासार्ह राहिलेला नाही. अर्थात फिल्डिंगमुळे त्याचे स्थान तसे सुरक्षित आहे. चक्रवर्तीला बघून ९० च्या दशकात इंग्लंडच्या संघात मॅथ्यू फ्लेमिंग, अॅडम होलीओक सारखे सुमार खेळाडू खेळायचे त्याची आठवण आली, त्या काळात अशा खेळाडूंच्या खोगिरभरतीमुळे इंग्लंड संघ रसातळाला गेला होता.

 

खूप विचार करून देखील यजुर्वेन्द्र चहलसारखा x-factor वाला स्पिनर घरी ठेऊन चक्रवर्ती ला घेऊन जाण्यात काय strategy आहे याचा उलगडा होत नाही. तीच गोष्ट अश्विनची. त्याने काय घोड मारलंय कुणास ठाऊक! काही वर्षांपूर्वी कुलदीप यादवला असेच खड्यासारख बाजूला ठेऊन त्याच्या करिअरबरोबर खेळण्यात आलं होतं. आशा आहे की विराट कर्णधारपदावरून दूर गेल्यावर तरी अश्विनला (आणि पर्यायाने भारतीय संघाला) चांगले दिवस येतील.

 

एकंदरीत काय तर पाकिस्तानची पूर्वतयारी खूप चांगली होती आपल्यापेक्षा. त्यांनी हेडनसारखा  बॅटिंग कोच नेमला वर्ल्ड कपच्या तोंडावर. जो स्वत: खूप चांगला फलंदाज तर होताच शिवाय एक impact player होता. आणखीन महत्त्वाचे म्हणजे त्याने IPL खूप जवळून बघितलंय. त्यातले खेळाडू, त्यांची बलस्थाने आणि दुबळे दुवे सगळ्याचा database पाकिस्तानकडे गेलाय त्याच्या बरोबर.

 

आपल्या संघानेही केली असेल पूर्वतयारी पण काल तरी मैदानावर त्याची फलनिष्पत्ती तर सोडा, असे काही केल्याची साधी लक्षणे ही दिसली नाहीत. आपण जणू काही वर्ल्ड कप म्हणजे IPL च extension च आहे अशी तयारी केली आहे काहीसं वाटून गेलं.

 

अर्थात, वर्ल्ड कपच्या दृष्टीने अजूनही वेळ गेलेली नाही. काही महिन्यांपूर्वी सर्वबाद ३६ नंतरही भारतीय संघाने भरारी मारली होती. पण ती संघात (परिस्थितीमुळे का होईना) मोठे बदल झाल्यानंतर. विराटला आपल्या कर्णधारपदाची (ODI आणि T20I च्या) कारकीर्दीची सांगता दैदिप्यमान यशाने झालेली बघायला नक्कीच आवडेल. आणि तितकी जिद्द त्याच्यात नक्की आहे. जर त्याबरोबर त्याने – आणि रवी शास्त्रीने – डोकं मानेवर ठेऊन, होत असेलेल्या टीकेतील योग्य ते मुद्दे लक्षात घेऊन, खुल्या मनाने निर्णय घेत पावले उचलली तर अजूनही कपिल आणि धोनीपाठोपाठ विराटही “वर्ल्ड कप विजेता भारतीय कर्णधार” म्हणून आपले नाव इतिहासात नोंदवून समाधानाने कर्णधारपदावरून दूर होऊ शकेल.

तथास्तु! यशस्वी भव!

By Amogh Mathure

Show Buttons
Hide Buttons