This left arm pacer has taken maximum lefthanders’ wickets in Test Cricket for India

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

७  ऑक्टोबर
नकल बॉल हा क्रिकेटमधील, विशेषतः एक दिवसीय क्रिकेटमधील गोलंदाजांसाठी वरदान ठरलेला चेंडू विश्वस्तरावर लोकप्रिय केला तो भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान याने. आज ७ ऑक्टोबर हा त्याचा जन्मदिवस.  महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे मराठी मुसलमान कुटुंबात ७ ऑक्टोबर १९७८ रोजी झहीर खान याचा जन्म झाला. मराठी शाळेत शिकता शिकता झहीरने क्रिकेटचे धडे गिरवले. पुढे मुंबईत आल्यावर कांगा लीग खेळताना जुना चेंडू रिव्हर्स स्विंग करण्याची त्याची गुणवत्ता सुधीर नाईक यांनी अचूक हेरली आणि त्यांनी झहीरला एम आर एफ पेस फाऊंडेशन चेन्नईला पाठवले. त्याच्या गुणवत्तेने तेथील गोलंदाजी प्रशिक्षक शेखर फारच प्रभावित झाले. त्यांच्या प्रयत्नाने झहीरची बडोदे रणजी संघात निवड झाली आणि मग झहीरने मागे वळून पाहिलेच नाही.
१० नोव्हेंबर २००० साली बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण करणारा झहीर खान उर्फ झॅक हा भारतातर्फे तीनशे कसोटी बळी घेणारा (३११) कपिल नंतरचा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज. अल्पावधीतच रिव्हर्स स्विंग च्या वापरामुळे ६ʼ२” उंचीच्या झहीरची तुलना वासिम अक्रमशी होऊ लागली. परंतु वेगवान गोलंदाजांच्या पाचवीला पुजलेल्या दुखापतीमुळे झहीरच्या गोलंदाजीची धार थोडी कमी झाली. पण भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या झहीरने आपली छाप क्रिकेट विश्वात पाडली. डावखुऱ्या फलंदाजांनी तर झहीरचा चांगलाच धसका घेतला होता. मुरलीधरन आणि पोलॉक यांच्यानंतर सर्वाधिक डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्यात झहीरचा तिसरा क्रमांक लागतो. जगातील सर्वात स्फोटक डावखुरे फलंदाज ग्रॅमी स्मिथ, कुमार संघकारा, सनत जयसूर्या आणि मॅथ्यू हेडन यांना झहीरने कमीत कमी दहा वेळा तंबूत पाठवले आहे.
 २००३ पासून २०११ पर्यंत झहीरने विश्वचषकात भारतातर्फे सर्वाधिक ४४ बळी घेतले आहेत. २०११च्या विश्वचषकात झहीरने सर्वाधिक २१ बळी घेत भारतीय विश्वविजयात हातभार लावला. २०११चा विश्वचषक खऱ्या अर्थाने गाजवला तो झहीरच्या नकल बॉलने. तर्जनी आणि मध्यमा यांच्या पेरावर चेंडू पकडून वेगवान गोलंदाजाने चेंडू नेहमीप्रमाणे चेंडू टाकताना मात्र चेंडूचा वेग कमी होत चेंडू अतिशय मंद गतीने फलंदाजाकडे जातो. यामुळे फलंदाजाचा अंदाज चुकतो. या नकल बॉलचा झहीरला या विश्वचषकात प्रचंड फायदा झाला. याबाबतीत झहीर म्हणतो, “मी २०११च्या विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत होतो. मी नव्या प्रकारच्या चेंडूची तयारी करत होतो तो म्हणजे नकल बॉल. मी यावर वर्षभर मेहनत घेतली. जरी या चेंडूवर माझी अचूकता चांगलीच वाढलेली होती तरीही मी त्याचा प्रयोग फक्त विश्वचषकातच केला. त्यामुळे मला प्रचंड यश मिळालंच आणि समाधानही. 
निवृत्तीनंतर झहीरने अँड्रू लीपस या फिजिओथेरपिस्ट सोबत मुंबईत प्रो स्पोर्ट फिटनेस अँड सर्व्हिसेस ही फिटनेस ट्रेनिंग आणि फिजिओथेरपी सेवा देणारी संस्था सुरू केली. चक दे गर्ल सागरिका घाटगे हिच्याबरोबर विवाहबद्ध झालेला झहीर सध्या मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट संचालक पदावर कार्यरत आहे.
झहीर खान याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons