One thousand plus international wickets and led his team for inaugural IPL title!

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

१३ सप्टेंबर 

२ जानेवारी १९९२ या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर एका गोल गरगरीत फिरकी गोलंदाजाने फिरकी गोलंदाजी उत्तमरित्या खेळू शकणाऱ्या भारताविरुद्ध पदार्पण केले. भारतीयांनी, विशेषतः रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर यांनी त्याची अक्षरशः पिसं काढली. नाही म्हणायला द्विशतकवीर रवी शास्त्रीला त्याने बाद केलं खरं; पण त्यासाठी त्याने तब्बल दीडशे धावा मोजल्या. पण पुढे जाऊन याच फिरकी गोलंदाजाला विस्डेनने ‘शतकातील सर्वोत्तम पंचकात’ स्थान दिले. तो क्रिकेटपटू म्हणजे शेन वॉर्न आज १३ सप्टेंबर हा त्याचा वाढदिवस. 
जर्मन आई आणि ऑस्ट्रेलियन वडील यांच्या घरी १३ सप्टेंबर १९६९ या दिवशी मेलबोर्नच्या उपनगरात जन्मलेला शेन हा प्रकाशझोतात आला तो ४ जून १९९३ या दिवशी. मॅंचेस्टर येथील ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत वॉर्नने टाकलेला पहिलाच चेंडू हा ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ म्हणून गौरवला गेला. गॅटिंगला टाकलेला हा चेंडू डाव्या यष्टीच्या जवळ जवळ एक फूट बाहेर पडला आणि झपकन वळून गॅटिंगची उजवी यष्टी कधी उडवून गेला ते गॅटिंगला कळलंही नाही. ह्या ॲशेस मालिकेने वॉर्नला क्रिकेट जगताच्या कानाकोपऱ्यात ओळख मिळवून दिली. या सहा कसोटीत सर्वाधिक ३४ बळी घेणाऱ्या वॉर्नने ही ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाला ४-१ अशी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. कसोटीत ७०० बळी सर्वप्रथम घेणाऱ्या वॉर्नने कसोटीत ७०८ बळी तर एकदिवसीय सामन्यात २९३ बळी घेतले आहेत. ७०८ बळींचा त्याचा विश्वविक्रम श्रीलंकेच्या मुरलीधरनने मोडला. वॉर्न हा चेंडू वळवण्याबरोबरच त्याच्या फ्लिपर करता प्रसिद्ध होता. राऊंड द विकेट मारा करताना बुटांमुळे खेळपट्टीवरील पडलेल्या ठशांचा योग्य वापर करून वॉर्न हातभर चेंडू वळवत असे. 
इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध शतकी बळी घेणाऱ्या वॉर्नची भारतासमोर मात्र डाळ शिजली नाही. भारताविरुद्ध १४ कसोटीत फक्त ४३ बळीच तो मिळवू शकला. अर्थात यात त्याचा मोठा अडसर होता तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा. वॉर्न-तेंडुलकर या सर्वोत्तम गोलंदाज आणि सर्वोत्तम फलंदाज यांचे द्वंद्व क्रिकेटजगताने अनुभवले. वॉर्न आणि सचिनची पहिली झुंज वॉर्नच्या पदार्पणात झाली; पण खरे युद्ध सुरू झालं ते १९९८ साली ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्‍यात. तोपर्यंत वॉर्न आणि सचिन यांनी आपला दबदबा प्रस्थापित केला होता. ऑस्ट्रेलियाचा सराव सामना रणजी विजेत्या मुंबई संघाविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सचिनने वॉर्नच्या गोलंदाजीवर हल्ला चढवताना केवळ १९२ चेंडूत नाबाद २०४ धावा फटकावल्या. या सामन्यात वॉर्न एकही बळी घेऊ शकला नाही. पण लगेचच झालेल्या चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात वॉर्नने सचिनला बाद केले. पण दुसऱ्या डावात सचिनने वचपा काढत चौफेर फटकावत नाबाद दीडशतक ठोकले. वॉर्नने सचिनवर आपल्या ठेवणीतील राउंड द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न केला. पण सचिनने त्याला स्वीपचा षटकार ठोकून आपला दर्जा सिद्ध केला. 
वॉर्नला २००३ साली मादक द्रव्य सेवनामुळे एक वर्ष क्रिकेट पासून दूर राहावे लागले. १९९८ साली ऑस्ट्रेलियन बोर्डाने शेन वॉर्न आणि मार्क वॉ यांना खेळपट्टीबद्दल बुकींना माहिती दिल्याप्रकरणी दंड लावला होता. विवाहबाह्य संबंधामुळे वॉर्नची पत्नी सिमॉनने शेनशी फारकत घेतली. निवृत्तीनंतर ‘शेन वॉर्न फाउंडेशन’ या संस्थेसाठी वॉर्न आजारी आणि वंचित मुलांसाठी काम करीत आहे. सध्या राजस्थान रॉयल्सचा मुख्य मार्गदर्शक असलेल्या शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्स नेतृत्व करताना २००८ साली झालेल्या पहिल्या आयपीएल स्पर्धेचे विजेतेपदही मिळवून दिले होते. करिअरच्या सुरुवातीलाच (१९९३) श्रीलंकन कर्णधार अर्जुना रणतुंगा याने वॉर्नचे कौतुक करताना म्हंटले होते, “तीनशेच्या वर गोलंदाजीची सरासरी असणाऱ्या गोलंदाजाने ११ चेंडूत ३ बळी घेऊन आमच्या हातून सामना खेचून घेतला.”
शेन वॉर्न याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons