In his first Test he batted at number seven but went on to be one among world’s top batsmen

In his first Test he batted at number seven but went on to be one among world’s top batsmen
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन
७ ऑगस्ट
पर्थ येथे १३ डिसेंबर १९७० या दिवशी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १०७ अशी केली होती. सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने आपल्या अतिशय डौलदार चालीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. कसोटी पदार्पण करणाऱ्या या फलंदाजाने इंग्लिश गोलंदाजीचा समर्थपणे मुकाबला करीत पदार्पणात शतक झळकावलं. हा खेळाडू होता ग्रेग चॅपेल. आज ७ ऑगस्ट हा त्याचा वाढदिवस. चॅपेल कुटुंबात मोठा भाऊ इयान, मधला ग्रेग आणि धाकटा ट्रेव्हर हे तिघेही ऑस्ट्रेलियासाठी कसोटी खेळले. पण यात सर्वात यशस्वी ठरला तो ग्रेग चॅपेल. ८७ कसोटी खेळणाऱ्या चॅपेलने आपल्या कारकीर्दीतील पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत शतक झळकावले. तसेच १९७५-७६ साली कर्णधारपदी नियुक्ती झाल्यावर पहिल्याच कसोटीतील दोन्ही डावात शतक झळकावण्याचा पराक्रमही चॅपेलने केला.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटला सत्तरच्या दशकात शिखरावर नेण्याचे काम लिली-चॅपेल-मार्श यांनी केले. ऑस्ट्रेलियाच्या या त्रिकुटाने १९७०-७१ च्या ॲशेस मालिकेतून कसोटी पदार्पण केले आणि ६ जानेवारी १९८४ या दिवशी तिघांनी निवृत्ती स्वीकारली. ४८ कसोटीत नेतृत्व करणाऱ्या चॅपेलने २१ कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. विशेष संस्मरणीय म्हणजे चॅपेलच्या नेतृत्वाखाली  १९७७ साली शताब्दी सामन्यात इंग्लंडवर मिळवलेला विजय आणि १९७५-७६ साली लॉईडच्या विंडीजला चारलेली धूळ.
पण कर्णधार चॅपेल याच्या कारकिर्दीतील सर्वात वादग्रस्त घटना म्हणजे अंडरआर्म चेंडूफेक. ही घटना घडली १ फेब्रुवारी १९८१ या दिवशी मेलबोर्न येथे. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्यातील तिरंगी स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या व अंतिम सामन्यातील शेवटच्या षटकात विजयासाठी न्यूझीलंडला १५ धावांची आवश्यकता होती. शेवटचे षटक टाकणाऱ्या ट्रेव्हर चॅपेलच्या पहिल्याच चेंडूवर हॅडलीने चौकार मारला; पण पुढच्याच चेंडूवर हॅडली पायचीत झाला. यानंतर आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज इयान स्मिथने पुढील दोन चेंडूंवर प्रत्येकी दोन धावा घेतल्या. आता शेवटच्या दोन चेंडूंवर सात धावांची आवश्यकता असताना स्मिथला ट्रेव्हर चॅपेलने त्रिफळाचीत केले. आता एका चेंडूवर सात धावा हव्या असताना ब्रायन मॅककेनी फलंदाजीला उतरला. जर का शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार मारला तर सामना बरोबरीत सुटेल हा विचार करून ग्रेगने आपला धाकटा भाऊ ट्रेव्हरला सरपटी अंडरआर्म चेंडू टाकण्यास सांगितला. अर्थात त्यावेळेस अंडर आर्म चेंडू टाकू नये असा क्रिकेटमध्ये नियम नव्हता. पण या घटनेमुळे चॅपेलवर बरीच टीका झाली. या घटनेबाबत ग्रेग चॅपेल म्हणतो, “मी मैदानातून परतेपर्यंत हा निर्णय माझ्या किती विरोधात जाईल याची मला बिलकुल अपेक्षा नव्हती. पण एका लहान मुलीने माझा शर्ट खेचत मला खोटारडा म्हंटल्यावर मला या प्रकरणाची तीव्रता लक्षात आली.” ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू किथ मिलरने या घटनेबद्दल आपली तीव्र नापसंती व्यक्त करताना “काल एक दिवसीय क्रिकेट मेलं आणि ग्रेग चॅपेलला त्याबरोबर दफन करायला हवं” असं म्हटलं.
आज वयाची ७३ वर्षे पूर्ण करणाऱ्या ग्रेग चॅपेल याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस
Show Buttons
Hide Buttons