This handsome cricketer had hit fastest bowler of England six fours in over! His Birthday today!

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन १८ ऑगस्ट
आज १८ ऑगस्ट. अतिशय देखणा, आक्रमक आणि आकर्षक फलंदाज संदीप पाटील याचा वाढदिवस. १८ ऑगस्ट १९५६ रोजी मुंबईत जन्मलेला संदीप याचा उजवा गुडघा पीचवर टेकवून मारलेले कव्हर ड्राईव्हज कोण बरं विसरेल? शिवाजी पार्क या भारतीय क्रिकेटला असंख्य क्रिकेटपटू देणाऱ्या मैदानात अण्णा वैद्य यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवणारा संदीप हा संघसहकाऱ्यांत अतिशय लाडका होता. १९८० साली पाकिस्तान विरुद्ध पदार्पण करणारा संदीप प्रकाशझोतात आला तो १९८१च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात. या दौऱ्यातील सिडनी येथील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात गावस्कर, वेंगसरकर, विश्वनाथ आणि चेतन चौहान हे चौघे ७० धावांत बाद झाल्यावर संदीप पीचवर आला. लिली, पास्को, हॉग यांच्या तुफान माऱ्याला आक्रमक प्रत्युत्तर देत चहापानाच्या अगोदर तो ६५ धावांवर खेळत असताना पास्कोच्या आखूड टप्प्याच्या चेंडूला हूक करण्याचा त्याचा प्रयत्न फसला. हेल्मेटविना खेळणाऱ्या संदीपच्या उजव्या कानाला पास्कोचा चेंडू लागला आणि तो खेळपट्टीवरच कोसळला. त्याला ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात आले; पण डावाचा मारा टाळण्यासाठी कर्णधार गावस्करच्या सल्ल्याने दुसऱ्या डावात संदीप खेळपट्टीवर उतरला. संदीप फक्त दोनच चेंडू खेळपट्टीवर होता पण यामुळे त्याचे मनोधर्य मात्र उंचावले. 
पुढच्याच ॲडलेड कसोटीत संदीपने आपला दर्जा ऑस्ट्रेलियन संघाला दाखवून दिला. २४० चेंडूंचा सामना करताना त्याने २२ चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने झंझावाती १७४ धावा केल्या. पण यानंतर मायदेशात इंग्लंड विरुद्ध खराब कामगिरीमुळे त्याला वगळण्यात आले. पण १९८२ साली इंग्लंडविरुद्ध मॅंचेस्टर कसोटीत शतक झळकावत संदीपने दमदार पुनरागमन केले. या डावात विलीसच्या एका षटकात ६ चौकार मारत त्यावेळचा विश्वविक्रमही साजरा केला. या षटकात दोन कव्हर ड्राईव्ह, एक आडव्या बॅटने विलीसच्या डोक्यावरून, दोन स्क्वेअर कट आणि एक हूकच्या चौकाराने त्याने विलीसची यथेच्छ धुलाई केली. 
पण संदीपची कसोटी कारकीर्द संपली ती १९८४ला इंग्लंडविरुद्ध दिल्ली कसोटीत. बेजबाबदार फटका मारून बाद झाल्याने पुढील कसोटीतून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर मात्र संदीप पुन्हा कसोटी खेळू शकला नाही. निवृत्त झाल्यावर संदीपने प्रथम भारतीय अ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडली. यानंतर २००३च्या विश्वचषकात लिंबूटिंबू केनियाला प्रशिक्षण देत त्यांना उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले. यानंतर भारतीय निवड समितीचे अध्यक्षपद भूषवत भारतीय क्रिकेट संघाला सर्वोच्च स्थानी नेले. ‘कभी अजनबी थे’ या सिनेमात नायकाची भूमिका करणारा पाटील याने ‘एकच षटकार’ या अतिशय लोकप्रिय पाक्षिकाच्या संपादकपदाचे शिवधनुष्य ही पेलले.
संदीप पाटील याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons