These two left handers debuted in same Test match…One of them is having Birthday today!

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन३१ ऑगस्ट
वेस्टइंडीज क्रिकेट संघाचा सातत्याने विजयी प्रवास सुरू झाला तो सत्तरच्या दशकात आणि त्याचे शिल्पकार होते सर क्लाईव्ह लॉईड. आज ३१ ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस. सहा फूट चार इंच उंचीचे, जाड मिशा आणि डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा घालणारे लॉईड यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४४ रोजी गयाना मध्ये झाला. मधल्या फळीत डावखुरी फलंदाजी करणारे लॉईड हे त्यांच्या काळात सर्वाधिक वजनाची बॅट वापरत. मजबूत अंगापिंडाचे लॉईड आपल्या घणाघाती फलंदाजीने अल्पावधीतच विंडीज संघाचे आधारस्तंभ झाले. ‘बिग सी’ किंवा ‘सुपर कॅट’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले लॉईड यांचे कसोटी पदार्पण १३ डिसेंबर १९६६ रोजी भारताविरुद्ध मुंबईत झाले. दोन्ही डावात अर्धशतके झळकावणाऱ्या लॉईड यांनी विंडीज संघात आपली जागा पक्की केली. याच कसोटीत भविष्यातील दोन उत्तम कर्णधारांनी पदार्पण केले. एक लॉईड तर दुसरे वाडेकर. 
लॉईड यांची कर्णधारपदी नेमणूक झाली ती १९७४-७५ साली भारताविरुद्धच. या दौऱ्यातील बंगळूर येथील पहिल्या कसोटीत ग्रीनिज आणि रिचर्ड्स यांनी पदार्पण केले. पहिले दोन सामने जिंकल्यावर पुढील दोन सामने विंडीजने गमावले. पण या मालिकेतील शेवटच्या सामन्यात लॉईडने घणाघाती द्विशतक झळकावत आपली पहिली कसोटी मालिका खिशात टाकली. पण १९७५-७६ साली ऑस्ट्रेलियात लिली, थॉम्पसन, गिलमूर यांच्या जलदगती माऱ्यासमोर लॉईडच्या विंडीज संघाची पूर्ण धूळधाण उडाली. सहा कसोटीची ही मालिका लॉईड ५-१ असे हरले. यानंतर लगेचच भारताविरुद्ध, मायदेशी झालेल्या पोर्ट ऑफ स्पेन येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने चारशेचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला. यावर वैतागलेल्या लॉईडने “मी अजून किती धावा तुम्हाला द्यायला हव्या होत्या?” असे आपल्या गोलंदाजांना विचारले. पण यानंतर लॉईडने आपली रणनीती पूर्णपणे बदलली. तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांऐवजी चार-चार वेगवान गोलंदाज प्रत्येक सामन्यात लॉईडने खेळवण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे जवळपास पुढील पंधरा वर्षे विंडीज संघ अजिंक्य संघ म्हणून नावारूपाला आला.
बऱ्याच जणांनी हा विजयी फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न केला. पण विंडीज तोफखान्याची सर कोणालाच नव्हती. या काळात विंडीजने होल्डिंग, रॉबर्ट्स, गार्नर, क्रॉफ्ट, मार्शल, होल्डर, ज्यूलियन, डॅनियल, पॅटरसन, वॉल्श, बिशप, अँब्रोज यांसारखे एकापेक्षा एक घातक वेगवान गोलंदाज क्रिकेट विश्वाला दिले. पण चार चार वेगवान गोलंदाजांमुळे षटकांचा वेग मंदावण्याबरोबरच फलंदाजांसाठी शरीरवेधी गोलंदाजी करण्याचे आरोप लॉईडवर झाले. त्याच बरोबर जेवणात चटणी किंवा लोणच्याच्या जागेएवढे महत्त्वही लॉईडने फिरकी गोलंदाजांना दिले नाही. १९७६ सालची भारताविरुद्धची रक्तरंजित जमेका कसोटी कोण बरं विसरेल? गायकवाड, विश्वनाथ, ब्रिजेश पटेल हे या कसोटीत होल्डिंगच्या वेगवान माऱ्यासमोर जायबंदी झाले होते. यानंतर झालेल्या इंग्लंड मधील कसोटी मालिकेत इंग्लिश कर्णधार टोनी ग्रेगने दर्पोक्ती केली की इंग्लंड विंडीजला गुडघे टेकवायला लावेल. या अपमानाचा लॉईडने आपल्या संघसहकाऱ्यांच्या अहंकाराला फुंकर घालण्यासाठी वापर केला. होल्डिंग-रॉबर्ट्सचा वेगवान मारा आणि रिचर्ड्सचा झंझावात यांच्या जोरावर ही मालिका विंडीजने ३-० अशी जिंकली.
१९७५ साली झालेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत लॉईडने विंडीजला विजयपथावर नेले. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असलेल्या २१ जून या दिवशी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार इयान चॅपेल याने नाणेफेक जिंकून विंडीजला फलंदाजीसाठी पाचारण केले. लिली थॉमसन आणि गिलमूरने विंडीजची अवस्था ३ बाद ५० अशी केली. पण त्यानंतर खेळपट्टीवर उतरणार्‍या कर्णधार लॉईडने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. केवळ ८५ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने १०२ धावा करीत लॉईडने विंडीजला सुस्थितीत नेले. १७ धावांनी हा सामना जिंकत विंडीजने पहिल्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. १९७९ साली दुसरा विश्वचषक जिंकून पहिला विश्वचषक विजय हा नशिबाने मिळवला नव्हता हे लॉईडने सिद्ध केले. १९७५च्या शतकी खेळीबद्दल लॉईड म्हणतात, “पहिलाच चेंडू बॅटच्या मध्यावर लागला आणि मग असं जाणवलं की आज आपलाच दिवस आहे.” या खेळीबद्दल ऑस्ट्रेलियन कर्णधार इयान चॅपेलने म्हंटलं, “आमच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत लॉईडने चेंडूला लॉर्ड्सचे सर्व कोपरे दाखवले.” 
१९८३ साली दुबळ्या भारतीय संघाने लॉईडची विश्वचषक विजयाची हॅट-ट्रिक चुकवल्याने उफाळून आलेल्या विंडीजने  आपला राग १९८४ च्या भारत दौर्‍यात ६ कसोटींची मालिका ३-० तर पाचही एकदिवसीय सामने जिंकून काढला. पण ‘बूँद से गयी वो हौदसे नही आती’ या उक्तीप्रमाणे लोक हे मात्र सोयीस्कररित्या विसरले. निवृत्तीनंतर मॅच रेफ्रीची भूमिका निभावणारे सर क्लाईव्ह लॉईड आज ७८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
सर क्लाईव्ह लॉईड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
©️आशिष पोतनीस

Feature image is symbolic

Feature image By Pixabay

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons