He scored zero in his first two international matches but became top class batsman.

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन८ ऑगस्ट
न्यूझीलंड हे नाव उच्चारताच सध्या एकच खेळाडू डोळ्यासमोर येतो तो म्हणजे केन विल्यमसन. आज ८ ऑगस्ट हा त्याचा वाढदिवस. खरं तर विल्यमसनचा जन्म झाला तो क्रीडाघरातच. वडील हे न्यूझीलंडमध्ये क्लब क्रिकेट खेळलेले तर आई बास्केटबॉलपटू. तीनपैकी दोन बहिणी या व्हॉलीबॉलपटू. अशा घरात ८ ऑगस्ट १९९० या दिवशी सँड्रा विल्यम्सन यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला, केन आणि लोगन. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणे केन क्रिकेटमध्ये प्रगती करू लागला. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचे नेतृत्व करणाऱ्या विल्यम्सनने आपल्या बॅटने न्यूझीलंड क्रिकेट संघाचे दरवाजे ठोठावायला सुरुवात केली. वयाच्या विसाव्या वर्षी भारताविरुद्ध एक दिवसीय सामन्यात पदार्पण करणारा विल्यमसन शून्यावर बाद झाला. या स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या पुढील सामन्यातही विल्यमसन शून्यावर बाद झाला. पण बांगलादेश विरुद्ध झुंजार शतक झळकवणारा विल्यमसन भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करण्यास सज्ज झाला. अहमदाबाद येथे पदार्पणात शतक झळकावत विल्यम्सने न्यूझीलंड संघात आपले बस्तान बसवले. 
“विल्यमसन जेव्हा निवृत्त होईल तेव्हा तो न्यूझीलंडचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून गणला जाईल” हे गौरवोद्गार होते न्यूझीलंडचे दिग्गज फलंदाज मार्टिन क्रो यांचे. विल्यम्सनने त्यांचे हे भाकीत खरं करण्याचा चंगच बांधला. आजच्या घडीला केन विल्यमसन, विराट कोहली, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ हे चौघे सध्याचे जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. मार्च २०१६ मध्ये मॅक्युलमच्या निवृत्तीनंतर विल्यम्सनकडे न्यूझीलंडच्या कप्तानपदाची सूत्रे आली आणि न्यूझीलंड क्रिकेट संघाने कात टाकली. विल्यमसन याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत न्यूझीलंड संघ एकेक पाऊल पुढे टाकत क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाला. खरं तर क्रिकेट हा सांघिक खेळ; पण ज्या तऱ्हेने विल्यमसनने संघ बांधला त्याला तोड नाही. विल्यमसनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अतिशय शांत स्वभाव. त्याचा मेंदू कदाचित बर्फापेक्षाही थंड असावा. आरडाओरडा तर दूरच, विल्यमसन कधीही मोठ्याने बोलतानाही दिसत नाही. आक्रस्ताळेपणा किंवा चित्रविचित्र हातवारे हे त्याच्या शब्दकोशातही नसावेत. पण या शांत आणि संयमी चेहर्‍यामागे दडलेला आहे तो प्रचंड आत्मविश्वास आणि आक्रमकता. 
२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना कोण बरं विसरेल? निर्धारित ५० षटकात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांची धावसंख्या समसमान झाल्यावर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. खरंतर मुख्य सामन्यातील शेवटच्या षटकातील एका घटनेने विल्यमसनचा धीरोदात्तपणा उठून दिसला. दुसरी धाव घेण्यासाठी धावलेल्या स्टोक्सला धावचीत करण्यासाठी गप्टीलने फेकलेला चेंडू यष्टीला न लागता स्टोक्सच्या बॅटला लागून चौकार गेला. खरं तर सामना पाहणाऱ्या बहुतेकांना या प्रसंगाची चीड आली अथवा वाईटही वाटलं पण आपल्या निर्विकार चेहऱ्यावर नाराजी न दर्शवता विल्यम्सनने बोल्टला पुढचे चेंडू टाकण्यास तयार केले. सुपर ओव्हरमध्ये सुद्धा धावा समसमान झाल्यावर संघाने मारलेले चौकारांच्या संख्येने इंग्लंड विश्वविजेता ठरला, पण बहुतेक बहुसंख्य क्रिकेट जगताचा पाठिंबा मात्र विल्यमसनच्या न्यूझीलंडला होता. 
हातातोंडाशी आलेला विश्वविजयाचा घास हिरावल्यानंतरही विल्यम्सनने आपली आणि संघाची कामगिरी उंचावत नेली. दीडशे वर्षात प्रथमच झालेल्या विश्वचषक कसोटी कसोटी स्पर्धेत न्यूझीलंडने भारतावर मात करून अजिंक्यपद मिळवले. खरं तर या अंतिम सामन्यात विल्यमसन याच्या नेतृत्वाची चुणूक क्रिकेट विश्वाने बघितली. अगदी संघ निवडीपासून ते सामन्यातील डावपेचांपर्यंत विल्यमसनने कोहलीवर सपशेल आघाडी घेतली. मग ते साउथम्पटनच्या ढगाळ वातावरणात पाच जलदगती गोलंदाज खेळवणे असो की रहाणेला अलगद जाळ्यात अडकवणे असो. विल्यमसन याच्या संयमी, चाणाक्ष आणि आक्रमक व्यूहरचनेमुळे न्यूझीलंडला प्रथमच मानाची स्पर्धा जिंकता आली.
केन विल्यमसन याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons