This bowler has taken 4 wickets in 4 balls twice in ODI …His birthday today !

This bowler has taken 4 wickets in 4 balls twice in ODI ..Read his story on his birthday
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन
२८ ऑगस्ट
चार चेंडूत चार बळी आणि तेही दोनदा घेणारा गोलंदाज कोण? होय, अगदी बरोबर. लसिथ मलिंगा. आज २८ ऑगस्ट हा त्याचा वाढदिवस. २८ ऑगस्ट १९८३ रोजी गॉल येथे जन्मलेल्या या श्रीलंकन गोलंदाजाला ‘यॉर्कर किंग’ असेही म्हटले जाते. विस्डेन क्रिकेट मासिकाने त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे त्याला स्लिंगा असे संबोधले. स्लिंगचा मराठी अर्थ गोफण असा आहे. गोलंदाजी करताना त्याचा हात गोफण चालवल्यासारखा दिसतो, यावरून त्याला स्लिंगा मलिंगा हे टोपण नाव पडले. मलिंगा आपल्या या शैलीचे श्रेय बालपणी टेनिसच्या चेंडूने खेळलेल्या क्रिकेटला देतो. २००४ साली कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणारा मलिंगा हा आपल्या गोलंदाजीच्या शैलीमुळे, हातभर गोंदवल्यामुळे आणि अनोख्या कुरळ्या केशरचनेमुळे चटकन आपल्या डोळ्यासमोर येतो.
मलिंगाच्या विक्रमांवर नजर टाकल्यास त्याची श्रीलंकन क्रिकेटसाठीची उपयुक्तता लक्षात येते. एकदिवसीय सामन्यात दोनवेळा लागोपाठ चार चेंडूत ४ बळी घेणारा मलिंगा हा एकमेव गोलंदाज. दोन वेळा क्रिकेट विश्वचषकात हॅट-ट्रिक घेणारा मलिंगा आजपावेतो एक दिवसीय सामन्यात तीन हॅट-ट्रिक्स घेणारा आणि टी-20 सामन्यात १०० बळी घेणारा पहिला गोलंदाज आहे. आपल्या खास ठेवणीतील इनस्विंगिंग यॉर्करने भल्याभल्या फलंदाजाची भंबेरी उडवणाऱ्या मलिंगाने कसोटी आणि टी-20 सामन्यांत प्रत्येकी १०० बळी आणि एकदिवसीय सामन्यात ३०० बळी घेतले आहेत. आपल्या गोलंदाजीच्या शैलीमुळे न समजता येणाऱ्या इनस्विंगिंग यॉर्करचे श्रेय मलिंगा आपले आद्य प्रशिक्षक चंपक रामनायके यांना देतो.
२०११ साली गुडघेदुखीमुळे मलिंगाने कसोटीतून निवृत्ती घेत मर्यादित षटकांच्या सामन्यांवर आपले लक्ष केंद्रित केले. २००८ पासून  मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या मलिंगाने आयपीएलमध्ये १२७ सामन्यांत १७९ बळी टिपले आहेत. मलिंगाने २०१४च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत नेतृत्व करताना श्रीलंकेला टी-20 विश्वचषक जिंकून दिला. पण त्यानंतर पायाचा घोटा दुखावल्याने मलिंगाचा वेग कमी होत गेला. २०१८ साली मुंबई इंडियन्सने मलिंगाची गोलंदाज मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली. वेस्ट इंडिजमध्ये २००७ च्या विश्‍वचषकात मलिंगाच्या गोलंदाजीने विशेष प्रभावित झालेले सर व्हिवियन रिचर्ड्स म्हणाले, “अरविंद डिसिल्व्हानंतर लसिथ मलिंगा ही श्रीलंकन क्रिकेटला मिळालेली मोठी देणगी आहे.”
लसिथ मलिंगा याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस
Show Buttons
Hide Buttons