Youngest among three Test Cricketers from a family. He completes 48 today.
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन१६ जुलै
क्रिकेट त्याच्या रक्तात आहे असं आपण काही क्रिकेटपटूंबद्दल ऐकतो. तीन पिढ्या क्रिकेट खेळलेले पोलाॅक कुटुंब हे त्यापैकी एक. आजोबा अँड्र्यू पोलॉक हे दक्षिण आफ्रिकेत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. वडील पीटर पोलॉक आणि काका ग्रॅहम पोलॉक हे साठच्या दशकात दक्षिण आफ्रिकेतर्फे कसोटी क्रिकेट खेळले. या पोलाॅक घराण्यातील तिसऱ्या पिढीतील शाॅन पोलाॅक या अष्टपैलू खेळाडूचा आज वाढदिवस.
तेरा वर्षे दक्षिण आफ्रिकन क्रिकेटची सेवा करणारा पोलॉक हा ४०० कसोटी बळी घेणारा पहिला दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू. बाप से बेटा सवाई या म्हणीनुसार शाॅन हा वडील पीटर यांच्या एक पाऊल पुढेच होता. पीटर यांनी गोलंदाज म्हणून नाव कमावले होते; पण शाॅनने अष्टपैलू म्हणून नाव कमावले. कसोटीत ३००० धावा आणि ३०० पेक्षा जास्त बळी घेणारा शाॅन पोलाॅक हा एकमेव दक्षिण आफ्रिकन कसोटीपटू.
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी क्रिकेट पुनरागमनानंतर डोनाल्ड-पोलाॅक या दुकलीने आपला ठसा क्रिकेट विश्वावर उमटवला.
२००० साली हँसी क्रोनिएच्या गच्छंतीनंतर पोलाॅकने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली. पण २००३ च्या विश्वचषक स्पर्धेतील सुमार कामगिरीने पोलाॅकला कर्णधारपद सोडावे लागले. पण पोलाॅक आपल्या अष्टपैलू खेळामुळे संघात आपले स्थान टिकवून ठेवू शकला.
३ फेब्रुवारी २००८ या दिवशी आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या पोलाॅकबद्दल कर्णधार ग्रॅम स्मिथने गौरवोद्गार काढताना म्हंटले,” पोलाॅकने दक्षिण आफ्रिकन क्रिकेटला दिलेलं योगदान आणि त्याचे वैयक्तिक यश हे साजरे करणे अतिशय महत्त्वाचे आहे.” निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्स चमूचा घटक असलेल्या शाॅन पोलाॅक आज एकोणपन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे
शाॅन पोलाॅक याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस