This greatest all rounder of cricket did not score hundred in first 22 innings..His Birthday today.

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन२८ जुलै 
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून गणले गेलेले सर गारफिल्ड सोबर्स यांचा आज वाढदिवस. २८ जुलै १९३६ या दिवशी सोबर्स यांचा जन्म ब्रिजटाऊन,  बार्बाडोस येथे झाला. सहा भावंडात पाचवे असलेले गॅरी यांच्या दोन्ही हातांना सहा सहा बोटे होती. वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यावर सोबर्स यांच्या खंबीर आईने फर्निचरचे दुकान चालवत सर्व मुलांचे व्यवस्थित संगोपन केले. ब्रिजटाऊन येथील वाँडरर्स क्लबमध्ये मधली यष्टी उडवल्यास सोबर्स यांना ५० सेंट मिळत. पण हीच कमाई त्यांना बार्बाडोस संघात स्थान देऊन गेली. खरं तर पाहुण्या भारतीय संघाविरुद्ध सोबर्स हे बारावे खेळाडू होते. पण कर्णधार फ्रँक वॉरेल जायबंदी झाल्याने मिळालेल्या प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पणाच्या संधीचा सोबर्स यांनी फायदा उचलला. सोबर्स यांना कसोटी पदार्पणाची संधी पुढच्याच वर्षी मिळाली ती गोलंदाज म्हणून.  सोबर्स हे डावखोरी जलदगती गोलंदाजी, डावखोरी फिरकी गोलंदाजी आणि डावखोरी मनगटी फिरकी गोलंदाजी करीत. पण ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कीथ मिलर यांनी सोबर्स चांगली फलंदाजी करू शकेल असं मत व्यक्त केलं. यानंतर सोबर्स यांनी फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. पण २२ कसोटी डावात ते एकही शतक झळकावू शकले नाहीत.  
१९५८ साली त्यांनी आपले पहिले शतक आणि तेही त्रिशतक झळकावत आपल्या बॅटचं पाणी प्रतिस्पर्ध्यांना पाजण्यास सुरवात केली. वयाच्या बावीसाव्या वर्षी सोबर्स यांनी सर लेन हटन यांचा वैयक्तिक ३६४ धावांचा विक्रम मोडून नाबाद ३६५ धावांचा नवा विश्वविक्रम केला. सोबर्स यांनी आपल्या कारकिर्दीत ९३ कसोटीत ८०३२ धावा आणि २३५ बळी घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये माल्कम नॅश याच्या गोलंदाजीवर सोबर्स यांनी एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. 
१९६० साली वेस्ट इंडिजने फ्रँक वॉरेल यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या प्रथम श्रेणी सामन्यांत बेनाॅने सोबर्सना बाद केले. यावर ऑस्ट्रेलियन मिडीयाने सोबर्स यांना ‘बेनाॅचा बकरा’ असे संबोधले. याला प्रत्युत्तर देताना पहिल्या कसोटीत सोबर्सनी झंझावाती शतक झळकावले. सोबर्सने बेनाॅला मारलेल्या अप्रतिम सरळ ड्राईव्हच्या चौकाराला बेनाॅने देखिल टाळ्या वाजवत दाद दिली होती. ब्रिस्बेन येथील हा कसोटी सामना टाय झालेला पहिलाच सामना होता. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन ॲलन डेव्हिडसनने सोबर्सच्या या शतकाची त्याने पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींमध्ये गणना केली. 
आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट असलेले सोबर्स यांना १९७५ साली राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ‘सर’ किताबाने गौरवले. इ. स. २००० साली १०० जणांच्या पॅनेलने सर गारफिल्ड सोबर्स यांची ‘विस्डेन शतकातील सर्वोत्तम खेळाडू’ अशी निवड केली. रिची बेनाॅ सोबर्स यांच्याबद्दल लिहितात, ” जगाने पाहिलेला सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणजे सोबर्स. सोबर्स हे अप्रतिम फलंदाज,  उत्तम क्षेत्ररक्षक आणी असामान्य प्रतिभेचे गोलंदाज होते.” प्रामुख्याने बॅकफूटवर फलंदाजी करणारे सोबर्स यांच्याबद्दल जलद गोलंदाज फ्रेड ट्रूमन म्हणतात, ” सोबर्स हे क्रिकेटला मिळालेले सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू. त्यांच्याकडे उत्तम क्रिकेटींग मेंदू होता आणि त्यांची विचारशक्ती ही वीजेच्या वेगापेक्षाही जलद होती.”
सर गारफिल्ड सोबर्स यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons