He instilled winning instinct in Indian Cricket Team !

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन
८ जुलै
आज अशा क्रिकेटपटूचा वाढदिवस आहे ज्यांनी इंग्लंडविरुद्ध लॉर्डस येथे पदार्पण करताना पदार्पणातच शतक ठोकलं. सौरव गांगुली उर्फ प्रिन्स ऑफ कोलकाता उर्फ दादा यांचा जन्म ८ जुलै १९७२ रोजी कोलकाता येथे अतिशय सुखवस्तू कुटुंबात झाला. खरंतर दहावीपर्यंत दादा कोलकत्याच्या गुणसूत्रानुसार फुटबॉलकडे आकर्षित झाला होता. पण भाऊ स्नेहाशिषमुळे सौरव क्रिकेटकडे वळला. बंगाल रणजी संघात स्नेहाशिषच्याच जागी त्याची वर्णी लागली. डेव्हिड गावरला आपला आदर्श मानणाऱ्या गांगुलीने १९९६ साली पदार्पणात शतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली. दादाच्या क्रिकेट कारकिर्दीला अनेक कंगोरे आहेत. काहींच्या मते तो आखूड टप्प्याचे चेंडू व्यवस्थित खेळू शकत नाही तर काहींच्या मते त्याच्यात क्रीडापटूसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक तंदुरुस्तीचा अभाव आहे. त्याचा परममित्र राहुल द्रविड याच्या मते दादा हा ऑफसाईडचा देव होता. एकदिवसीय सामन्यात गांगुलीने सचिन सोबत सलामी देताना भारताला अनेक झंझावाती सुरुवात करून दिल्या आहेत.
पण दादाने कर्णधारपदाची सूत्रे हातात घेतली आणि क्रिकेट विश्वावर भारताची दादागिरी सुरू झाली. २००१ साली ऑस्ट्रेलियाची सलग सोळा विजयांची मालिका दादाच्या नेतृत्वाखालीच खंडित झाली. उलटपक्षी तीन सामन्यांची ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली. २००२ ची भारत- इंग्लंड -श्रीलंका यांच्यातील नेटवेस्ट मालिका कोण विसरेल? अंतिम सामन्यात इंग्लंडच्या ३२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार गांगुली (६०) आणि सेहवाग (४५) यांनी भारताला १४.३ षटकात १०६ धावांची सलामी दिली. पण नंतर ४० धावात पाच गडी बाद झाल्यावर भारताच्या हातून सामना गेल्याची भारतीय क्रिकेट रसिकांना जाणीव होऊ लागली होती. यानंतर युवराज आणि कैफने सामना इंग्लंडच्या तोंडातून हिसकावून घेत भारताला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. हा विजय साजरा करताना दादाने लॉर्ड्सच्या गॅलरीतून आपला शर्ट काढून गरागरा फिरवला होता. या त्याच्या कृत्याबद्दल त्याला टीकेचे धनीही व्हावे लागले. पण आदल्या वर्षी फ्लिन्टॉफने भारताला पराभूत केल्यावर असेच कृत्य केल्याची ही परतफेड होती. कोणी काहीही बोलू द्या; पण माझ्या मते हे गांगुलीच्या आक्रमक देहबोलीला साजेसंच होतं. २००३ च्या विश्‍वचषक स्पर्धेत गांगुलीचा भारतीय संघ अंतिम फेरीत पोचला. तब्बल वीस वर्षानंतर अंतिम फेरीत पोहोचणारा भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. खरं तर या स्पर्धेत भारत फक्त दोनच सामने हरला आणि तेही ऑस्ट्रेलियाकडूनच.
२००५ साली ग्रेग चॅपेल भारतीय संघाचा प्रशिक्षक झाला आणि गांगुली-चॅपेल वादाची ठिणगी उडाली. गांगुली हा भारताचे नेतृत्व करण्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर असून त्याच्या फोडा आणि राज्य करा या नीतीमुळे तो संघाचे नुकसान करीत आहे असा ई-मेल चॅपेलने बीसीसीआयला केला. हा ई-मेल मीडियाच्या हाती लागला आणि मीडियाने यावर प्रचंड गदारोळ माजवला. शेवटी क्रिकेट नियामक मंडळाला गांगुली-चॅपेल यांच्यात हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा लागला. सध्या सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान आहे.
सौरव गांगुली याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस
Show Buttons
Hide Buttons