Man who broke Sunil Gavaskar’s record and a fielder who turned matches both born today!

Man who broke Sunil Gavaskar’s record and a fielder who turned matches both born today!
डावखुरा फलंदाज आणि आकर्षकता याचा जवळचा संबंध. आकर्षक डावखुरा फलंदाज म्हणताच आपल्याला नाव आठवतात ती नील हार्वे, सर गारफिल्ड सोबर्स, अजित वाडेकर, डेव्हिड गावर, ब्रायन लारा, सौरव गांगुली वगैरे वगैरे. पण खडूस डावखुरा फलंदाज जो फिरकी गोलंदाजी लीलया खेळतो आणि जलद गोलंदाजीचाही तेवढाच उत्तम मुकाबला करणारा क्रिकेटपटू म्हणजे ॲलन बॉर्डर. आज त्याचा ६६ वा वाढदिवस. सुनील गावस्करचा तत्कालीन सर्वोच्च कसोटी धावांचा विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित करणारा बॉर्डर हा उपयुक्त गोलंदाजीही करीत असे. १९७८ साली कसोटीत पदार्पण करणार्‍या बॉर्डरची सुरुवात मात्र अडखळत झाली. तीन कसोटीनंतर त्याला डच्चू मिळाला; पण लगेचच पुनरागमन करणारा बॉर्डर यानंतर सलग १५३ कसोटी खेळला. १९८१ च्या इंग्लंड दौऱ्यात ॲलन बॉर्डरची बॅट चांगलीच तळपली. या ॲशेस मालिकेत जवळजवळ ६०च्या सरासरीने पाचशेच्या वर धावा करणाऱ्या बॉर्डरला ‘जगातील सर्वोत्तम डावखुरा फलंदाज’ असा किताब सर लेन हटन यांनी बहाल करताना १९८२ च्या विस्डेन पंचकात त्याची निवड केली.
जानेवारी १९८४ ला लिली-चॅपेल-मार्श यांच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटला उतरती कळा लागली. किम ह्युजच्या नेतृत्वाखाली नवोदित ऑस्ट्रेलियन संघ पराभवाच्या गर्तेत अडकला होता. १९८४-८५ च्या मोसमात क्लाईव्ह लाॅईडच्या वेस्ट इंडीज संघाने पहिले दोन कसोटी सामने सहजगत्या जिंकल्यावर ह्युजने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. बॉर्डरच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडल्यानंतर मालिकेतील तिसरा सामनाही ऑस्ट्रेलियाने गमावला. पण बॉर्डरने आपले नेतृत्वगुण दाखवत पुढील सामना अनिर्णित राखला आणि शेवटच्या सामन्यात विंडीजला डावाने पराभूत केले. यानंतर तरुण आणि नवख्या खेळाडूंची मोट बांधणाऱ्या बॉर्डरने १९८७ साली ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून दिला. या अगोदर १९८६ साली भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानचा टाय म्हणजे बरोबरीत सुटलेल्या सामन्याने मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या असभ्य वर्तनाला लगाम न घातलेल्या कर्णधार बॉर्डरवर क्रिकेट जगताने टीका केली. आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट असलेल्या बॉर्डरने विंडीज वगळता प्रत्येक कसोटी संघाविरुद्ध मालिका जिंकली आहे. १९९२-९३ च्या विंडीज संघाला ॲडलेड येथे पराभूत करून मालिका जिंकण्याची संधी बॉर्डरला लाभली होती. १८६ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची स्थिती ८ बाद १०२ अशी झाली होती. पण तळाच्या फलंदाजांनी चिवट झुंज देत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या समीप नेले. वाॅल्शच्या गोलंदाजीवर पंचांच्या वादग्रस्त निर्णयाने ऑस्ट्रेलियाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास केवळ एका धावेने हुकला आणि ड्रेसिंग रूममधून सामना बघणाऱ्या बॉर्डरची विफलता कॅमेराने चटकन टिपली. विंडीजला मालिकेत पराभूत न करू शकल्याची  खंत बॉर्डरने व्यक्त केली. ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेटची प्रतिमा उजळवण्याची कामगिरी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत बॉर्डरने केली’ असे गौरवोद्गार माईक काॅवर्ड यांनी ॲलन बॉर्डरबद्दल काढले.
आधुनिक क्रिकेटच्या क्षेत्ररक्षणाची नवी व्याख्या लिहिणाऱ्या जाँटी रोहड्स याचा आज वाढदिवस. १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका या पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी ३६ षटकात १९४ धावांचे आव्हान होते. ३१ षटकात दोन बाद १३५ अशा परिस्थितीत इंझमाम चा ब्रायन मॅकमिलनला उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात चेंडू पॅडला लागून पॉईंटच्या दिशेने गेला आणि इंझमाम एक धाव घेण्यासाठी धावला. पण कर्णधार इम्रान खानने त्याला परत पाठवले. तोपर्यंत पॉईंटवरून धावत येत जाँटीने चेंडूसोबत थेट यष्टींवर झेप घेत इंझमामला धावचित केले. या अचाट झेपेचे वर्णन करताना बऱ्याच समीक्षकांनी जाँटीला विमान किंवा मोठा पक्षी किंवा चित्त्याची उपमा दिली. ब्रायन मॅकमिलन या प्रसंगाबाबत म्हणतो,”मी पंचांकडे पायचीतचे अपील करीत होतो. पण तेवढ्यात डोळ्याच्या कोपऱ्यातून जाँटी मला धावताना दिसला आणि पुढच्याच क्षणी त्याने झेप घेत यष्ट्या उडवल्या होत्या. या प्रसंगाबाबत जाँटीचे म्हणणे असे होते,”जर का मी चेंडू फेकला असता तर मला पन्नास टक्के यशाची खात्री होती. पण मी जर धावत जाऊन यष्ट्या उडवल्या असत्या तर मला शंभर टक्के यशाची खात्री होती. शेवटचे दीड-दोन मीटर अंतर गाठण्यासाठी मला फक्त झेप घेण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.” पण यानंतर लगेचच इजाझ अहमदचा उडी मारून अप्रतिम झेल घेत जाँटीने सामन्याचे भवितव्य पालटले आणि दक्षिण आफ्रिकेला वीस धावांनी विजय मिळवून दिला. या सामन्याने क्रिकेट विश्वाला क्षेत्ररक्षणातील पहिला सुपरस्टार मिळाला.
२७ जुलै १९६९ रोजी नाताळ प्रांतात जन्मलेला जोनाथन उर्फ जाँटी रोड्स हा निव्वळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर संघात स्थान मिळवत असे. १९९२ साली क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जाँटीची दक्षिण आफ्रिका हॉकी संघातही निवड झाली होती. पण १९९२ च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये दक्षिण आफ्रिका संघ पात्र न ठरल्याने जाँटीचा हाॅकीऐवजी क्रिकेट प्रवास सुरू झाला. निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक झालेल्या जाँटीने आयपीएलमध्ये प्रथम मुंबई इंडियन्स आणि नंतर किंग्स इलेव्हन पंजाबच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची धुरा समर्थपणे वाहिली. दक्षिण आफ्रिका पर्यटनाची भारतात जाहिरात करणारा जाँटी याने भारतीय संस्कृतीतून प्रेरणा घेत आपल्या मुलीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवले.
ॲलन बॉर्डर आणि जाँटी रोड्स यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस
Show Buttons
Hide Buttons