Happy birthday MSD

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन
७ जुलै

Winning every format of ICC tournaments, securing 1st rank for India in Test cricket, bringing fearless cricket in India. Outstanding record for statistically minded people. Mr. Cool.

Happy birthday Mahendra Singh Dhoni.

मला षटकार मारून भारताला विश्वचषक जिंकवायचा आहे हे ध्येय बाळगणार्‍या महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची धावसंख्या ११४ असताना विराट कोहली बाद झाला आणि संपूर्ण विश्वचषक गाजवणाऱ्या युवराज सिंग ऐवजी स्वतः माही खेळपट्टीवर उतरला. ‘कॅप्टन कूल’ असे बिरुद मिरवणाऱ्या माही याने षटकार मारत २८ वर्षांनंतर भारताला विश्वचषक जिंकून देत आपले स्वप्न पूर्ण केले. ७ जुलै १९८१ या दिवशी रांची येथे जन्मलेला माही सुरुवातीला फुटबॉलमध्ये रमत असे. पण शाळेच्या क्रिकेट संघात यष्टीरक्षक नसल्याने फुटबॉलमध्ये गोलकीपर असलेल्या धोनीची शाळेच्या क्रिकेट संघात वर्णी लागली. रांची काय किंवा झारखंड, येथे क्रिकेटची परंपरा तर सोडा पण येथून एकही क्रिकेटपटू भारतासाठी खेळला नव्हता. पण २००४ साली बांगलादेशविरुद्ध एक दिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या माहीची भारतीय क्रिकेट संघात जागा पक्की झाली ती कायमचीच.

२००७ साली धोनीची दक्षिण आफ्रिका येथील पहिल्यावहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून नेमणूक झाली. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची लढत होती ती कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. भारताच्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १९ षटकात पाकिस्तानची धावसंख्या होती ९ बाद १४६. शेवटच्या षटकात पाकिस्तानला जिंकण्यासाठी सहा चेंडूत १२ धावा हव्या होत्या. आर. पी. सिंग, श्रीसंत आणि इरफान पठाण यांच्या वाट्याची प्रत्येकी चार षटके टाकून झाली होती. मिसबाह उल हक ला शेवटचे षटक टाकण्यासाठी हरभजनचा पर्याय धोनीकडे उपलब्ध होता. पण हरभजन या घडीला याॅर्कर टाकू शकणार नाही हे धोनीच्या चाणाक्ष बुद्धीने ताडले आणि नवख्या जोगिंदर शर्मावर त्याने विश्वास टाकला. जोगिंदरच्या दुसऱ्याच चेंडूवर मिसबाहने षटकार मारल्याने भारत हा सामना घालवणार की काय अशी स्थिती होती. पण धोनीने त्याला धीर दिला आणि पुढच्याच चेंडूवर मिसबाह श्रीसंतच्या हातात झेल देऊन बाद झाला आणि भारताने टी-20 विश्वचषक जिंकला.

या स्पर्धेमुळे धोनीचे नेतृत्वगुण प्रकर्षाने जाणवले. अगदी युसूफ पठाणला सलामीवीर म्हणून पाठवणे असो किंवा जोगिंदरला शेवटचे षटक देणे असो. २००७ साली टी-20 विश्वचषक स्पर्धा, २०११ साली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आणि २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तीनही स्पर्धा जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार. धोनी एक नेता म्हणून खूपच आदर्श होता. २०११ साली विश्वचषक जिंकल्यावर सर्व खेळाडूंनी मैदानाला विजयी धाव घेताना धोनीला खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मात्र ‘हा मान सचिनचा’ असे खुणावत सचिनला खांद्यावर उचलण्यास सांगितले. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि यशात सर्व खेळाडूंचा वाटा आहे असेच तो मानतो. कर्णधारपदावरून पायउतार होण्याअगोदर भारतीय क्रिकेटला विराट कोहलीच्या रुपात कर्णधारपदाचा नवा वारसदार धोनीने घडवला. शांत स्वभाव आणि कठीण समयी अचूक निर्णय घेण्याची धाडसी वृत्ती यामुळे धोनीने भारताला क्रिकेटविश्वात अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवले.

महेंद्रसिंग धोनी याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

©️आशिष पोतनीस

Show Buttons
Hide Buttons