For our genration he is the Don Bradman of Indian Cricket ! Let us wish him on his Birthday .

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

१० जुलै
आद्यदेवताभ्यो नमः | ही काय पूजा मांडली आहे का? नाही. सचिन तेंडुलकरला आपण क्रिकेटचा देव मानतो, पण त्या अगोदर भारतीय क्रिकेटमध्ये देवत्व प्राप्त केलेला खेळाडू म्हणजे सुनील मनोहर गावस्कर. आज गावस्कर यांचा वाढदिवस. जुलै महिना हा मुंबईतील मुसळधार पावसाचा महिना. धावांचा पाऊस पाडणारे गावस्कर भर पावसातच १० जुलै १९४९ रोजी मुंबईत जन्मले. बहुदा हे विधात्याचीच योजना असावी की भर पावसात जन्मलेला हा बालक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांची बरसात करेल. पाच फूट पाच इंच उंचीच्या गावस्कर यांनी निधड्या छातीने आणि सरळ बॅटने महाकाय जलदगती गोलंदाजांचा नुसता सामनाच नाही केला, पण खोर्‍याने धावाही जमवल्या आणि ते गोलंदाज कोण?होल्डर, होल्डिंग, रॉबर्ट्स, गार्नर, मार्शल, क्राॅफ्ट, लिली, थाॅमसन, स्नो, ओल्ड, विलीस, बोथम, इमरान, सरफराज नवाझ, सिकंदर बख्त, हॅडली, केर्न्स …यादी संपता संपत नाही. तेही हेल्मेटविना, एकही चेंडू त्यांच्या अंगाला इजा करू शकलेला नाही. क्रिकेटचे तंत्र शिकण्याचं गावस्कर हे चालतं बोलतं पुस्तकच जणू. स्ट्रेट ड्राईव्ह हा त्यांचा हुकमी फटका.
१९७१ साली विंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण करताना त्यांनी चार कसोटीत ७७४ धावा कुटल्या आणि भारतालाच नव्हे तर जगाला आदर्श सलामीवीर कसा असावा याचा धडा मिळाला. या दौऱ्यातील आठ डावात १ द्विशतक, ३ शतके आणि ३ अर्धशतके झळकावताना गावस्कर हे फक्त एका डावातच एक धाव काढून बाद झाले होते. महान अष्टपैलू खेळाडू सर गॅरी सोबर्स गावस्कर यांच्याबाबत म्हणतात, “साठच्या दशकात भारताकडे खूप चांगले क्रिकेटपटू होते. परंतु एक संघ म्हणून ते कमजोर होते. पण १९७१ साली सुनीलने खूप मोठा फरक घडवला. सुनीलला रोखू शकेल अशी गोलंदाजीच आमच्याकडे नव्हती. त्याने आमच्याविरुद्ध नव्हे तर नंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया विरुद्धही खूप धावा केल्या.” या दौर्‍यात गावस्कर यांना साथ लाभली ती दिलीप सरदेसाई यांची. या दौऱ्यानंतर सरदेसाई गावस्करबाबत म्हणतात,” गावस्करची एकाग्रता आणि जबाबदार फलंदाजी याने मी खूपच प्रभावित झालो. तो खूपच प्रगती करेल आणि येत्या काही वर्षात माझे भविष्य खरं करून दाखवेल.” गावस्कर यांनी सर्व भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करत १०००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला कसोटीपटू हा मान मिळवला. सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ शतकांचा विक्रमही त्यांनीच सर्वात आधी मोडला. क्रिकेटची पंढरी लाॅर्ड्स येथे कसोटी शतक न झळकावता येण्याची जखम मात्र त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस प्रथम श्रेणी सामन्यात शेष विश्व संघाकडून खेळताना शतक झळकावून भरून काढली. विंडीज तोफखान्यासमोर तेरा शतके करणारे गावस्कर यांच्यामुळे भारताचे तळाचे फलंदाजसुद्धा प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा सरळ बॅटने मुकाबला करू लागले हे त्यांचे भारतीय क्रिकेटला मोलाचे योगदान.
१९८५ साली ऑस्ट्रेलियात बेन्सन अँड हेजेस स्पर्धेत कर्णधार गावस्कर यांनी भारताला विजयपथावर नेताना या स्पर्धेत एकाही सामन्यात पराभूत न होण्याचा पराक्रम केला. १९८१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कर्णधार गावस्कर यांच्या कारकीर्दीतील एक वादग्रस्त घटना घडली. मेलबोर्न येथील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात वादग्रस्त पंच व्हाईटहेड यांनी लिलीच्या गोलंदाजीवर गावस्कर यांना ७० धावांवर खेळत असताना पायचीत दिले. गावस्कर यांनी बॅटची कड लागल्याचे पंचांच्या निदर्शनास आणूनही पंचांनी  निर्णय बदलला नाही. यामुळे नाराजीने तंबूत परतत असताना गावस्कर यांना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शिव्या दिल्या. यामुळे चिडलेल्या गावस्कर यांनी चेतन चौहानला सुद्धा मैदान सोडून पॅव्हेलियनकडे घेऊन जाण्यास निघाले. पण मॅनेजर दुर्रानी यांच्या मध्यस्थीमुळे वातावरण निवळलं आणि सामना पुढे सुरू झाला. नंतर ऑस्ट्रेलियाला ८३ धावांत गुंडाळून भारताने हा सामना ५९ धावांनी जिंकला. १९७५ च्या पहिल्या विश्वचषकातील उद्घाटनाच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध ३३५ धावांचा पाठलाग करताना १७४ चेंडूत नाबाद ३६ धावांच्या कुर्मगती खेळीने गावस्कर टीकेचे धनी झाले होते.
भारतीयांना शतकाची सवय लावणाऱ्या सुनील गावस्कर यांचा बालपणीचा एक किस्सा अतिशय प्रसिद्ध आहे. नवजात सुनील यांची एका कोळी मुलासोबत इस्पितळात अदलाबदली झाली होती. पण गावस्करांच्या काकांनी हे ओळखले ते सुनीलच्या डाव्या कानाच्या पाळीला असलेल्या बारीक छिद्रामुळे. याबद्दल ‘सनी डेज’ या आपल्या आत्मचरित्रात गावस्कर लिहितात,”जर का नानाकाकांनी ओळखलं नसतं तर आज मी पश्चिम किनार्‍यावर मासेमारी करीत असतो.” आणि आम्ही आमच्या आद्यदेवतेला मुकलो असतो!
सुनील गावस्कर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम् |
©️आशिष पोतनीस
Show Buttons
Hide Buttons