Born on 3rd July and 400 plus Test wickets for these 2 bowlers.

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन३ जुलै
कसोटी क्रिकेट मध्ये सर्वप्रथम चारशे बळी घेणाऱ्या सर रिचर्ड हॅडली यांचा आज वाढदिवस. ३ जुलै १९५१ रोजी जन्मलेल्या  हॅडलीची गणना आजही सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये होते. आपल्या सतरा वर्षाच्या कसोटी कारकिर्दीत ८६ कसोटीत खेळताना ४३१ बळी टिपले. हा त्याचा विश्वविक्रम पुढे कपिलने मोडला. हॅडली, बोथम, कपिल आणि इम्रान या समकालीन अष्टपैलूंमध्ये हॅडली हा जगातील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात एक हजार धावा आणि 100 बळी घेणारा पहिला क्रिकेटपटू. आपले वडील वॉल्टर हॅडली यांच्याकडून क्रिकेटचा वारसा रिचर्ड बरोबर त्याचे भाऊ डेल आणि बॅरी यांच्याकडेही आला. सुरुवातीला न्यूझीलंड संघात हॅडलीचे स्थान डळमळीत होते; पण १९७८ साली २६ धावात ६ बळी घेत न्यूझीलंडला पाहुण्या इंग्लंडवर प्रथमच विजय मिळवून देण्यात हॅडलीचा सिंहाचा वाटा होता.
फलंदाजाला चकवल्यावर जलदगती गोलंदाज तीक्ष्ण नजरेने त्याच्याकडे रोखून बघताना आपण कित्येक वेळा पाहिले आहे. पण हॅडली अशी प्रतिक्रिया  देताना कधीही दिसला नाही. याउलट फलंदाज चकित झाल्यावर फलंदाजाच्या कडे बघून स्मितहास्य करतानाच हॅडली दिसला. हॅडलीच्या गोलंदाजीची धार त्याने आपला रनअप कमी केल्यावर प्रचंड प्रमाणावर वाढली. याचबरोबर नव्या चेंडूवर दोन्ही स्विंग करणाऱा हॅडली जुन्या चेंडूवर उत्तम लेगकटर्स टाकत असे. उत्तम वेगवान गोलंदाज असे नाव कमावणाऱ्या हॅडलीने कसोटीत २ शतकांसह तीन हजारावर धावा केल्या आहेत. सभ्य गृहस्थ हॅडलीने निवृत्तीनंतर न्यूझीलंड निवड समितीचा अध्यक्ष म्हणूनही काम केले. आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश असलेल्या हॅडलीची आतड्याच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया २०१८ मध्ये झाली.
भारतातर्फे कसोटीत सर्वप्रथम हॅट-ट्रिक कोणी घेतली? १९३२ साली आपला कसोटी प्रवास सुरु करणाऱ्या भारताला आपला पहिला कसोटी हॅट-ट्रिक वीर मिळाला तो २००१ साली. हरभजन सिंग याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ईडन गार्डन्स कोलकाता येथे पॉंटिंग, गिलख्रिस्ट आणि वॉर्नला लागोपाठ बाद करत भारतातर्फे प्रथम हॅट्रिक घेतली. आज हरभजन सिंग उर्फ भज्जी याचाही वाढदिवस. आपल्या कारकीर्दीत ४१७ कसोटी बळी आणि २६९ एक दिवसीय बळी घेणाऱ्या हरभजनने कसोटीत दोन शतकेही झळकावली आहेत. भारतातर्फे कुंबळे आणि कपिलच्या नंतर सर्वाधिक बळी घेणारा हरभजन हा तिसरा भारतीय. त्याचबरोबर मुरलीधरन पाठोपाठ सर्वाधिक बळी घेणारा भज्जी हा दुसरा ऑफस्पिनर आहे. दुसरा या चेंडूने बऱ्याच फलंदाजांना चकवणाऱा हरभजनन हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक यशस्वी झाला. रिकी पॉंटिंगला आपल्या कारकीर्दीत दहा वेळा बाद करणाऱ्या हरभजनचा कसोटीतील तीनशेवा बळी देखील रिकी पॉंटिंग हाच होता.
हरभजनच्या कारकिर्दीत दोन अतिशय वादग्रस्त घटना घडल्या आहेत. सिडनी कसोटीत हरभजन ६३ धावांवर खेळत असताना त्याच्यात आणि अँड्र्यू सायमंड्स यांत शाब्दिक बाचाबाची झाली. यावरून भज्जीने वांशिक शेरे मारल्याची तक्रार सायमंड्सने सामनाधिकारी माईक प्राॅक्टरकडे केली. यावर माईक प्राॅक्टर यांनी हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घातली. यावर भारताने आक्षेप नोंदवत दौरा रद्द करण्याची धमकी दिली. शेवटी हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायाधीश जॉन हँप्सन यांनी येथे निर्णय देताना माईक प्रॉक्टर यांनी ठोठावलेला तीन सामन्यांच्या बंदीचा निर्णय रद्द केला आणि असभ्य भाषेबद्दल हरभजनच्या सामन्याच्या फी मधून ५० टक्के रक्कम कापून घेतली. 
आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्यात श्रीसंतने वी मुंबई इंडियन्सचे फलंदाज बाद झाल्यावर केलेल्या हातवाऱ्यांमुळे हरभजन खूप संतापला होता. सामना संपल्यावर हस्तांदोलन करताना मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या हरभजनने श्रीसंतच्या श्रीमुखात भडकवली. याची दखल घेत सामनाधिकारी फारुख इंजिनियर यांनी हरभजनवर उर्वरित आयपीएल मोसमाकरता बंदी घातली आणि त्या मोसमातील संपूर्ण मानधन कापण्याची शिक्षा दिली. यंदाच्या २०१९ च्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा हरभजन आज ४२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
सर रिचर्ड हॅडली आणि हरभजन सिंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons