This Australian bowler took 300 wickets in just 56 Tests-His Birthday today !

This Australian bowler took 300 wickets!
प्रतिभावंत क्रिकेटपटू आणि वादग्रस्त वर्तन हे बहुदा हातात हात घालूनच जन्माला आले असावेत. आज अशाच एका महान प्रतिभावंत पण तितक्याच वादग्रस्त असलेल्या क्रिकेटपटूचा वाढदिवस. डेनिस लिली. १८ जुलै १९४९ रोजी जन्मलेला सहा फूट उंचीचा आडदांड ऑस्ट्रेलियन लिलीने जलदगती गोलंदाजीचा आदर्श जगासमोर ठेवला. १९७१ ते १९८४ या कालखंडात ७० कसोटी खेळणाऱ्या लिलीने ३५५ बळींचा तत्कालीन विश्वविक्रम केला होता. ३०० बळी लिलीने फक्त ५६ कसोटीतच घेतले होते. लिलीच्या गोलंदाजीची दहशत अशी होती की १९७१-७२ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेष विश्व संघात झालेल्या पर्थ येथील अनधिकृत कसोटीत शेष विश्व संघाच्या बलाढ्य फलंदाजीला लिलीने एकहाती गुंडाळले. गावस्कर, सोबर्स, लॉईड, इंजिनीयर, ग्रेग यासारख्या फलंदाजांना बाद करताना पहिल्या डावात २९ धावात ८ बळी लिलीने घेतले. पण पुढील मोसमात पाठीच्या दुखण्याने लिलीचा वेग मंदावला. सत्तरच्या दशकात जेफ थॉमसन आणि डेनिस लिली या जोडगोळीने आपल्या वेगवान माऱ्याने संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ निर्माण केली होती.
लिलीने केवळ गोलंदाजीनेच नव्हे तर आपल्या विक्षिप्त वागणुकीमुळेही खळबळ माजवली होती. डिसेंबर १९७९ च्या ॲशेस मालिकेत पर्थ येथिल सामन्यात लिली ॲल्युमिनीयमची बॅट घेऊन फलंदाजीला उतरला. त्या काळी अशी बॅट वापरू नये असा काही क्रिकेटमध्ये नियम नव्हता. पण शांत स्वभावाच्या इंग्लिश कर्णधार माईक ब्रेअर्लीने पंचांकडे तक्रार केली की या बॅटमुळे चेंडूचा आकार खराब होत आहे आणि हे वर्तन खिलाडूवृत्तीला मारक आहे. यामुळे चिडलेल्या लिलीने पॅव्हेलियनच्या दिशेने बॅट भिरकावली. पण या घटनेबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने लिलीवर कोणतीही कारवाई केली नाही. आपला मित्र आणि व्यावसायिक भागीदार ग्रॅहम मोनॅघन याच्या कल्पनेतील ही ‘काँबॅट’ नावाची ॲल्युमिनीयम बॅट वापरणे ही एक मार्केटिंगची युक्ती होती असे लिली आपल्या आत्मचरित्रात लिहितो. या प्रकरणात लिलीने पेटून उठावे अशीच काहीशी निती चॅपेलची होती असेही लिली पुढे लिहीतो. यामुळेच लिलीने इंग्लिश फलंदाजी गुंडाळत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. लिली आणि मियांदाद यांच्यातील हातघाईचा प्रसंग कोण विसरेल? ‘खिलाडूवृत्तीला काळीमा फासणारी ही घटना’ असे वर्णन बॉबी सिंप्सन यांनी  केले होते. १९८१ साली लीड्स येथे ऑस्ट्रेलियाची मजबूत स्थिती असताना धावफलकावर एक बेटिंगचा फलक झळकला. “इंग्लंडच्या विजयावर एका पौंडाला पाचशे पौंडाचा भाव.” यावर गंमत म्हणून लिली आणि मार्श यांनी तिसऱ्याच व्यक्तीमार्फत इंग्लंडवर बोली लावली. मजबूत स्थितीतील ऑस्ट्रेलिया ही कसोटी हरली आणि लिली-मार्श  यांनी साडेसात हजार पौंडाची कमाई केली.
६ जानेवारी १९८४ या दिवशी सिडनी येथे लिली, चॅपेल आणि मार्श यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि ऑस्ट्रेलियाच्या एका गौरवशाली परंपरेची सांगता झाली. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर लिलीच्या सहकार्याने १९८७ साली भारतात एम् आर एफ पेस फाउंडेशनची स्थापना झाली. लिलीच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ, प्रसाद, इरफान पठाण, झहीर खान, श्रीसंत असे एकापेक्षा एक उत्तम जलदगती गोलंदाज भारतात तयार झाले. लिलीने २०१२ पर्यंत या फाउंडेशनच्या संचालकांची भूमिका पार पाडली. याच फाउंडेशन मधून प्रशिक्षण घेतलेला चामिंडा वास म्हणतो,” येथे आपण जे काही शिकता ते ज्ञान आणि अनुभव मिळवण्यासाठी पुरेसे आहे. पण त्याचबरोबर उत्तम वेगवान गोलंदाज होण्याविषयी सर्व काही या फाउंडेशनमध्ये शिकवले जाते.”
डेनिस लिली याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस
Show Buttons
Hide Buttons