This bowler has 439 wickets in Test cricket but not played 100 Tests!

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन२७ जून
दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या डेल स्टेन याचा आज वाढदिवस.  २७ जून १९८३ रोजी जन्मलेल्या स्टेनने ९३ कसोटीत ४३९ बळी घेतले आहेत.  ३०० पेक्षा जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत प्रत्येक बळीसाठी सर्वात कमी चेंडू (४२.३) मोजणारा स्टेन हा ताशी दीडशे किमी या वेगाने गोलंदाजी करत असे. भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि दोन्ही बाजूंना स्विंग करण्याची क्षमता यामुळे स्टेन अल्पावधीतच दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीचा आधारस्तंभ झाला. २००४-०५च्या मोसमात इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण करणारा स्टेन याच्या कारकिर्दीतील २००७ ते २०११ ही वर्षे अतिशय यशस्वी होती. २००८ साली आयसीसी कसोटीपटूचा मानकरी असलेला स्टेन याची २०१४ साली विस्डेन पंचकात निवड झाली होती.

सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल खेळणारा स्टेन याला नंतर डेक्कन चार्जर्स हैदराबाद आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी जवळजवळ सव्वा दोन कोटी रुपयांचे मानधन देऊन स्वतःच्या संघात स्थान दिले.


२०११ चा विश्वचषक भारताने जिंकला हे तर आपणा सर्वांनाच ठाऊक आहे; परंतु या स्पर्धेत भारत केवळ एकच सामना साखळीत हरला तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्याला कारणीभूत होता तो डेल स्टेन. भेदक डोळे आणि तट्ट फुगलेल्या नसा असलेल्या दणकट स्टेनने भारताचे पाच बळी टिपले. शतकवीर तेंडुलकर संघाची धावसंख्या २६७ असताना बाद झाला आणि स्टेनच्या झंझावातासमोर भारताचे उर्वरित आठ बळी केवळ २९ धावांतच गडगडले. सचिन बाद झाल्यावर सामनावीर स्टेन याच्या वेगवान माऱ्यासमोर इतरांनी केवळ खेळपट्टीवर हजेरीच लावली.

वेगवान गोलंदाजांच्या पाचवीला पूजलेल्या दुखापतीने स्टेनलाही ग्रासले. वयाच्या तिसाव्या वर्षी मांडीच्या सांध्याला झालेल्या दुखापतीमुळे मात्र स्टेन ची पूर्वीची भेदकता कमी होत गेली.

२०१३ साली प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले डेल स्टेन बाबत लिहितो, “सध्याच्या खेळाडूंना कमी लेखणे आणि पूर्वीच्या खेळाडूंचे गुणगान करणे हा मानवी स्वभाव आहे. पण आता मात्र सर्वश्रेष्ठ गोलंदाजांच्या यादीत स्टेनची गणना करण्याची वेळ आली आहे.”

डेल स्टेन याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons