ह्या खेळाडू ला पाक मध्ये पायचीत देणे पाप होते!

आज १२ जून. आज अशा एका पाकिस्तानी क्रिकेटपटूचा वाढदिवस आहे, ज्याने भारताविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खोर्‍याने धावा काढल्या आहेत. जावेद मियांदाद. १२ जून १९५७ रोजी कराची येथे गुजराती मेमन कुटुंबात जन्मलेल्या मियांदाद याने १९७६ साली लाहोर येथे पदार्पण केले. पदार्पणातच शतक करणाऱ्या मियांदादला ‘या दशकातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू’ असा किताब पाकिस्तानचे पहिले कर्णधार अब्दुल हफिझ कारदार यांनी बहाल केला. मियांदादने कसोटी सामन्यात आपल्या कारकीर्दीतील सर्वाधिक धावा भारताविरुद्ध केल्या. वयाच्या बावीसाव्या वर्षीच पाकिस्तान संघाचे नेतृत्व करण्याची संधीही त्याला मिळाली आणि ती देखील झहीर अब्बास, इम्रान खान, सरफराज नवाझ, वासिम बारी, माजिद खान यासारखे वरिष्ठ खेळाडू संघात असताना.
मियांदाद आणि वाद यांचे फारच सख्य. कर्णधार म्हणून प्रथमच विदेशी दौऱ्यात पर्थ येथे लिली-मियांदाद यांच्यातील हाणामारी क्रिकेट रसिकांनी नक्कीच ऐकली असेल. पर्थ येथे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी ५४३ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवल्यावर टेरी आल्डरमन याने पाकिस्तानचे दोन गडी झटपट बाद केले. कर्णधार मियांदाद आणि मन्सूर अख्तर हे लिली आणि आल्डरमनच्या झंझावाताचा मुकाबला करीत होते. लिलीच्या गोलंदाजीवर मियांदादने स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळला आणि धाव घेण्यासाठी मियांदाद चेंडूकडे पहात पळू लागला. अचानक लिली त्याच्या मार्गात आला आणि बॉबी सिंप्सन यांनी या प्रसंगाचे ‘क्रिकेट इतिहासातील सर्वात लाजिरवाणी घटना’ असा उल्लेख केला. अचानक समोर आल्यावर मियांदादने त्याच्यावर बॅट उगारल्याचे फोटो वृत्तपत्रांत झळकले. प्रत्यक्षदर्शींच्या मते यात लिलीची चूक होती. पण लिलीने आपल्या आत्मचरित्रात मियांदादने शिव्या दिल्या असे लिहिले आहे. सत्य काहीही असो पण सभ्य गृहस्थांचा खेळाला मात्र या घटनेने काळिमा फासला गेला असेच म्हणावे लागेल.
तंत्रशुद्ध आणि आकर्षक फलंदाजी यांचा पूर्णपणे अभाव असलेला मियांदाद हा पाकिस्तानात कधीच पायचीत झाला नाही, ही बहुदा पाकिस्तानी पंचांची कृपा. १९९२ च्या विश्‍वचषक स्पर्धेत प्रथमच भारत-पाकिस्तान आमने-सामने आले होते. हा सामना गाजला तो किरण मोरेची नक्कल करताना मियांदादने मारलेल्या माकड उड्यांमुळे. यष्टिरक्षक किरण मोरेने सचिनच्या गोलंदाजीवर वारंवार अपील करताना उड्या मारल्या, यावर त्रासलेल्या मियांदादने मोरेची नक्कल केली. पण मियांदादच्या या माकडउड्यांमुळे क्रिकेट जगताला मात्र हसू आवरेना. पण आजही भारतीयांना मियांदाद आठवतो तो १९८६ च्या ऑस्ट्रेलेशिया चषकातील चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकारामुळे.
जावेद मियांदाद याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस
Show Buttons
Hide Buttons