अजिंक्य रहाणे च्या काही खास गोष्टी आपणास माहीत आहेत का ?

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

६ जून
आज सहा जून. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणे याचा आज वाढदिवस. सहा जून १९८८ रोजी नगर जिल्ह्यात जन्मलेला अजिंक्य उर्फ जिंक्स ज्याने नुकतीच संपन्न झालेली भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका भारताला २-१ अशी जिंकून दिली. ॲडलेड येथे दुसऱ्या डावात केवळ ३६ धावात खुर्दा उडाल्याने ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना सहज खिशात टाकला. भारतीय कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर गेल्यावर संपूर्ण ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय संघाची लिंबूटिंबू म्हणून चेष्टा केली. रहाणेने दुसऱ्या कसोटीत कर्णधारपदाची धुरा सांभाळताना कर्णधाराला साजेशी शतकी खेळी करत मेलबोर्न येथे भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर ३२ वर्षे ब्रिस्बेनवर अपराजित असलेल्या ऑस्ट्रेलियाला खडे चारुन रहाणेने भारताला २-१ असा मालिका विजय मिळवून दिला. या कसोटी विजयाचे मोल काही औरच. या सामन्यात भारतीय गोलंदाज नटराजन आणि सुंदर हे पदार्पण करीत होते. तर या सामन्याअगोदर नवदीप सैनी (१), शार्दुल ठाकुर (१)आणि मोहम्मद सिराज (२) मिळून केवळ चारच कसोटी सामने खेळले होते. 
लहानपणी डोंबिवलीत क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या रहाणेला नंतर मात्र माजी कसोटीवीर प्रवीण आमरे याचे प्रशिक्षण लाभले. लॉर्ड्सवरील आपल्या पहिल्या कसोटीत खेळताना शतक झळकावणारा अजिंक्य रहाणे हा दिलीप वेंगसरकर, सौरभ गांगुली आणि अजित आगरकर यांच्या नंतरचा असा पराक्रम करणारा चौथा भारतीय ठरला. रहाणेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पहिले कसोटी शतक न्यूझीलंड विरुद्ध बेसिन रिजर्व वेलिंगटन येथे झळकावले. पण या त्याच्या झुंजार शतकावर पाणी पडलं ते ब्रेंडन मॅकलमच्या त्रिशतकाने. कसोटीत १२ शतके करणाऱ्या रहाणेने एकदिवसीय सामन्यात तीन आणि टी-20 सामन्यात दोन शतके झळकावली आहेत. सुरुवातीला मुंबई इंडियन्सकडून खेळणारा जिंक्स सध्या राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीची धुरा सांभाळत आहे. आपली बालमैत्रीण राधिका धोपावकर हिच्याबरोबर विवाहबद्ध होणाऱ्या अजिंक्य रहाणेला आर्या नावाची दीड वर्षाची मुलगी आहे.
१९८७ च्या विश्‍वचषक स्पर्धेत इंग्लंडचे नेतृत्व करणारा माईक गॅटिंग याचाही आज वाढदिवस. ६ जून १९५७ रोजी लंडन येथे जन्मलेल्या माइक गॅटिंग याने ७९ कसोटी आणि ९२ एकदिवसीय सामन्यात इंग्लंडची प्रतिनिधित्व केले. मधल्या फळीतील उपयुक्त फलंदाज असलेल्या गॅटिंगने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात १९७७-७८ च्या मोसमात पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं. गॅटिंगची क्रिकेट कारकीर्द वादग्रस्त किंवा सनसनाटी म्हणता येईल. १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बॉर्डरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप फटका मारण्याच्या प्रयत्नात गॅटिंग यष्टीरक्षक ग्रेग डायरकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याच्या या बेजबाबदार फटक्यामुळे इंग्लंडने विश्वचषक जिंकण्याची संधी गमावली. 
यानंतर लगेचच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यातील फैसलाबाद कसोटीत कर्णधार गॅटिंग आणि पाकिस्तानी पंच शकूर राणा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. खरं तर यात गॅटिंगची चूक नव्हती. गॅटिंगने नॉन स्ट्रायकर सलीम मलिकला सांगितले की तो डेव्हिड केपलला लाँग लेग वरून पुढे आणतोय. एडी हेमिंग्ज चेंडू टाकत असताना गॅटिंगने केपलला खूण करून आहे त्या जागी थांबण्यास सांगितले. त्यावरून शकूर राणाने खेळ थांबवला आणि गॅटिंगशी वाद घातला. हा वाद प्रचंड चिघळला आणि नंतर गॅटिंगला काहीही चूक नसताना शकूर राणाला माफीनामा लिहून द्यावा लागला. त्या अगोदर १९८६ च्या विंडीज दौर्‍यात माल्कम मार्शलचा वेगवान चेंडू गॅटिंगच्या नाकाला लागला आणि त्याच्या नाकाचे हाड मोडले. पुढचा चेंडू टाकण्यासाठी जेंव्हा मार्शलने चेंडू हाती घेतला तेव्हा गॅटींगच्या नाकाचे मांस चेंडूला चिकटलेले मार्शलला दिसले. शेन वॉर्न ने ४ जून १९९३ या दिवशी गॅटिंगला त्रिफळाचीत केले तो चेंडू या शतकातील सर्वोत्तम चेंडू मानला जातो. डाव्या यष्टीच्या एक फूट बाहेर पडलेला वाॅर्नचा चेंडू एवढा वळला की गॅटिंगला काही समजण्याच्या आतच त्याच्या उजव्या यष्टीवरील बेल उडवून गेला. निवृत्त झाल्यावर प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून काम करणारा गॅटिंग सध्या एम सी सी चा निवडून आलेला सदस्य आहे.
अजिंक्य रहाणे आणि  माईक गॅटिंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
©️आशिष पोतनीस

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons