He was the best left arm fast bowler before Wasim Akram in Test Cricket!

“तू आज इतिहास घडवलास” ही शाबासकी दिली होती दस्तुरखुद्द सर डॉन ब्रॅडमन यांनी टाय टेस्ट नंतर डेव्हिडसन यांना. आज १४ जून. ॲलन डेव्हिडसन यांचा वाढदिवस. १४ जून १९२९ रोजी न्यू साउथ वेल्स राज्यात जन्मलेले डेव्हिडसन १९५३ ते १९६३ या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे एक अग्रगण्य अष्टपैलू क्रिकेटपटू होते. आजच्या घडीला वासिम अक्रम हा जरी सर्वोत्तम डावखुरा स्विंग गोलंदाज असला तरी त्याच्या उदया अगोदर ॲलन डेव्हिडसन हेच सर्वोत्तम डावखुरे जलदगती गोलंदाज मानले गेले आहेत. कसोटीतील दोन्ही डावात मिळून शंभरपेक्षा जास्त धावा आणि दहापेक्षा अधिक बळी घेणारे ॲलन डेव्हिडसन हे पहिलेच कसोटीपटू. त्यांनी ही कामगिरी केली ती कसोटी इतिहासात सर्वोत्तम मानल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज यांच्यातील टाय टेस्टमध्ये.
डेव्हिडसन यांनी कसोटी पदार्पण केले ते इंग्लंड विरुद्ध ११ जून १९५३ रोजी. परंतु डेव्हिडसन यांच्या कारकिर्दीला झळाळी मिळाली ती रे लिंडवॉल आणि कीथ मिलर यांच्या निवृत्तीनंतर.  १९५७-५८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून डेव्हिडसन यांना नवा चेंडू हाताळायला मिळाला आणि बघता बघता डेव्हिडसन यांची कारकीर्द बहरली. लागोपाठच्या तीन मालिकांमध्ये ७८ बळी घेत डेव्हिडसन यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. पण १९६० सालची ब्रिस्बेन येथे खेळली गेलेली टाय टेस्ट म्हणजे डेव्हिडसन यांच्या कारकीर्दीतील हिऱ्याचे कोंदणच जणू. पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सहा बळी घेणारे डेव्हिडसन यांनी पहिल्या डावात ४४ धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे सहा गडी ९२ धावांत बाद झाल्यावर डेव्हिडसन आणि कर्णधार रिची बेनाॅ यांनी १३४ धावांची भागी करून ऑस्ट्रेलियाला विजयाच्या समीप आणले. दुर्दैवी धावचीतने डेव्हिडसन ८० धावांवर बाद झाले; पण सामना बरोबरीत सुटल्यावर महानायक डॉन ब्रॅडमन यांनी त्यांना शाबासकी देताना म्हणाले,”  ॲलन, तू आज इतिहास घडवलास!”
ॲलन डेव्हिडसन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Show Buttons
Hide Buttons