FOR OUR MARATHI READERS-What Greats Say About an INDIAN Cricket Writer of Sixties???

जादूगार क्रिकेटलेखनाचा
ना. सी. फडके हे माझ्या पिढीचे एक लोकप्रिय लेखक. माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढीला ते कादंबरीकार म्हणून अधिक ज्ञात होते. त्या काळात रोमॅटिक कादंबऱया लिहिणारे अनेक होते, पण प्रा. फडकेंच्या कादंबऱया विशेषतः आम्हाला भावत. कारण त्याला साहित्यिक दर्जा होता. भाषा सरळ, सोपी, मधाळ होती. त्यामुळे रोमँटिक प्रसंगाची वर्णनं वाचताना अंगावर रोमांच उठत असत. त्यांच्या नायकांच्या भूमिकेत आम्ही नकळत जात होतो. त्यांची नायिका ही आम्हाला आमची प्रेयसी  वाटे. त्या कादंबऱया वाचत आम्ही पौगंडावस्थेतून तारुण्यात कधी शिरलो ते आम्हाला कळलंच नाही. त्या काळात ‘कलेसाठी कला’, की ‘समाजासाठी कला’ वगैरे वाद साहित्यिक मंडळी फार उच्च स्तरावर घालत. एखादी भूमिका घेण्याएवढी त्या विषयाची जाण नसली तरी तो वादविवाद वाचावासा वाटे. मी कट्टर मुंबईकर, पण त्यावेळी पुण्याला गेलो की टिळक रोडवरून एक फेरी व्हायची. तिथे फिरताना ‘दौलत’ बंगल्याकडे बोट दाखवत, एकदा मला मित्र म्हणाला होता, ‘‘इथे ना. सी. फडके राहतात.’’ ते ऐकून पोटात आनंदाचं कारंजं फुटलं होतं. पण तिथे पाय वळवून घराची बेल वाजवायची कधी माझी हिंमत झाली नाही. मी तसा बुजरा नाही, पण एवढय़ा मोठय़ा व्यक्तीशी आपण पामर काय बोलणार? ही भीती असायची. आज हा लेख लिहिताना मला ते काल घडल्यासारखं आठवतंय.
त्याच काळात कधी तरी माझ्या हातात फडक्यांचे क्रिकेटविषयक लेख पडले. काही धक्के सुखद आणि अंगावर मोरपीस फिरवणारे असतात. तसा हा धक्का होता. मोरपीस अंगावरून फिरलं दोन गोष्टीसाठी. एक म्हणजे क्रिकेट हा माझा लाडका खेळ. त्यावर काहीही वाचायला मिळालं तर मी अधाशासारखं ते वाचून काढायचो. त्यात ते लिखाण शैलीदार असेल तर ते मनाच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये जपून ठेवलं जायचं. त्या व्हॉल्टमध्ये सर नेव्हील कार्डस नावाच्या महान इंग्लिश लेखकाच्या लेखांच्या थप्प्याच्या थप्प्या होत्या. त्यातली काही वाक्यं आजही सुभाषिताप्रमाणे मनावर कोरलेली आहेत. उदा. सर जॅक हॉब्जच्या सरळ बॅटच्या खेळीबद्दल आणि प्रत्येक चेंडू बॅटच्या मध्यावर घेण्याबद्दल त्यांनी लिहिलं होतं. ‘‘He middled every ball. Even if he edged it, he edged it from the middle of the edge.” किंवा ओल्डफिल्ड या ऑस्टेलियाचा यष्टिरक्षक खूप सभ्य होता. तो अपीलसुद्धा अत्यंत अदबीने फलंदाजाच्या भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीने करायचा. त्याच्याबद्दल लिहिताना सर नेव्हिल कार्डसने लिहिलं होतं, ‘‘He appealed with ball in one hand and apology in the other.”
असं लिहिणं कार्डस सोडून फक्त देवालाच शक्य आहे असं वाटणाऱया वयात मी ना. सी. फडकेंचं क्रिकेटवरचं लिखाण वाचलं आणि मनाशी म्हटलं, ‘‘नाही, नाही. कार्डसनंतर काही थेट देव नाही. कार्डसच्या बरोबरीने आमच्या मराठीत ना. सी. फडके आहेत.’’ आणि गंमत पाहा. त्यांच्या ‘‘अशा झुंजा, असे झुंजार!’’ हे क्रिकेटविषयक पुस्तक वाचताना त्यातल्या सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विजय मर्चंटच्या प्रस्तावनेतल्या एका वाक्यावर येऊन मी थबकलो. त्यांनी म्हटलं होतं, ‘‘He writes in such an interesting and pleasant to read manner and his language is so poetic that had he been able to devote as much time to Cricket writing as he has devoted to his many extremely popular novels, he would have Perhaps, been like Naville Cardus of India. In his case the gain to literature has been a loss to cricket.”
एका महान क्रिकेटपटूचे, ज्याने इंग्रजीतले अनेक मोठमोठे लेखक कोळून प्यायले आहेत त्या महान क्रिकेटपटूचे हे उद्गार आहेत.
सी. के. नायडू म्हणजे भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य! आजच्या पिढीला सांगायचं तर ते आज खेळत असते तर ते सचिन तेंडुलकरएवढे लोकप्रिय ठरले असते. त्यांनी अप्पासाहेब फडकेंच्या लेखनशैलीबद्दल आणि क्रिकेटच्या ज्ञानाबद्दल म्हटलंय, ‘‘त्यांची सामन्यांची वर्णनं सर्व क्रिकेट शौकिनांनी वाचावीत आणि जतन करून ठेवावीत या योग्यतेची आहेत. नेव्हील कार्डस हे इंग्लंडमधील सर्वश्रेष्ठ क्रिकेट समीक्षक समजले जातात. त्यांची समीक्षणं म्हणजे अभिजात साहित्याचे नमुने होत असे म्हटलं जातं. प्रोफेसर फडके हे भारताचे नेव्हील कार्डस आहेत. त्यांच्या लेखनात सुबोधता आहे, कळकळ आहे, उद्बोधकता आहे आणि या गुणांच्या भरीला खास पौर्वात्य झगमगाट आहे. प्रा. फडक्यांचं पुस्तक वाचल्यानं आम्हा क्रिकेटपटूंमध्ये चमकदार खेळ करण्याची इर्षा उत्पन्न होईल असा माझा विश्वास आहे.’’
आता लंडनच्या क्रिकेट रिपोर्टिंग एजन्सीचे मिस्टर हॅरी गी काय लिहितात ते वाचा. ते म्हणतात, ‘‘फडके यांनी बोर्ड ऑफ कंट्रोलवर ज्या परखडपणे टीका केली आहे ती आम्हा इंग्लिश समीक्षकांना अपरिचित आहे, परंतु मला असं सांगण्यात आलं की, स्पष्टवक्तेपणा हे भारतीय वृत्तपत्रांचं वैशिष्टय़ आहे. प्रा. फडक्यांची पुस्तकं एवढी वाचनीय उतरली आहेत की ‘विस्डेन’च्या वार्षिकात या दौऱयाचं सिंहावलोकन करताना आम्हाला त्यांचा फार उपयोग होणार आहे.’’ दत्तू फडकर हे एकेकाळचे अग्रगण्य अष्टपैलू खेळाडू. त्यांनी अप्पासाहेबांना स्वतः लिहून कळवलं, ‘‘कसोटी सामना खेळला जात असताना सामना कोणत्या कोणत्या अवस्थेतून गेला याची तुम्ही केलेली वर्णनं एवढी रंगतदार आणि प्रभावी आहेत की ती वाचताना सामना आपण प्रत्यक्ष पाहतोय असं वाचकांना वाटतं. तुमची टीका थोडय़ा कठोर भाषेत लिहिलेली असली तरी ती रास्तच वाटते. तुमचा लेख वाचताना खात्री पटते की, या लेखाचा लेखक पहिल्या दर्जाचं क्रिकेट स्वतः खेळला असला पाहिजे आणि सामने कसे पाहावेत याची दुर्मिळ मार्मिक दृष्टी त्याच्याजवळ आहे.’’
एक महान खेळाडूने केलेले हे कौतुक हे फडकेंच्या क्रिकेटच्या जाणकारीला, शैलीला आणि वर्णन करण्याच्या कौशल्याला केलेला कुर्निसातच होता. जो माणूस कादंबरीत नुसत्या कल्पनेने प्रसंग खुलवू शकतो त्याला प्रत्यक्ष घडत असलेला प्रसंग शब्दबद्ध करायला काय कठीण जाणार? तो त्यांच्या हातचा मळ होता.
विजय मर्चंट, सी. के. नायडू, हॅरी गी यांची मातृभाषा मराठी नाही. त्यामुळे तुमच्या चेहऱयावर एक प्रश्नार्थक चिन्ह मला स्पष्टपणे दिसतंय की त्यांनी फडक्यांचं लिखाण वाचलं कुठे?
येस, तुमचा तर्क बरोबर आहे. अप्पासाहेबांनी मराठीइतकंच सुंदर लेखन इंग्रजीत केलंय. मराठी-इंग्रजी या दोन्ही भाषा या त्यांच्या प्रतिभेच्या रिद्धी-सिद्धी होत्या. त्यांनी बरीच वर्णनं चक्क प्रेस बॉक्समध्ये बसून केली आहेत आणि विजय मर्चंट, विजय हजारे, सी. के. नायडूसारखे खेळाडू त्यांना मान देत यावरून त्यांचं लिखाण किती प्रगल्भ असावं याची कल्पना येते. भाषाशैली हा फक्त मेकअप असतो. अस्सल सौदर्य नव्हे. पण भाषाशैलीत सौदर्य द्विगुणित करायची ताकद असते. अप्पासाहेबांच्या लिखाणात क्रिकेटच्या ज्ञानाचं मूलभूत सौदर्य होतं. त्यांच्या साहित्यिक स्पर्शाने ते त्यांनी खुलवलं आणि ते वाचनीय झालं.
त्यांनी मराठीत तर क्रिकेटवर विपुल लिखाण केलं. फक्त त्यांच्या अभिजात साहित्याच्या लखलखाटात हे लिखाण झाकोळलं गेलं. दर्जाअभावी नाही तर केवळ संख्याबळामुळे क्रिकेट लिखाण हे अल्पसंख्याक ठरलं. मध्यंतरी इंग्लंडच्या विस्डेनने एका वार्षिकात भारतीय भाषांमधल्या क्रिकेट पत्रकारितेवर प्रकाशझोत टाकण्याचं ठरवलं होतं. त्यावेळी मराठी पत्रकारितेवर लिहिण्याचा मान मला मिळाला. त्यात मी क्रिकेटच्या मराठी पत्रकारितेवर लिहिताना, ‘‘साहित्यिक, लेखन शैलीत क्रिकेटचं वर्णन लिहिण्यात प्रा. फडके अग्रेसर होते हे म्हटलं होतं आणि मला नीट स्मरत असेल तर सर नेव्हिल कार्डसबरोबर त्यांची तुलनाही केली होती. दुदैवाने त्या काळात मराठी वर्तमानपत्रांत ‘खेळाचं पान’ नव्हतं. खेळाला आजचं महत्त्व आलं नव्हतं. क्रिकेटपटू हे पहिल्या पानावर विराजमान होत नसत. आजच्या काळात जर ना. सी. फडके क्रिकेटवर लिहित असते तर आम्ही कुठे तोंडं लपवली असती देव जाणे? त्यांनी क्रिकेट लिखाणाचा मराठी पाया घातला. खरं तर त्यांनी आधी माळरानावर पाऊलवाट तयार केली. बघता बघता त्यांनीच रस्ता तयार केला. त्या रस्त्यावरून बाळ पंडित, वि. वि. करमरकर आणि त्यानंतर आमच्या पिढीने चालण्याची तसदी घेतली.
प्रत्येक कलाकारावर कुणाचं तरी गारुड असतं. लतादीदी नूरजहाँच्या गायनावर लुब्ध होत्या. किशोरकुमार तर सुरुवातीला कुंदनलाल सैगलची नक्कल करायचा. त्याचप्रमाणे माझ्या क्रिकेट लिखाणावर सर नेव्हिल कार्डस, प्रा. फडके, के. एन. प्रभू यांचा प्रभाव होता. माझी स्वतःची वेगळी वाट शोधण्यापूर्वी माझ्या लिखाणात ही माणसं डोकावताना दिसतील. मी लिहायला सुरुवात केली तेव्हा वर्तमानपत्राच्या दरबारात क्रिकेटला किंवा क्रिकेटपटूला मानाचं स्थान होतं. औरंगजेबाच्या दरबारात मिर्झाराजे जयसिंगांचं असावं एवढं. मला त्यामुळे परदेशी फिरण्याची संधी मिळाली. फडक्यांनी क्रिकेटवर लिहायला सुरू केली तेव्हा इतकी सुपीक जमीन त्यांना मिळालीच नाही, पण तरीही ओसाड जमिनीवर त्यांनी बाग फुलवली. साहित्य आणि संगीताएवढंच त्यांचं प्रेम क्रिकेटवर असावं. कारण त्यांनी शालेय क्रिकेटवर लिहिलंय, अर्थात पुण्याच्या शालेय क्रिकेटवर!! त्यातल्या गमतीजमती ते खुलवून सांगतात. त्यांची शाळा नूतन मराठी विद्यालय. प्रा. देवधरही त्यांच्याच शाळेचे विद्यार्थी. त्यांना एक वर्ष ज्येष्ठ. त्यांचा नेहमी सामना न्यू इंग्लिश स्कूलविरुद्ध व्हायचा. त्यांना त्या शाळेला कधीही हरवता आलं नाही. न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक किनरे खेळपट्टीखाली लिंबू ठेवतात, त्यामुळे ते जिंकतात ही त्यांची ठाम समजूत होती हे ते फार खुशखुशीतपणे सांगतात.
तुम्ही त्यांचं ‘अशा झुंजा असे झुंजार’ हे पुस्तक वाचलंय का? तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल तर लगेच वाचा. ते मिळवण्यासाठी ‘चोरी’ केलीत तरी तो क्षम्य गुन्हा ठरू शकतो. तुम्हाला आजच्यापेक्षा एक वेगळय़ाच काळात ते पुस्तक घेऊन जाईल. जेव्हा क्रिकेट आणि पैसे यांचं दूरचं किंवा मानलेलं नातंही नव्हते. होता फक्त निखळ आनंद. तुम्ही विचार करू शकता का की, शाळेतल्या  क्रिकेटपटूंवर चक्क संस्कृत श्लोक लिहिले जात? माझ्या शाळा-कॉलेजच्या आयुष्यात शाळा-कॉलेजच्या क्रिकेटला भरपूर प्रसिद्धी मिळे. कारण आज जसा क्रिकेटच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही तसा प्रकार तेव्हा नव्हता. ज्या ब्रिटिशांनी क्रिकेटला जन्म दिला त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळलाय, पण क्रिकेटचा सूर्य मध्यानीला आहे. पण अतिक्रिकेटच्या उन्हाचे चटके आता आपल्याला जाणवतात. त्याकाळी कादंबरी आणि क्रिकेटची मॅच या आनंद उपभोगायच्या  गोष्टी होत्या. तो उपभोगतानाच्या वातावरणाचं फार सुंदर वर्णन अप्पासाहेबांनी केलंय. जातीय ‘गर्व’ सध्या शिगेला पोहोचलाय. त्यामुळे त्यांनी जे लिहिलं ते आज लिहिलं तर लगेच त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जाईल. त्यांच्यावर गुन्हा नोंदवला जाईल, पण डेक्कन कॉलेज आणि फर्ग्युसनच्या मॅचमधलं द्वंद्वाचं वातावरण रंगवताना अप्पासाहेबांनी लिहिलंय, ‘‘डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपल बेन म्हणजे एक अजब व्यक्ती होती. ‘भटांचं कॉलेज’ असा फर्ग्युसन कॉलेजचा उल्लेख बेनसाहेब करीत, सामना बघायला जातीने हजर राहायचा आणि आपल्या खेळाडूंना उत्तेजन देताना म्हणायचा, ‘‘भरडून काढा फर्ग्युसनवाल्यांना! पाहता काय, उडवा चटणी भटांची!’’
पण त्यांच्या लिखाणात जातीयवाद शोधू नका. कारण तो नव्हताच मुळी. तर तुम्हाला सापडणार कुठे? एकदा ‘त्रिकाळ’ नावाच्या दैनिकातल्या प्रतिनिधीने त्यांना एक मुलाखतीत कुचकटपणे विचारलं, ‘‘तुमच्या संघात मराठे किती आहेत आणि ब्राम्हण किती आहेत? (त्यावेळी फडके कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकवत) तेव्हा अप्पासाहेब ताडकन म्हणाले, ‘‘क्रिकेटमध्ये एकच जात असते ती म्हणजे खेळाडूंची जात. आमच्या संघातले सारे विद्यार्थी त्या जातीचे आहेत.’’
पालवणकर बंधू हे दलित, पण 1911 मध्ये इंग्लंडच्या दौऱयावर पी. बाळू या थोरल्या बंधूने फिरकी गोलंदाजीचं असं कौशल्य दाखवलं की, तिथल्या इंग्रजी वर्तमानपत्रांनी त्यांची तुलना ‘ऱहोडस् आणि व्हेरिटी’ यांच्या तोडीचा बॉलर’ अशी केली. त्याच्याबद्दल लिहिताना हा साहित्यिक किती मस्त लिहितो पाहा – ‘‘अवघ्या तीन रुपये पगारावर पुना क्लबची नोकरी करणारा ‘शुद्र’ छोकरा तिरंगी-चौरंगी सामन्यांत पराक्रमाची वीरकृत्ये करून ‘क्षत्रिय’ झाला आणि बीबीसीआय रेल्वेत सन्मानाची नोकरी करता करता निवृत्त झाला. ‘दैवायत्तं कुलेजन्म मदायुत्ते, तु पौरुषम’ हे वचन त्याने खरं करून दाखवलं.’’
त्यांचे लेख वाचताना मला त्यांचा हेवा वाटतो. देवाने आपल्यावर अन्याय केलाय असं मला वाटतं. त्याने जन्म थोडा आधी देऊन शंभर-सव्वाशे वर्षांचं आयुष्य मला द्यायला हवं होतं. कारण ज्यांच्या पराक्रमाबद्दल फक्त वाचून मी प्रेमात पडलो ते सर्व क्रिकेटपटू अप्पासाहेबांचे मित्र होते. उदा. विजय मर्चंट, सी. के. नायडू, प्रा. देवधर, विजय हजारे वगैरे! आम्ही गावसकर पाहिला, पण तरीही मर्चंट न पाहिल्याचं दुःख आहेच. आम्ही सचिन जगलो, पण सी. के. वेगळंच रसायन होतं. ज्या कांगाच्या नावाच्या क्रिकेट लायब्ररीतून मी असंख्य पुस्तकं आणून क्रिकेटच्या इतिहासात फेरफटका मारून आलो त्या डॉ. कांगांना त्यांनी पाहिलंय आणि त्यात भर घाला पालवणकर बंधूंची. त्यातले पी. बाळू (बाळू पालवणकर) तर चक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आयडॉल. एक हेवा वाटण्याचं कारण सांगायचं राहिलंय. त्यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातली एक असामान्य खेळी बॉम्बे जिमखान्यावर ‘याच देही, याच डोळा’ पाहिलीय. ती म्हणजे लाला अमरनाथचं इंग्लंडविरुद्धचं पहिलं शतक. भारताच्या इतिहासातलं ते पहिलं कसोटी शतक होतं. संघाची स्थिती, प्रतिस्पधी संघ, फटक्यांची आतषबाजी आणि झंझावात याचा विचार केला तर भारतीय क्रिकेटमधल्या दहा अविस्मरणीय खेळीत ती एक असेल. त्यांच्या लिखाणातून जो काळ माझ्या डोळय़ासमोर उभा राहिला तो मी इंग्रजीतही कुठे वाचलेला स्मरत नाही. शं. वा. किर्लोस्कर हे उत्तम क्रिकेट खेळत हे अप्पासाहेबांचं लिखाण वाचल्यावरच कळलं. मुंबईत त्यावेळीही मैदानावर क्रिकेट खेळणाऱयांची तुडुंब गर्दी असे हे त्यांच्याच लिखाणातून मला जाणवलं. ते लिहितात, ‘‘शनिवार आणि रविवारी बहुतेक प्रत्येक क्लबच्या जागेवर सामना चाललेला असायचा. एका सामन्यातल्या फलंदाजाचा झेल, शेजारीच चाललेल्या दुसऱया सामन्यातल्या क्षेत्ररक्षकाने झेलावा असे देखील प्रकार व्हायचे आणि मैदानामैदानामधून लोकांनी पाडलेल्या पायवाटांवरून चिक्कीवाले, गंडेरीवाले, ‘चिक्की।़।़! ‘गंडे।़।़री’’ असे चिरके आवाज काढत खुशाल जात येत असायचे.’’ या वर्णनात मुंबईतलं मैदान क्रिकेट आजही बसतं. फक्त चिक्कीवाले, गंडेरीवाले आता अदृश्य झाले आहेत.
1911 सालच्या एका मॅचचं वर्णन करताना ते लिहितात, ‘‘अबू जोशी हा खेळाडू फक्त क्षेत्ररक्षणासाठी असायचा. अबू गोरापान, देखणा, तब्येतदार. एकदा तो सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. त्याने एक झेल सोडला. सर्व आश्चर्यकीत झाले. त्याला कर्णधाराने विचारलं, ‘‘हे रे काय अबू?’’ अबूनं उत्तर दिलं ‘‘एक अशी झकास मुलगी रस्त्याने चालली होती की तिच्याकडे बघण्याच्या नादात झेल सुटला रे! चटकफटक पोशाख करणाऱया या पोरी फार वाईट.’’ आज हेही बदललेलं नाही. तरीही आजचं क्रिकेट काही बाबतीत आमूलाग्र बदलतंय. फडक्यांनी धोतरातलं क्रिकेट पाहिलंय. आश्चर्य वाटून घेऊ नका. प्रा. देवधरांनीही धोतरात फलंदाजी केलीय. आज क्रिकेट रंगीबेरंगी कपडय़ांत आलंय. सरावाच्या पद्धती तर इतक्या बदलल्या आहेत की इतका बदल झालेली एकच गोष्ट मला चटकन आठवते ती म्हणजे कुंदनलाल सैगल ते अरजित सिंगपर्यंत हिंदी चित्रपटसंगीतातला झालेला बदल. पण तरीही काही परंपरागत गोष्टी टिकून आहेत. प्रा. देवधर ज्या पद्धतीने सराव करीत तसाच सराव काही वेळा विराट कोहली करतो. अप्पासाहेब लिहितात, ‘‘अगदी अंधारात वेगवान गोलंदाजीसमोर फलंदाजी करण्याचा सराव करताना देवधर म्हणायचा, ‘‘बॉलिंग टाकू नका, थ्रो टाका. शक्य तितक्या वेगाने फेका. आपटून टाका, ऑफब्रेक होईल असा टाका. लक्ष्मण म्हणून एक ‘बॉय’ होता. चांगला तगडा. या लक्ष्मणला देवधर म्हणायचे, ‘‘फेक रे फेक जोरात’’ आणि त्याने फेकलेला एक एक चेंडू तिन्ही सांजेच्या त्या अंधारात ताडताड मारायचे.’’ आजही खेळाडूंचा कुणी तरी ‘लक्ष्मण’ नावाचा बॉय असतोच. सचिन तेंडुलकरकडेही होता.
 अप्पासाहेबांच्या क्रिकेटच्या लेखात गमतीदार किश्श्यांची पेरणी फार मस्त असे. बरं त्यांचा संबंध साहित्य, कला, नाटक वगैरे मंडळीशी असल्यामुळे, त्यांच्याबरोबर उठबस असल्यामुळे त्यांच्या लिखाणात गमतीदार किस्से वाचायला मिळतात. उदाहरण म्हणून एक मामा वरेरकरांचा किस्सा मी पेश करतो. अप्पासाहेब लिहितात, ‘‘ललितकलादर्शच्या बिऱहाडी मामा वरेरकरांची बैठक असायची. मामा क्रिकेटबद्दलच्या वाटेल त्या बाता मारायचे. त्यांच्या बाता उघडय़ा करायला देवभक्त आर्टिस्ट काळे, वसंत शांताराम देसाई, कमतनूरकर अशांचं टोळकं सिद्ध असायचं. यांनीच मामांना ‘बाताराम’ अशी पदवी बहाल केली होती.
एकदा मामांना ‘हौलट’ या गोलंदाजाच्या चेंडूफेकीची तारीफ कुणी तरी ऐकवली. कुणी तरी म्हणाले, ‘‘अहो मामा, हा हौलट किती यार्डाचा स्टार्ट घेतो माहीत आहे का? वीस यार्डांचा. आहात कुठे?’’ मामा आपल्या स्वभावानुसार म्हणाले, ‘‘अरे वीस यार्ड म्हणजे काहीच नाही. मागे प्रेसिडेन्सी सामन्याच्या वेळेस चिथॅम नावाचा गोरा लालबुंद साहेब होता.  तो चेंडूफेक करण्यासाठी तीस यार्डांचा स्टार्ट घ्यायचा.’’ आपली थाप बहुधा पचली अशा कल्पनेने मामांनी विडीचा एक मोठा झुरका मारला,परंतु देवभक्त कसले वस्ताद? ते म्हणाले, ‘‘अहो, मामा चिथॅम काय घेउैन बसलात? कोणत्याशा सामन्यात मी कोणतासा बॉलर पाहिला. त्याचा स्टार्ट एवढा मोठा की, तो पावलं मोजीत जो गेला तो अजूनपर्यंत परतच आलेला नाही.’’
असे किस्से लेख रंजक करतात.
प्रा. फडक्यांच्या लेखात आणखीन काही वैशिष्टय़े होती. त्यांनी प्रत्येक इंग्लिश शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधून तसं लिखाण केलं नाही. कारण शेवटी क्रिकेट हा इंग्लिश खेळ आहे. ओघाने आलं किंवा जे नैसर्गिकपणे बोलण्यात येतात. ते त्यांनी तसंच ठेवलं, पण काही वेळा गमतीदार शब्दही शोधले. बंपरला आपटीबार हा शब्द त्यांचा. ‘बिमर’ चेंडूला आजही मराठीत योग्य शब्द नाही. त्यांनी त्यासाठी ‘डोईफोडय़ा’ हा शब्द वापरला. अर्थात प्रत्येक बिमर काही डोकं फोडत नाही.
ललित लेखनाची त्यांची प्रतिभा खूप मोठी असल्यामुळे खेळाडूंच्या व्यक्तिमत्त्वाचं किंवा हालचालीचं वर्णन ते उत्तम करीत. हातच्या काकणाला आरसा कशाला? एक-दोन उदाहरणं देतो. प्रा. देवधरांबद्दल ते लिहितात, ‘‘त्यांच्या साधेपणाची प्रचिती ते कॉलेजात होते तेव्हापासून आम्हाला आली होती. इतर खेळाडू ऐटबाज कपडे घालून आणि भांग काढून क्रिडांगणावर दाखल व्हायचे. पण ही स्वारी मात्र धोतरात असायची आणि अनवाणी धावायची. चौरंगी सामन्यात खेळण्याची वेळ येईपर्यंत देवधर यांनी आपला अस्सल बामणी पोशाख सोडला नव्हता आणि त्यानंतरही कपडय़ाच्या नोकझोकांकडे त्यांचे लक्ष नसे.’’
ज्या दुलिपसिंगच्या नावाने भारतात दुलिप ट्रॉफी सुरू आहे त्या दुलिपसिंगांच्या फलंदाजीच्या व्यक्तिमत्त्वाच्या तर ना. सी. फडके प्रेमातच होते. त्यांनी दुलिपसिंगांबद्दल लिहिलंय, ‘‘दुर्बिणीतून पाहणाऱयाला त्यांच्या तोंडावरचं हास्य कधी लोपलेलं दिसलेलं नाही. ते इकडे तिकडे चालतही मोठय़ा रूबाबाने. ते उणेपुरे उंच आहेत. बांध्याने मजबूत व प्रमाणशीर आहेत. वर्णाने गोरटे, नाकाडोळय़ांनी नीटस आणि मुद्रेने अत्यंत आकर्षक आहेत. प्रतिपक्षाच्या जबडय़ातून धाव ओढून घ्यायची असेल तर ते सशाच्या वेगाने धावत, पण टोला लांब गेला असेल आणि एकच धाव काढायची असेल त्यावेळी दिवाणखान्यात चालावे तसे रमतगमत चालत.’’
आजच्या पिढीने अप्पासाहेबांच्या लिखाणातून एक फार महत्त्वाचा गुण घेण्यासारखा आहे. तो म्हणजे आपल्या शैलीने वाचकाला खिळवून ठेवायची त्यांची क्षमता. पूर्वीच्या काळी तरी प्रत्यक्ष मॅच फार कमीजण पाहत. त्यामुळे वर्तमानपत्रीय लिखाणं, पत्रकारांची बातमीपत्रं वाचली जात. आता मॅच टीव्हीवर दिसते. त्यावर माजी क्रिकेटपटू भाष्य करीत असतात. त्यानंतर दुसऱया दिवशी जर कुणी तुमचा लेख किंवा बातमीपत्र वाचायचा असेल तर तुमच्या लिखाणात ती ताकद हवी. ती बऱयाचदा योग्य मुद्दा, योग्य टीका याबरोबर शैलीतून येते. कार्डस, प्रभू, अप्पासाहेब फडके यांच्याकडून मी हे शिकलो. आजच्या काळात ते जास्त महत्त्वाचं झालंय. त्यांची काही चटकदार वाक्यं, उपमा तुम्हाला लेख वाचताना पुढे ओढून घेऊन जातात. लेख अर्धवट सोडावा असं कधीच वाटत नाही. उदा. साठीचा उंबरठा ओलांडल्यावरही रणजी ट्रॉफी खेळणाऱया नायडूंबद्दल ते लिहितात, ‘‘अजूनही त्यांच्या खेळात चित्तवेधकता कायम आहे. आजचा त्यांचा खेळ म्हणजे क्षीण झालेली ज्योती आहे. राखेने झाकलेला निखारा आहे.’’
किंवा दुलिपसिंगच्या ड्राइव्हबद्दल ते लिहितात, ‘‘त्यांचा ड्राइव्हचा फटका पाहिला तर एखादा तलम पर्शियन गालीचा उलगडत गेल्याचा भास होतो आणि स्लीपमधील फिल्डर्समधून मारलेले त्यांचे लेगकट्चे तडाखे तर आडतालाला वळसे घालून जाणाऱया गायकाच्या सुरेल तानेइतके गोड वाटतात.’’
पूर्वी काही वेळा देवधर 70 ते 80 च्या दरम्यान बाद होते. त्यानंतर त्यांनी शतक पूर्ण केल्यावर प्रा. फडक्यांनी लिहिलं, ‘‘दूर पळणाऱया त्या सेंच्युरीची झिपरी धरून त्यांनी तिला ओढीत आणून आपल्या दाराशी बांधली.’’
योग्य वयात ना. सी. फडक्यांचं लिखाण वाचून मला स्वतःला खूप  मोठा फायदा झाला. लिखाण सुधारायचं असेल तर वाचन फार महत्त्वाचं असतं. अप्पासाहेबही प्रचंड वाचन करीत. आज जे पत्रकार किंवा लेखक खेळावर, विशेषतः क्रिकेटवर लिहितात त्यांनी ना. सी. फडकेंच्या क्रिकेटवरच्या लिखाणाचं पारायण करणं त्यांच्या फायद्याचं आहे.
आम्हा मराठीत क्रिकेटवर लिहिणाऱया लेखक-पत्रकारांमधले ते भीष्माचार्य आहेत. ते भीष्म असले, त्यांचं ‘उत्तरायण’ संपून अनेक वर्षे झाली असली तरी त्यांचं लिखाण चिरतरुण आहे. दर्जेदार साहित्याला वय नसतं. फक्त त्यांची क्रिकेटविषयीची पुस्तकं, साहित्य हे विविध वाचनालयांच्या कपाटांतून काढून आजच्या पिढीपुढे ठेवली पाहिजेत. म्हणजे आजच्या पिढीला तो इतिहासही कळेल. क्रिकेटमध्ये देव आजच नाहीत पूर्वी होते हेसुद्धा जाणवेल आणि त्यांच्या लिखाणावर चांगले संस्कार होतील.
हा लेख त्याची क्षीण ठिणगी ठरला तरी मला प्रचंड समाधान वाटेल.
SPORTSNASHA
www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.
http://www.sportsnasha.com