South Africa Diary- By Dwarkanath Sanzgiri

जोहान्सबर्गचा ‘विनोद कांबळी’!
खरं तर टॅक्सी ड्रायव्हर हा स्मरणात राहणारा किंवा काही काळापुरता तुमच्या भावनेचा भाग बनणारा असतोच असं नाही. बऱयाचदा परदेशात वेगाने पळणाऱया मीटरचा राग आपण टॅक्सी ड्रायव्हरवर काढतो. एका जागेवरून दुसऱया जागेवर सोडलं की आपला आणि त्याचा संबंध् संपतो. टीप दिली नाही तर अमेरिकेत त्याच्या चेहऱयावरची नाराजी स्पष्ट दिसते. आपलेही हात टीप देताना जड होतात.
मी तुम्हाला सांगणार आहे, ते जोहान्सबर्गमधल्या एका टॅक्सीवाल्याबद्दल.
त्याचं नाव? खरं सांगू त्याला मी विनोद कांबळी म्हणायचो. त्यामुळे मूळ नाव फारसं लक्षातच राहिलं नाही. त्यालाही विनोद कांबळी म्हटलेलं आवडायचं. तो दिसायला तसाच. स्वभावाने लाघवी होता आणि तसाच गमत्या. जोहान्सबर्गमध्ये बस, ट्रेनने फक्त कृष्णवर्णीय फिरतात. गोरा माणूस नाहीच नाही. हिंदुस्थानी माणसाची दारिद्रय़रेषा फक्त एक गाडी आणि एक छोटं घर इतपत खाली येते. कृष्णवर्णीय माणसाची श्रीमंती तिथून सुरू होते. मी एकदा बसने गेलो. बस, सॅन्डविचसारखी घट्ट भरली होती. परतल्यावर गोऱया लॉज मालकाने मी न जखमी होता, न लुटला जाता परतलो याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. त्याने मला सांगितले, ‘एक तर टॅक्सीने फिर नाहीतर फिरू नकोस.
बरं, तिथे टॅक्सी बोलवावी लागते फोन करून!
तो ओला, उबेर प्रकार नव्हता. मोटेलची मंडळी तुमच्यासाठी टॅक्सी मागवत. त्यावेळी या विनोद कांबळीची ओळख झाली. मला परदेशात बोलका टॅक्सी ड्रायव्हर आवडतो. त्याला प्रश्न विचारता येतात. माहिती कळते. त्यात हा गमत्या. त्यामुळे प्रवास मजेत व्हायचा. एकदा जोहान्सबर्ग स्टेडियमला सोडून संध्याकाळी परतण्याचं भाडं त्याने जास्त घेतलं असं माझा एक हिशेबी मित्र म्हणाला. त्यांना टॅक्सीला वीस रॅण्ड कमी पडले. त्याने हिशेब सांगितला. दुसऱया दिवशी मला एक कृष्णवर्णीयांची झोपडपट्टी पाहायची होती. तसं मी आमच्या आफ्रिकन कांबळीला सांगितलं. त्याला धक्का बसला. पण तो मला घेऊन गेला. त्या झोपडय़ा जवळून पाहत असताना तो मला म्हणाला,
‘एवढं काय पाहतोयस?’
मी त्याला म्हटलं, ‘तुमच्या झोपडय़ा आमच्यापेक्षा श्रीमंत आहेत का पाहत होतो.’
तो आश्चर्याने म्हणाला, ‘झोपडय़ा आहेत हिंदुस्थानात?’ मी म्हटलं, ‘जगातली एक मोठ्ठी झोपडपट्टी आमच्या मुंबईत आहे. तुमच्या झोपडय़ांत मला टीव्ही दिसतोय, फ्रिझ दिसतोय, अरे एक-दोन झोपडय़ांना चक्क एसी आहे. आमच्याकडे हे सुख नाही.’’ हे सर्व २००३ सालचं आहे. आता आपल्या झोपडय़ांनीही कात टाकलीए. असो. त्या दक्षिण आफ्रिकन विनोद कांबळीने पुन्हा एकदा आश्चर्यचकित होऊन विचारलं, ‘तुमच्याकडे अशी गरीब माणसं असतात?’
‘तुला काय वाटलं की, हिंदुस्थानात गरीब माणसं नसतात?’
‘कारण आमच्याकडे हिंदुस्थानी माणसांकडे भरपूर पैसे आहेत. गोरे आणि हिंदुस्थानी या दोघांनी आम्हाला लुटलंय.’
‘दक्षिण आफ्रिकेच्या शितावरून तू हिंदुस्थानातल्या भाताची परीक्षा करतोयस’, असं मला त्याला इंग्लिशमध्ये सांगायचं होतं. पण अनुवाद नीट जमलाच नाही. फक्त मी त्याला भावना पोचवल्या. त्या क्षणापासून तो माझा मित्र झाला. तोपर्यंत तो मला श्रीमंत लुटारू हिंदुस्थानी समजत होता. त्या दिवशी त्याने मला वीस रॅण्ड परत दिले. म्हणाला, ‘मी तुझ्याकडून जास्त घेत होतो. कारण तुम्ही मंडळी श्रीमंत आहात असं वाटलं.’ त्याचा प्रामाणिकपणा मला भावून गेला.
त्यानंतर दौरा संपेपर्यंत जोहान्सबर्गमध्ये तो आमचा टॅक्सीवाला होता. तिथल्या सोहेटोसारख्या कृष्णवर्णीयांच्या वस्तीत त्याने मला मनसोक्त फिरवलं. मुळात त्याच्याबरोबर फिरताना मला कधी भीती वाटली नाही. तो फार उंच नव्हता. पण नैसर्गिक पीळदार शरीर असं होतं की त्याच्या ताकदीचा हेवा अरेबिक घोडय़ालाही वाटला असता. जोहान्सबर्गमध्ये आमचा मोटेलचा ‘फ्लॅट’ पहिल्या मजल्यावर होता आणि सरळ उभा जिना होता. पंचवीस-तीस किलोंची बॅग हलवताना आमच्या नाकीनऊ यायचे. तो अशा दोन बॅगा, भाजीची पिशवी घेऊन जावी अशी स्टाईलमध्ये वर घेऊन जायचा.
त्याचा मिश्कीलपणा तर अफलातून होता. एकदा आम्ही डर्बनहून रात्री १ वाजता जोहान्सबर्गला पोचणार होतो. जोहान्सबर्गमध्ये दुपारी एक वाजता रस्त्यातून फिरताना, ‘सांभाळून जा, खिशात जास्त पैसे किंवा अंगावर दागिने नको,’ असा सल्ला सातत्याने दिला जातो.
तिथे आम्ही रात्री १ वाजता उतरणार होतो. मी आमच्या कांबळीला सांगितले, ‘न चुकता बस स्टेशनवर ये. नाहीतर आमचं काही खरं नाही.’ तो येतो म्हणाला. आम्ही रात्री 1 वाजता उतरलो. आजूबाजूला पूर्ण कृष्णवर्णीय वस्ती होती. इतर माणसं निघून गेली. आम्ही एकटे सामानासकट उभे. छातीचे ठोके चुकत होते. बायकोने गजानन महाराजांची पोथी वाचायला घेतली. मी फोन फिरवतोय. फोन वाजतोय, तो उचलतही नाही. दहा मिनिटांनी तो गाडी घेऊन आला. मी वैतागणार एवढय़ात तो म्हणाला, ‘मी गेली दहा मिनिटं समोरच्या गल्लीतून तुमची मजा पाहतोय. घाबरला होतात ना? मी असताना कशाला घाबरता?’ मला हसावं की रडावं कळेना. याची भंकस मला हादरवून गेली होती.
जोहान्सबर्गमध्ये एक हिलब्रो नावाचा विभाग आहे. गुन्हेगारीत त्याचा दर्जा अत्युच्च मानला जातो. गोरी आणि हिंदुस्थानी माणसं त्या वाटेने कधी जातच नाहीत. मी त्याला म्हटलं, ‘घेऊन जाशील तिथे?’ तो काय म्हणाला असेल? म्हणाला, ‘घेऊन जातो. पण तिथे घडय़ाळ आवडलं तर काढून घेतात. शर्ट-पॅण्ट आवडली तर त्यांना काढून द्यायची. आहे हिंमत तिथे जायची?’
‘तू बरोबर असशील तर मी हिलब्रोत फुटपाथवरून चालेन. कुणाला हात लावायची हिंमत आहे मला.’ या वाक्याने त्याची कळी खुलली. तो मला घेऊन गेला. टॅक्सी पार्क करून आम्ही फिरलो. एकही वाईट अनुभव आला नाही. किंबहुना तो आमचं जोहान्सबर्गमध्ये कवचकुंडल बनला होता.
तिथून निघताना आम्हाला आणि त्याला भरून आलं होतं. पुन्हा कधी भेटायची शक्यता कमी होती. पण एक टॅक्सीवाला डोळय़ात कधी विरहाचे अश्रू आणील असं वाटलं नव्हतं!
SPORTSNASHA
www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.
http://www.sportsnasha.com