Marriages among Sportsmen

ख्यातनाम खेळाडूंचे जाहले खेळाडूंशी  शुभमंगल  !

रिओ -ऑलिम्पिक मध्ये ५५-६० किलो वजनी गटाच्या महिला कुस्ती-प्रकारात भारताला कांस्य-पदक मिळवून देणारी हरियाणा राज्यातल्या रोहतक गावातली साक्षी मलिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये ९५-१०० किलो वजनी गटाच्या पुरुषांच्या कुस्ती-प्रकारात भारताला रौप्य-पदक मिळवून देणारा त्याच गावातला ख्यातनाम कुस्तीगीर सत्यव्रत सत्यवान कादियान या दोघांचा वाड:निश्चय झाला असून ते दोघे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत ! अशा प्रकारे क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करणारे क्रीडापटू एकमेकांशी विवाहबद्ध झाल्याची अनेक उदाहरणे मला या निमित्ताने आठवतात . भारतापुरते बोलायचे तर धावपटू ” फ्लाइंग सिख्ख ” असा ज्याचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो , ज्याने ४०० मीटर्स अंतराच्या स्पर्धेत १९५८ साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि १९६२ साली आशियाई देशांच्या स्पर्धांमध्ये सुवर्ण-पदक मिळविले मात्र ज्याचे ऑलिम्पिक स्पर्धेतले कांस्य-पदक अर्ध्या सेकंदाने किंवा त्याहीपेक्षा कमी वेळेने हुकले त्या गाजलेल्या ” पंजाब-दा -पुत्तर ” मिल्खा सिंह याने भारताची एकेकाळची व्हॉलीबॉल -कप्तान निर्मल कौर हिच्याशी विवाह केला त्याही गोष्टीला आता पन्नासपेक्षा अधिक वर्षे झाली असतील . पाच वर्षांपूर्वी- बहुधा २०११ साली – झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करणारा पंजाबचा राजपाल सिंह आणि वर्ष २००६ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रायफल शूटिंग या क्रीडाप्रकारात सुवर्ण-पदक मिळविणारी नेमबाज अर्णित कौर यांची गाठ पडली ती आपल्या पुण्यातल्या स्टेडीयमवरती आणि बघताबघता त्या दोघांचे शुभमंगल झाले देखील ! अलीकडच्या काळात ,सायना नेहवालचा गुरू म्हणून प्रसिद्धीच्या झोतात अधिक आलेला परंतु Badminton या खेळात एकेकाळी देशातला सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून मान्यता मिळालेला आणि प्रकाश पदुकोण यांच्यानंतर अनेक वर्षांनी ” All England Badminton Champion ” झालेला तसेच क्रीडाक्षेत्रातील योगदानासाठी अर्जुन पुरस्कार , खेलरत्न पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार असे तीनही सन्मानाचे पुरस्कार मिळविलेला आन्ध्रप्रदेशचा पद्मभूषण फुलेला गोपीचंद याने तर चौदा वर्षांपूर्वीच , २००२ साली जिचा धर्मपत्नी म्हणून स्वीकार करून आपला सुखी संसार थाटला , ती पी. व्ही. व्ही . लक्ष्मी ही तर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये Badminton खेळणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू होती . १९९२ साली स्पेनमधील बार्सेलोना येथे झालेल्या ऑलिम्पिकमधले तिचे पदार्पण जसे गाजले तसेच नंतरच्या अटलांटा -ऑलिम्पिक मधली तिची कामगिरीही कौतुकास्पद होती .केरळ -कन्या अंजू बॉबी जॉर्ज , जिने वर्ल्ड अथलेटिक मीट-२००५ मध्ये आणि आशियाई स्पर्धेमध्ये ” लांब उडी ” ( Long Jump ) या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळविले होते आणि त्यापूर्वी २००२ च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्य पदक मिळविले होते तिने तिचा अनेक वर्षांपासूनचा मित्र आणि गुरु, रॉबर्ट बॉबी जॉर्ज यालाच आपल्या जीवनात पतीचे स्थान दिले ! रॉबर्ट जॉर्ज हा स्वतः Triple Jump या खेळातला National Champion तर होताच परंतु देशातला त्यावर्षातला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ” द्रोणाचार्य पुरस्कार ” मिळालेला असामी होता . भारतीय हॉकी संघातला एक निष्णात खेळाडू , ज्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला एशियन गेम्समध्ये सुवर्ण तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य-पदक मिळू शकले आणि २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमधलाही ज्याचा खेळ कौतुकाचा विषय ठरला तो जलंधरचा गुरविंदर सिंह चांडी आणि अर्जुन अवार्ड प्राप्त ऑलिम्पिक-खेळाडू , अडथळ्याच्या शर्यतीतली उत्कृष्ट धावपटू , मनजित कौर हे एकमेकांबरोबर लग्नाच्या बेडीत अडकले तेव्हा तर गुरविंदर चाण्डी हा केवळ २५ वर्षांचा होता मात्र मनजित कौर ही त्याच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी , म्हणजे ३३ वर्षांची होती . आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दोन नेमबाज , हीना सिध्धू आणि रौनक पंडित हे देखील एकमेकांशी रीतसर विवाहबद्ध झालेले आहेत . रौनक पिस्तूल चालविण्यात वाकबगार होता तर हीना एअरगन चालविण्यात निष्णात होती . आपल्या हैदराबादची निवासी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानातल्या सियालकोटचा निवासी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा ‘ निकाह ‘ म्हणजे तर जगभर चर्चिला गेलेला विषय होता . तीस-बत्तीस कसोटी सामने आणि सव्वा दोनशे किंवा अधिक एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला हा अष्टपैलू क्रिकेटपटू काही सामन्यांसाठी पाकिस्तानचा कर्णधार होता . लग्नानंतर त्याचे क्रिकेटच्या मैदानावर झालेले पुनरागमन मात्र फारसे लक्षवेधी झालेच नाही याउलट लग्नानंतर सानिया मिर्झा मात्र दक्षिण-पूर्व आशियापासून पश्चिमेकडील लंडनमधील विम्बल्डन-कोर्टवर देखील चमकली . ‘ स्क्वाश ‘ ( Squash ) या खेळात २०१४ सालच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये दुहेरी स्पर्धेत जोशुआ चिनाप्पाच्या मदतीने भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी परंतु क्रिकेट या लोकप्रिय खेळाचा मनस्वी तिटकारा असलेली दीपिका पल्लीकल हिने आपला जीवनसाथी म्हणून मात्र एका क्रिकेटवीराच्याच गळ्यात वरमाला घातली . भारताचाअव्वल दर्जाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिक हे त्याचे नाव ! २००७ साली भारताने तब्बल एकवीस वर्षांनंतर इंग्लंडच्या विरुद्धची कसोटी सामन्यांची शृंखला जिंकली तेव्हा दिनेश कार्तिकने भारतासाठी सर्वाधिक , २६३ धावा केल्या होत्या .असो . ख्यातकीर्त खेळाडू एकमेकांशी विवाहबद्ध् झाल्याची उदाहरणे जशी भारतात आहेत तशीच परदेशातही आहेत . एकेकाळी ऑलिम्पिक स्पर्धेत ” सुवर्णकन्या ” अर्थात गोल्डन गर्ल म्हणून गाजलेली आणि आपल्या कमनीय देहाच्या कमालीच्या कसरतीने कोट्यवधी प्रेक्षकांना बसल्याजागी खिळवून ठेवणारी आणि ” Gymnastic ” या चित्तथरारक क्रीडाप्रकारात सुवर्णपदके मिळवणारी रुमानियाची नादिया कोमेन्सी अखेर विवाहबद्ध झाली ती ऑलिम्पिक मधल्या Gymnastic मध्येच सुवर्णपदक मिळविलेल्या बार्ट कॉनर या कसरत-पटूशी ! टेनिसपटू क्रिस एव्हर्ट आणि गोल्फपटू ग्रेग नॉर्मन यांचा विवाह मात्र फार काळ टिकला नाही . तथापि , टेनिसच्या कोर्टवर अत्यंत आकर्षक दिसणारी आणि अनेकवेळा जागतिक अजिंक्यपद प्राप्त करणारी तसेच लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारी स्टेफी ग्राफ हिने तितकाच देखणा आणि टेनिसमधला विश्वविक्रमी खेळाडू , आंद्रे अगासी याच्याशी केलेला विवाह आजपर्यंत अबाधित आहे ! १९८८ च्या सेऊल ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर्स अंतर अवघ्या १०.४९ सेकंदात आणि २०० मीटर्स अंतर अवघ्या २१.३४ सेकंदात धावून विश्वविक्रम प्रस्थापित केलेली धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ-जॉयनर हिने देखील ज्याच्याशी लग्न केले तो अल जॉयनर देखील Triple Jump या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिकचे सुवर्णपदक मिळविलेला अमेरिकन क्रीडापटू होता . विख्यात मुष्टीयोद्धा महंमद अली याची मुलगी लैला अली ही अमेरिकेतली नामांकित महिला-मुष्टीयोद्धा अर्थात बॉक्सर असून तिने काही वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या नवऱ्याला सोडून अमेरिकन फुटबॉलपटू कर्टीस कॉनवे याच्याशी लग्न केल्याचे उदाहरण देखील तसे ताजेच आहे . खरं तर अशी अनेकानेक उदाहरणे मला सांगता येतील ,मात्र तूर्तास तो मोह आवरून केवळ साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान या उभयतांचे अभिष्टचिंतन करून मी इथेच थांबतो !

——-प्रवीण कारखानीस

 

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons