World Chess- Exclusive by Aneesh Date
अपेक्षेप्रमाणे आर्मेनियाच्या गरुड पक्ष्याने आपले विस्तीर्ण असे पंख झेपावत चीनच्या ड्रॅगनला साफ नेस्तनाबूत करत आपले दुसरे फिडे बुद्धिबळ २०१७ चे जागतिक अजिंक्यपद दिमाखात पटकावले.
जॉर्जिया देशाच्या टबाइलिसी या राजधानीच्या शहरात ३ सप्टेंबरपासून सुरु झालेली ही फिडे बुद्धिबळ २०१७ ची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा काल बुधवारी संपली.
आर्मेनियाच्या लेव्हॉन एरोनियनने तब्बल ३५ सामन्यांमधून अत्यंत बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांशी लढत हे अजिंक्यपद दुसऱयांदा बारा वर्षांनंतर जिंकले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.अजिंक्यपदाबरोबर विजेता म्हणून १,२०,००० अमेरिकन डॉलर्सची कमाई करत २०१८ साली होणाऱ्या फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरत थेट प्रवेश मिळवला आहे.
अंतिम फेरीतील पहिले चारी डाव बरोबरीत सुटल्यानंतर कालच्या बुधवारी टायब्रेकरवर रॅपिड पद्धतीचे डाव सुरु झाले.
त्यातील पहिल्याच डावात लेव्हॉन एरोनियनने डिंग लिरेनने डावाच्या सुरुवातीला केलेल्या चुकीचा फायदा उठवत अवघ्या तीस चालींमध्ये मात केली. बरोबरीत सुटलेल्या डावांमध्ये घेतलेल्या अनुभवानंतर या वेळी एरोनियनने डिंगला जराही डोके वर काढायची संधीच दिली नाही.
या पहिल्या रॅपिड डावाची सुरुवात इंग्लिश ओपनिंग प्रकाराने झाली.
डावाच्या पहिल्या सुरुवातीच्या १६ चालींपर्यंत स्थिती समसमान होती.
मात्र डिंग लिरेनकडून त्यानंतर १७ व्या आणि १८ व्या चालीला ज्या चुका झाल्या त्याचा फायदा घेत एरोनियनने लगेच १९ व्या चालीला N g ६ ही खेळी करत आपला घोडा बळी देऊ केला.
या मोहाला बळी न पडता डिंग लिरेनने वजिराची d २ ही वजिरावजिरी करण्याची धमकी देणारी खेळी केली.
बस्स इथेच सगळा डाव एरोनियनच्या कब्जात आला.
लगेच २० व्या चालीला त्याने घोड्याची e ७ + ही खेळी करत लिरेनच्या राजाला शह देत कोंडीत पकडले.
नंतर २३ व्या चालीला दुसऱ्या घोड्याची N g f ५ या खेळीने करत एकाकी पडलेल्या लिरेनच्या वजिरावर आक्रमण करायला सुरुवात केली आणि अखेरीस २९ व्या चालीला घोड्याची N f ५ + शह देणारी खेळी करत राजा घोडा आणि वजीर ही तिन्ही मोहरी बंदिस्त करून ठेवली.
शेवटी तिसाव्या चालीला एरोनियनने राजाच्या हत्तीची काळ्या वजिराला कोंडीत पकडणारी h १ ही खेळी करत हा सुंदर डाव जिंकला.
या डावात काळ्याचे दोन्ही हत्ती , काळ्या पट्टीतला उंट आणि एक घोडा ही चारी मोहरी अशी काही जेरबंद झाली होती की हा डाव डिंग लिरेन आयुष्यात कधी विसरेल असे वाटत नाही.
त्यानंतर पुढच्या सहाव्या रॅपिड डावाची सुरुवात डिंग लिरेनला एक संधी मिळण्यासाठी झाली.
यावेळी लिरेनला पांढरी मोहरी असल्याने आपले आव्हान टिकवण्यासाठी ही संधी मिळत होती.
बुद्धिबळाच्या डावात पांढऱ्याला काळ्याच्या तुलनेत विजयाची संधी जरा अधिक असते तशी ती होती आणि डिंग लिरेनला खरोखर या सहाव्या डावात मिळालीही होती.
या सहाव्या डावाची सुरुवात परत एकदा क्वीन्स पॉन ओपनिंगने झाली.
या अंतिम फेरीतील सहा डावांपैकी तब्बल चार डाव या क्वीन्स पॉन ओपनिंगने आणि इतर दोन डाव इंग्लिश ओपनिंगने खेळले गेले.
सहाव्या डावातील सुरुवातीच्या ठरलेल्या चालींनंतर काळी मोहरी घेऊन खेळणाऱ्या एरोनियनकडून एकविसाव्या चालीला परत एकदा पाचव्या डावाप्रमाणे N e f ६ ही घोड्याचा बळी देण्याची चाल खेळली गेली.
काहीशी संभ्रमावस्थेत टाकणारी ही चाल पाहून डिंग लिरेनला हा बळी देऊ केलेला घोडा घेऊन खरे तर नक्की फायदा घेता आला असता.
हा घोडा त्याने घेतला खरा पण शेवटी त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही.
कारण नंतर २३ व्या चालीला एरोनियनने प्याद्याची f ५ ही खेळी करत लिरेनचा उंट मिळवला. डावाच्या ३० व्या चालींपर्यंत दोघांची स्थिती सामान होती खरी पण दोघांचेही कॅसलिंग म्हणजे किल्लेकोट करून सुरक्षित ठेवलेले राजे प्याद्यांची फळी गेल्याने एकाकी असे कोपऱ्यातील h फाईलमध्ये अडकून पडले होते.
परत ३१ व्या चालीला डिंग लिरेनची एक मोठ्ठी घोडचूक झाली आणि मग अवघ्या दोन चालींनंतर त्याने आपला दुसरा पराभव कबूल केला.
शेवटी ठरल्याप्रमाणे टायब्रेकरवर या अंतिम फेरीचा निकाल लागला आणि ४ – २ अशा फरकाने आर्मेनियाच्या लेव्हॉन एरोनियनने हे स्पर्धा अखेर जिंकली.
तब्बल ३५ डावांमधून २२. ५ गुण कमावत लेव्हॉन एरोनियनने दुसऱ्यांदा विजेता व्हायचा बहुमान मिळवला.
खडतर परिश्रमानंतर मिळवलेल्या या विजयाबद्दल त्याचे खरोखर अभिनंदन करवयास हवे.
पहिल्या फेरीचा अपवाद सोडल्यास दुसऱ्या फेरीत त्याला महिलांची जगज्जेती चीनची हू यिफान बरोबर सहा , तिसऱ्या फेरीत रशियाचा ग्रँडमास्टर मॅक्झिम मॅटलेकोव्हबरोबर आठ डाव खेळायला लागले.
नंतर उपांत्य फेरीत फ्रान्सच्या मॅक्झिम व्हॅचिअर लाग्रेव्ह या सध्या जगात सीडेड नंबर दोनवरील जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या सुपर ग्रॅण्डमास्टरबरोबर नऊ डाव आणि सरतेशेवटी अंतिम फेरीत तर चीनच्या ग्रँडमास्टर डिंग लिरेनबरोबर सहा डाव खेळायला लागले आहेत.
खरोखर स्पृहणीय म्हणावे असेच हे यश आहे यात काही शंका नाही.
चीनच्या डिंग लिरेनने पण खरोखर कमाल केली.
कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्याने जो अंतिम फेरीपर्यंत जाण्याचा पराक्रम करून दाखवला त्याबद्दल त्याचेही अभिनंदन करावयास हवे.
एरोनियनप्रमाणे उपविजेत्या डिंग लिरेनने २०१८ साली होणाऱ्या फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरत थेट प्रवेश मिळवला आहे.
त्याच्या या खेळाने चीनच्या खेळाडूंना मोठ्ठे मनोधैर्य मिळाले आहे आणि लवकरच त्यांचा खेळाडू नक्की जगज्जेता बनणार ही काळ्या दगडावरची रेघ निश्चित आहे.
भारताच्या विशी आनंदकडून खूप अपेक्षा होत्या पण स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतून त्याला गाशा गुंडाळावा लागला.
मात्र अशा वेळी पी सेथूरामन आणि विदित गुजराथी यांनी अप्रतिम खेळ करत चौथ्या फेरीपर्यंत कौतुकास्पद लढत दिली यात शंका नाही.
अच्छा , तर मग परत केव्हातरी अशा रिपोर्टींगच्या निमित्ताने नक्की भेटूया