WORLD CHESS- EXCLUSIVE REPORT BY ANEESH DATE

PUBLISHED YESTERDAY 24 SEPTEMBER 2017

३ सप्टेंबरपासून जॉर्जिया देशाच्या टबाइलिसी या राजधानी शहरात सुरु झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील सामना काल सुरु झाला.

पुर्व विरुद्ध पश्चिम असा रंग लाभलेल्या या अंतिम फेरीत आर्मेनियाचा लेव्हॉन एरोनियन आणि चीनचा डिंग लिरेन या ग्रॅण्डमास्टर्समधील सामन्यातील पहिला डाव बरोबरीत सुटला.

तसं पाहिलं तर या दोघांचेही देश कट्टर साम्यवादी आणि तितकेच कट्टर बुद्धिबळप्रेमी आहेत हेच काय ते त्यांच्यातले विलक्षण साम्य आहे.

सोव्हिएट रशिया या संघराज्यातून फुटून वेगळया झालेल्या आर्मेनियाला आता खरा चेहरा या जागतिक पटावर त्यांच्या एकाहून एक अशा सरस बुद्धिबळपटुंकडुन लाभला आहे आणि क्रीडाप्रेमी चीनबद्दल तर काय बोलावे ,तर साम्यवादी राजवटीतला पोलादी पडदा माओच्या काळापासून दूर झाल्यानंतर चीनने ज्या ज्या खेळांमधून अल्पावधीत जी काही विलक्षण झेप घेतली आहे त्यात या बुद्धिबळ खेळाचा प्रामुख्याने समावेश केला पाहिजे.
उपउपांत्य फेरीमध्ये जाण्याआधीच्या महत्वपूर्ण स्पर्धात्मक फेरीत तर सोव्हिएट रशियाच्या चार खेळाडूंबरोबर चीनच्या तीन खेळाडूंनी प्रवेश केला होता आणि नेमक्या याच वेळी हे चार रशियन खेळाडू गारद झाल्यानंतर चीनचे आव्हान त्यांच्या जिद्दी खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत नेले हे उल्लेखनीय आहे.

तर लेव्हॉन एरोनियन आणि डिंग लिरेन या ग्रॅण्डमास्टर्समधील सामन्यातील पहिल्या बरोबरीत सुटलेल्या डावाची सुरुवात इंग्लिश ओपनिंग प्रकाराने झाली. एरोनियनने केलेली सर्व चालींना डिंग लिरेनने जशास तसे असे प्रत्युत्तर दिले.
तेराव्या चालीला वजिरावजिरी झाल्यानंतर डावातली मोहोऱ्यांची स्थिती समसमान आणि तुल्यबळ झाली.मात्र सुरुवातीला ७ व्या चालीला डिंग लिरेनला पटाच्या मध्यावर d ४ या वजिराच्या प्याद्याच्या केलेल्या खेळीचा फायदा उठवता आला नाही.
समसमान स्थितीमुळे ३५ व्या चालीला शेवटी दोघांनीही बरोबरी मान्य केली.

आता दुसरा सामना आजच्या सुट्टीच्या रविवारी सुरु होणार आहे आणि त्याकडे जगातल्या सर्व बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागले आहे.

या जागतिक अजिंक्यपदाच्या महत्वपूर्ण स्पर्धेत भारताचे सर्व खेळाडू बाद झाल्यानंतर आपल्याकडच्या मराठी मिडीयाने स्पर्धेवर जणू काही बहिष्कार टाकला असावा की काय एवढी शंका यायला लागली आहे.
भारताने शोध लावलेल्या बुद्धिबळ खेळाला मराठी भाषेतली प्रेस मिडिया एके काळी खरोखर महत्व देत असे आणि अशा महत्वाच्या सामन्यांची फोटो तसेच स्कोअरसहित मोठी बातमी येत असे हे सांगायची वेळ आली आहे.
भारताचे सर्व खेळाडू बाद झाल्यानंतर एक साधी ओळ देखील मराठी वृत्तपत्रांमधून येऊ नये हीच मोठ्ठी खेदाची बाब आहे असे म्हटले पाहिजे.
केवळ क्रिकेटला अतोनात महत्व देण्यापायी हे खेळाचे नुकसान होत आहे यात शंका नाही.

चालायचंय.
मात्र अशा परिस्थितीत इंटरनेटचे आम्ही अत्यंत अत्यंत असे आभारी आहोत हे सांगावेसे वाटते.

 

PUBLISHED TODAY 25 SEPTEMBER 2017

जॉर्जिया देशातील टबाइलिसी या राजधानीच्या शहरात सुरु असलेल्या फिडे बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतला झालेला आजचा सामना ७५ चालींच्या झुंजीनंतर अखेर बरोबरीत सुटला.

डावाच्या शेवटी काळी मोहरी घेऊन खेळणाऱ्या आर्मेनियाच्या लेव्हॉन एरोनियनकडे ज्यादा एक प्यादे होते खरे पण डिंग लिरेन कडे सुस्थितीत असणारा आक्रमक घोडा असल्याने हे ज्यादा प्यादे गेल्यात जमा होते.त्यामुळे आजचा उत्कंठावर्धक झालेला बरोबरीत सुटला.

वजिरापुढील प्याद्याच्या खेळीने क्वीन्स पॉन ओपनिंग प्रकाराने या डावाची सुरुवात झाली.
डावाच्या सहाव्या चालीला दोघांनीही कॅसलिंग करून राजे सुरक्षित ठेवल्यावर डावाच्या एकतिसाव्या चालीला बी फाईलमध्ये असणाऱ्या प्याद्याने लिरेनचा घोडा घेऊन ते ए फाईलमध्ये बढती मिळालेले प्यादे म्हणून लेव्हॉनला फायदा घेता आला खरा.पण शेवटी तो त्या प्याद्याचे वजिरात रूपांतर करू शकला नाही.

खरे तर लेव्हॉनला आज या मोहऱ्यांच्या सुस्थितीमुळे ज्याला पोझिशनल एडव्हान्टेज असे म्हणतात त्यामुळे डाव जिंकण्याची संधी होती पण डावाच्या ५८ च्या चालीला काळ्याच्या घोड्याची c ५ या खेळीऐवजी c ३ ही खेळी कदाचित अधिक योग्य झाली असती.पण डिंग लिरेनने समयोचित उत्तम बचावात्मक खेळ केल्याने अखेरीस ही लढत बरोबरीत सुटली.

आता उद्या तिसरा सामना होत असून पुढील काही मोजके डाव बरोबरीत सुटले तर नियमानुसार टायब्रेकरवर या लढतीचा निकाल लागण्याची शक्यता अधिक वाढली आहे आणि लेव्हॉन या टायब्रेकरवर खेळल्या जाणाऱ्या जलदगती प्रकारात कुशल खेळाडू समाजाला जातो.
शेवटी चीनचा डिंग लिरेन पण आता पहिल्या दोन बरोबरीत सुटलेल्या डावानंतर कधीही डोके वर काढू शकतो.

चला तर मग पाहायचे काय होते ते उद्याच्या तिसऱ्या डावात !

SPORTSNASHA
www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.
http://www.sportsnasha.com