World Chess Championship updates by Aneesh

आर्मेनियाचा लेव्हॉन एरोनियन आणि चीनचा डिंग लिरेन या दोघं ग्रॅण्डमास्टर्समध्ये सुरु असलेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतले आणखी दोन डाव अखेर बरोबरीत सुटले.

पैकी तिसऱ्या डावाची सुरुवात परत एकदा दुसऱ्या डावाप्रमाणे क्वीन्स पॉन ओपनिंग प्रकाराने झाली.या तिसऱ्या डावात एरोनियनकडे पांढरी मोहरी होती.
दुसऱ्या डावात डिंग लिरेन थोडक्यात वाचला होता आणि शेवटी एरोनियनकडे अगदी कमी वेळ उरला असल्याने डाव अखेर ७५ व्या चालीला बरोबरीत सुटला होता.

काल सोमवारी झालेल्या तिसऱ्या डावाच्या मध्य पर्वात दोघांनी २६ व्या चालीअखेर एकमेकांची मोहरी घेऊन समसमान स्थिती राखली होती.
दोघांकडे विरुद्ध रंगाचे उंट आणि प्रत्येकी पाच प्यादी उरली असल्याने हा डाव अखेर ३१ व्या चालीला बरोबरीत सुटला.

आजच्या मंगळवारी झालेल्या चौथ्या डावात डिंग लिरेनकडे पांढरी मोहरी होती आणि या वेळी परत मागील दोन्ही डावांप्रमाणे या डावाची सुरुवात क्वीन्स पॉन ओपनिंग प्रकाराने झाली.नवव्या चालीला राजाकडे भागात दोघांनीही कॅसलिंग करून आपले राजे सुरक्षित ठेवले.लगेच डिंग लिरेनकडून एकामागोमाग एक आक्रमक चाली रचल्या गेल्या.अठराव्या चालीला वजिरावजिरी करून झाल्यावर ४२ व्या चालीला रुक एन्ड पॉन एंडिंगने डावातील अखेरच्या पर्वाला सुरुवात झाली.दोघांकडील मोहऱ्यांची स्थिती पाहाता एरोनियन काळी मोहरी असली तरी त्याची बाजू वरचढ वाटत होती.
यावेळी एरोनियनकडे दोन प्यादी जास्त होती आणि नेमक्या याच वेळेला जगभरातून इंटरनेटवर हा चौथा डाव पाहाणाऱ्या एरोनियनच्या फॅन वर्गाने दणादण त्याच्या बाजूने विजयी प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली होती.

पण डिंग लिरेन काही डगमगलेला नव्हता.शांतपणे त्याने ४४ व्या चालीला दोन हत्तींच्या साहाय्याने काळ्या राजाच्या शेजारी असलेल्या e ६ या प्याद्यावर हल्ला चढवायची आक्रमक चाल रचली आणि ती थोपवण्यासाठी एरोनियनने हत्ती बचावासाठी मध्ये आणला.

साहजिकच त्यानंतर पुढील ४५ व्या चालीला एकमेकांचे हत्ती पटाबाहेर जाणे अपरिहार्य असल्याने लगेच ४७ व्या चालीला डिंग लिरेनने b ६ हे बचावाविना एकाकी पडलेले एरोनियनचे प्यादे खाल्ले आणि b ५ या स्थानी असलेल्या आपल्या प्याद्याचा वजीर होण्याचा मार्ग मोकळा केला.

यानंतर ५० व्या चालीला हे b फाईलमधले प्यादे सातव्या घरात लिरेनने हत्तीच्या साहाय्याने आणून ठेवल्यावर डावातली उत्कंठा शिगेला पोचली मात्र लगेच इंटरनेटवर जगभरातील सर्व बुद्धिबळप्रेमी वर्गाचा प्रतिक्रियांचा एकामागून एक असा न थांबणारा नुसता मारा सुरु झाला.

याच वेळी ५१ व्या चालीला डिंग लिरेनच्या राजाला d फाईलमधून शह देत आपला हत्ती लिरेनचे हे वजीर बनू पाहाणारे प्यादे थोपवण्यासाठी c १ वर आणून ठेवला खरा पण त्याच्या g ५ आणि h ४ फाईलमध्ये असणारी प्याद्यांची जोडी राजाचा सपोर्ट नसल्याने अर्धांगाने लुळी पडल्यासारखी झाली.
त्यामुळे परत लागोपाठ तिसऱ्या वेळी क्वीन्स पॉन ओपनिंग प्रकाराने सुरु झालेला हा डाव पुढच्या ५२ व्या चालीला बरोबरीच्या प्रस्तावाने सुटला.

आता एकंदरीत बरोबरीत सुटलेल्या या चारी डावांचा विचार करता दोघांनाही एकमेकांच्या खेळाचा अंदाज आला आहे आणि त्यामुळे कदाचित आता पुढील पाचव्या डावात पांढरी मोहरी घेऊन खेळणाऱ्या एरोनियनकडून वेगळ्या ओपनिंगने सुरुवात होण्याची शक्यता वाटते.

हे पुढचे डाव आता रॅपिड म्हणजे जलदगती प्रकाराने खेळवले जातील आणि त्यातूनही बरोबरीची होणारी तुल्यबळ कोंडी न फुटल्यास रॅपिडपेक्षा अधिक जलदगती प्रकाराचे कमी वेळात खेळवले जाणारे ब्लिट्झ प्रकारचे डाव खेळले जातील.

बरोबरीत सुटणाऱ्या त्याच त्याच डावांमुळे कधीकधी पेच निर्माण होतो,शिवाय वाया जाणारा काळ – वेळेचा अपव्यय टाळला जावा याकरता सामने लवकर निकाली होण्यासाठी अशा वेळी ठराविक मोजक्या डावांनंतर जलदगती रॅपिड आणि त्याही पुढे ब्लिट्झ प्रकाराचा अवलंब करायचा फिडे संघटनेचा घेण्यात आलेला निर्णय अतिशय स्तुत्य असाच आहे.

शेवटी काय क्रिकेटप्रमाणे टेस्ट , वन डे आणि ट्वेन्टीमधील मिळणारी लोकप्रियता आता बुद्धिबळाला या प्रकाराने मिळत आहे.
शिवाय खरा खेळाडू या तिन्ही क्लासिकल – रॅपिड आणि ब्लिट्झ प्रकारांत खेळण्यासाठी पारंगत असावयास हवा हाही आणखी एक विचार त्यामागे केला गेला आहे.
तर मग आता आर्मेनियाचा गरुड आपले पंख पसरून विजयी भरारी घेतो की ड्रॅगनचा चीनी अवतार विजयी फुत्कार टाकतो याबाबत पाहायचे आता पुढे नक्की काय होते ते !

– अनीश दाते.

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons