Cricket with Dwarkanath Sanzgiri

 

 

…पण श्राद्ध घालावं लागलं!

क्रिकेट लेखकाचा व्यवसाय हा भटजीसारखा आहे. त्यांना लग्न लावावं लागतं आणि श्राद्धही घालावं लागतं. रविवारी मी लग्नाची तयारी केली होती. मांडव सजला होता आणि अचानक साश्रूनयनांनी श्राद्ध घालावं लागलं.

इंग्लंडचं हवामान, बायका आणि क्रिकेट या तिन्ही गोष्टी तशा बेभरवशाच्या आहेत. पण इतक्या बेभरवशाच्या? चॅम्पियन्स ट्रॉफीभर ‘यशश्री’ने भारतीय फलंदाजीबरोबर रोमान्स केला आणि मोहम्मद अमीरच्या एका कटाक्षासरशी ‘ही’ त्याच्याबरोबर निघून गेली. दीपिका पदुकोनही आपला प्रियकर इतक्या लवकर सोडत नाही.

फलंदाजांचा फॉर्म भारताच्या बाजूने, खेळपट्टी मूळ हिंदुस्थानी, पण पासपोर्ट तेवढा ब्रिटिश… बुमरा आणि भुवनेश्वर कुमार असे फॉर्मात की शेक्सपियरच्या शायलॉकलाही आपल्यापेक्षा कुणीतरी कंजूष, चिकट आहे याची खात्री व्हावी. टॉसने भारताच्या बाजूने कौल दिलेला आणि मुख्य म्हणजे पहिल्या सामन्यात पाकिस्तानला एव्हढं बदडलं होतं की त्या जखमा चटकन भरण्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे विजयाशी छत्तीस गुण जुळावे अशी ही पत्रिका होती. त्याउलट पाकिस्तानने या स्पर्धेत कधी तीनशे धावांची वेस ओलांडली नव्हती. त्यांच्या गोलंदाजांनी त्यांना यश मिळवून दिलं होतं. तरीही पाकिस्तान हिंदुस्थानविरुद्ध एक छोटी लढाई हरला आणि पानिपत जिंकला. प्रश्न असा आहे की, पाकिस्तानी संघाने आपल्या पायावर कुऱ्हाड मारली की आपण स्वतःहून कुऱ्हाडीचा पात्यावर पाय ठेवला?

दोन्ही गोष्टींत तथ्य आहे.

मुळात टॉस जिंकल्यावर पाकिस्तानला पहिली फलंदाजी द्यायची गरज होती का? पहिल्या सामन्यात आपण पहिली फलंदाजी करून पाकिस्तानला हरवलं होतं. त्यांचा इम्रान खान पाकिस्तानला ओरडून सांगत होता, ‘‘बाबांनो, टॉस जिंकलात तर प्रथम फलंदाजी करा. भारताला फलंदाजी दिलीत आणि त्यांनी 300 धावा केल्या तर संपलात.’’ इम्रान हे सांगायला काय खुळा होता? त्यालाही भारताच्या फलंदाजीच्या ताकदीची आणि पाकिस्तानच्या फलंदाजीची कल्पना होती. अंतिम सामन्यातले दबाव वेगळे असतात. त्यात पुन्हा भारताकडे सर्वजण संभाव्य नाही, तर शंभर टक्के विजेता म्हणून पाहात होते. त्यामुळे हिंदुस्थानी संघावर दबाव जास्त होता. या दबावाने बुमराच्या सुरुवातीच्या षटकातली अचूकता खाऊन टाकली. नशिबाने फखरच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो त्याच्या करियरच्या फक्त पाचव्या सामन्यात आणि चक्क जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात…

त्याच्या गावात पठाण मंडळी बंदुकीशी ज्या सहजतेने खेळतात त्या सहजतेने तो हिंदुस्थानी गोलंदाजीशी खेळला. हिंदी सिनेमाच्या स्टाइलमध्ये सांगायचं तर ‘उसके आँखो में आऊट होने का खौफही नही दिखायी दिया.’ त्याने वाटाणे सोलावे त्या सहजतेने जाडेजा-अश्विनची गोलंदाजी सोलली. पण त्याचं ते कामच होतं. प्रश्न असा आहे की, आपले गोलंदाज आणि कर्णधार काय करत होते? तो स्पिनच्या विरुद्ध दिशेला जाडेजाला स्क्वेअर कट मारतोय आणि जाडेजा त्या चेंडूचा नैवेद्य त्याला दाखवतोय. बरं कर्णधारालाही तिथे डीप पॉइंट ठेवावा हे कधी सुचावं? जाडेजाची गोलंदाजी सोलून झाल्यावर? कर्णधार कोहली स्मृतिभ्रंश झाल्याप्रमाणे नेतृत्व करत होता. तो आपल्याकडे केदार जाधव आहे. त्याने मागच्या सामन्यात दोन महत्त्वाचे बळी मिळवून दिलेले आहेत हेही विसरला. त्या स्मृतिभ्रंशाच्या स्पेलमध्ये त्याने अनुष्का शर्मालाही कदाचित नेहा शर्मा अशी हाक मारली असती.

अश्विनला आपण मॅचविनर म्हणतो. तो आहे मॅचविनर, पण कुठे? भारतात चेंडू फिरतो तेव्हा. पण भारतीय खेळपट्ट्यांवर रविचंद्रन अश्विनच काय शरदचंद्र पवारही चेंडू फिरवू शकतात. अश्विनने हिंदुस्थानी उपखंडाबाहेर स्वतःच्या गोलंदाजीवर जिंकून दिलेली मॅच विकिपिडीयालाही आठवत नाही. बाय द वे, अश्विनने एक नवा चेंडू शोधला त्याचं काय झालं का जुनंही सर्व विसरला. अश्विनला विराट दहा षटकं देऊ कशी शकतो? अश्विनला पूर्ण कोटा देण्यामागे तीन कारणं असू शकतात… एक म्हणजे विराटचा स्मृतिभ्रंश, दोन तो विराटच्या जवळच्या नात्यातला असावा किंवा तिसरं म्हणजे धोनीने त्याला सल्ला देणं थांबवलं असावं. फलंदाजी नवखी असून संघात एकही सुपरस्टार फलंदाज नसून आणि फार मोठा फॉर्म नसून पाकिस्तानने फलंदाजी करताना उत्तम आखणी केली. आधी भुवनेश्वर कुमारला मान दिला, मग जाडेजा-अश्विनवर हल्ला केला (सौजन्य विराट कोहली). ३० ते ४० षटकांदरम्यान धावांची गती वाढवली आणि पहिल्या शतकी भागीदारीनंतरही भागीदाऱ्या केल्या. त्यामुळे तो ३३८ चा डोंगर उभा राहिला.

अंतिम सामन्यात एवढ्या मोठ्या संख्येचा पाठलाग कठीणच असतो. त्यात पाकिस्तानी गोलंदाजी ही या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी होती (पाकिस्तान इतके डावखुरे वेगवान गोलंदाज आणते कुठून? अर्धं पाकिस्तान डावखुरं आहे का?). पण त्याचबरोबर खेळपट्टीवर ढिम्म काही होत नव्हतं. जुनैद सोडला तर याच पाकिस्तानी गोलंदाजीला आपण फोडून काढलं होतं. हिंदुस्थानचा प्रत्येक फलंदाज फॉर्मात होता आणि फलंदाजांचा रेकॉर्ड पहा.. एकसे बढकर एक! आठव्या क्रमांकाच्या जाडेजापर्यंत आम्ही फलंदाजी करतो हा केवढा तोरा! अरे हो, अश्विनही कसोटी शतकवीर!

पण एक महम्मद अमीर नावाची वीज कोसळली काय आणि फलंदाजीचा टायटॅनिक टॉवर जमीनदोस्त झाला. अमीरचं कर्तृत्व आपल्याला ठाऊक होतं. आपल्या डावपेचात त्याची पहिली पाच षटकं नीट खेळून काढणं हा महत्त्वाचा भाग असायला हवा होता की नाही? मला त्याच्या पहिल्या तीन बळींपैकी विराट कोहलीचं आश्चर्य वाटलं. विराट आता स्वतःच्या गल्लीत खेळला तरी त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू खिलवले जाणार. सोम्यागोम्याना तो दाद देत नाही, पण इथे अमीर होता. वेगवान बाऊन्स असणारा आणि नैसर्गिक ऍक्शनने चेंडू स्लिपकडे नेणारा! विराटची बॅट त्याच्याकडे सुंदर मुलगी दिसल्यावर मान वळावी तशी वळली. त्याचा झेल सुटला. पण त्यानंतर पुढच्या चेंडूवर तसाच चेंडू ऑनला काढायची काय गरज होती? तो अजून सेट झालेला नाहीए हे विराटला कळलं होतं. तरीही तो शॉट खेळला. याला मी पाय कुऱ्हाडीवर ठेवणं म्हणतो. महम्मद अमीर नावाची वीज कोसळल्यानंतर जिंकायची आशा करणं म्हणजे पेशंट व्हेंटिलेटरवर असताना आशा आपण जागृत ठेवतो तसं जागृत ठेवणं होतं. युवराज-धोनी आता म्हातारे सिंह आहेत. सणासुदीला फक्त त्यांची डरकाळी ऐकू येते. पंड्या लढला आणि चांगला लढला. पण ती लढत म्हणजे नसबंदी झालेल्या पुरुषाला बाप बनवण्याची वांझोटी धडपड होती. तरीही जाडेजाने स्वतःची विकेट देऊन पंड्याला शतकापर्यंत जायची संधी द्यायला हवी होती. जाडेजासारख्या ज्येष्ठ खेळाडूला ही साधी गोष्ट कळू नये? त्याच्या शतकाने मॅच जिंकली गेली नसती; पण जाताजाता जखमेवर एक हळुवार फुंकर तर मारली गेली असती.

शारजात जावेद मियाँदादने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराची जखम अश्वत्थामाच्या जखमेसारखी खूप वर्षं भळभळ वहात होती… हीसुद्धा पटकन भरणार नाही. पण आपण मॅच हरलोय, युद्ध नाही हेसुद्धा समजून घेतलं पाहिजे.

द्वारकानाथ संझगिरी.
दैनिक सामनासाठी लिहिलेला लेख.

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons