
तरी हिंदुस्थानची दादागिरी कमी होणार नाही!
बांगलादेशला भारतीय संघाने हरवलं त्याला ‘हरवणं’ म्हणणं म्हणजे ‘संहारा’ला केवळ मारलं म्हणण्यासारखं आहे. बांगलादेशच्या २६५ धावांचा आपल्या फलंदाजांनी चोळामोळा केला. चौपाटीवर भेळपुरी खाल्ल्यावर ज्या तुच्छतेने आपण त्या कागदाचा चोळामोळा करून डस्टबिनमध्ये टाकतो, त्या तुच्छतेने केलेला तो चोळामोळा होता.
बांगलादेशने उभारलेल्या २६५ धावांना अनेकांनी केवळ सवयीने ‘आव्हान’ वगैरे म्हटलं. एरवी जागतिक स्पर्धेतल्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात २६५ धावांचा पाठलाग हा आव्हानात्मक वगैरे ठरू शकतो, पण एजबॅस्टनची खेळपट्टी, भारतीय फलंदाजीची ताकद, फॉर्म आणि बांगलादेशी गोलंदाजी यांचा विचार करताना २६५ धावा हे म्हणजे अमिताभ बच्चनसमोर अरमान कोहलीचं आव्हान आहे, असं म्हणण्यासारखं होतं. भारताच्या फलंदाजीने एक निरोप जगाला दिला की, अशी खेळपट्टी उत्तर ध्रुवावर किंवा मंगळावर तयार केली तरी हिंदुस्थानी संघाची दादागिरी सध्या कमी होणार नाही.
या सामन्यात हिंदुस्थानने टॉस जिंकणं हे विजयाचं धृपद होतं. बांगलादेशला फलंदाजी करायला सांगताना कोहलीने क्षणभरसुद्धा डोकं खाजवलं नसेल. आभाळात सावळ्या ढगांचा मोर्चा होता. ताबडतोब भुवनेश्वर कुमारने हात धुऊन घेतले आणि त्यासाठी आत्मसमर्पणाचा साबण बांगलादेशच्या फलंदाजांनी पुरवला. तरीही पुढे तमीम इक्बाल आणि मुशफिकर रहीमने जेव्हा आरामात १२३ धावांची भागीदारी केली तेव्हा बांगलादेशला सव्वा तीनशे धावांचं स्वप्न तरी नक्की पडलं असावं. हार्दिक पंड्या देना बँकेचा एटीएम होताना पाहून आणि अश्विनला देशाबाहेर विकेट मिळणं कठीण होतंय, हे जाणवल्यावर धोनीच्या सल्ल्याने विराटने चेंडू केदार जाधवच्या हातात ठेवला. धोनीवर ग्लोबल वॉर्मिंगचा काहीही परिणाम झालेला नाही. मैदानावरचं वातावरण कितीही तापलं तरी हा बर्फाला हेवा वाटावा इतका थंड असतो. केदारने यापूर्वीही भागीदाऱ्या मोडायचं कार्य केलंय. यावेळीही त्याने दोन दर्जेदार सेट फलंदाज बाद करून बांगलादेशच्या पळत्या पायात गोळी घातली. तो गोलंदाजीचा फारसा सराव करीत नाही, पण राऊंड आर्म अॅक्शनने अचूक दिशा, टप्पा आणि वेगात बदल यावर त्याच्या गोलंदाजीकडे ‘धावांची संधी’ म्हणून पाहणाऱ्या फलंदाजांचा तो विश्वामित्र करतो.
बांगलादेशचे फलंदाज अचानक दबावाखाली आले. त्यांच्यावर दबाव बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने वाढवला. भुवनेश्वरच्या गोलंदाजीने आता कात टाकलीय. चेंडू इंग्लंडमध्ये स्विंग होत नाही म्हटल्यावर तो यॉर्करचे सर्व प्रकार टाकतोय. पण उसळत्या चेंडूलाही त्यानं या स्पर्धेत शस्त्र बनवलंय. एकेकाळी ट्रामचा वेग होता त्याचा! आता तो दुरांतो एक्प्रेस व्हायची महत्त्वाकांक्षा बाळगून असल्याप्रमाणे गोलंदाजी करतो. बुमराहबद्दल माझा थोडा गैरसमज झालाय. काही महिन्यांपूर्वी तो मला आईच्या पोटातून यॉर्कर शिकून आलाय असं वाटायचं. आता तर तो मला मागच्या जन्मात शिकलेला यॉर्कर अजून विसरलेला नाही असं वाटतं. शेवटी कर्णधार मसरफीने गदा फिरवली. त्यामुळे बांगलादेश २६४ पर्यंत पोहोचला.
रोहित शर्मा आणि धवन असे फलंदाजीला आले की, घराबाजूच्या गल्लीत ते मॅच खेळतायत. त्यांच्यावर दबाव असलाच तर तो ना त्यांच्या फटक्यात दिसला ना चेहऱ्यावर! रोहित शर्मा त्याच्या बोरिवलीच्या मैदानातच खेळतोय, फक्त ते मैदान जादू झाल्याप्रमाणे मोठं होऊन एजबॅस्टन झालं असं वाटलं. मला कुणी विचारलं की, क्रिकेटमध्ये ‘टायमिंग’ची व्याख्या काय तर मी सांगेन, मला व्याख्या करता येणार नाही, पण जेव्हा जखमेवर नाजूक फुंकर मारावी तशी रोहित शर्माची बॅट चेंडूवर फुंकर घालते आणि मग चेंडू गवताला गुदगुल्या करीत थेट सीमापार क्षणात दिसतो त्याला टायमिंग म्हणतात. धवन आता पूल करायला योग्य चेंडूची निवड करायला लागलाय. पण कलिंगाच्या लढाईनंतर संहार अति झाला म्हणून सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला तसा धवनच्या बॅटने अचानक अहिंसा धर्म स्वीकारल्यासारखं वाटलं. एरवी तो बाद होईल असं वाटत नव्हतं. त्याच्या बाद होण्यामागे निव्वळ बांगलादेशबद्दलची दयाबुद्धी असावी.
पण विराट कोहली कुठलीही दयामाया दाखविण्यासाठी फलंदाजीला आला नव्हता. त्याला डोळ्यांसमोर आंतरराष्ट्रीय धावा स्वस्त झालेल्या दिसत होत्या. त्याने का संधी सोडावी? त्यात जगभरातल्या गोलंदाजांना वाटतं की, कोहलीला सुरुवातीला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू खिलवले की तो बाद होतो. होय, त्याच्या फलंदाजीतलं ते भगदाड अजून पूर्णपणे बुजलेलं नाही, पण त्यासाठी चेंडूला मूव्हमेंट असावी लागते. तो सोम्यागोम्याला बाद होत नाही. ज्या अॅण्डरसनने त्याची इंग्लंडमध्ये झोप उडवली होती त्यालाही त्याने भारतात दाद दिली नाही.
बांगलादेशच्या गोलंदाजांनी त्याला ऑफ स्टंपच्याबाहेर जितके जास्त चेंडू खिलवले, तितके जास्त कव्हर ड्राइव्हज् पाहायला मिळाले. कधी फ्रंटफूटवर, कधी बॅकफूटवर! गुरुवारी बांगलादेशच्या गोलंदाजांना तो कव्हर्स मधून जन्मभर मारत राहिला असता. रोहित शर्मा कव्हर ड्राइव्ह मारताना चेंडूपुढे फारसा वाकत नाही, पण तो अशा फॉर्मात आहे की, तो न वाकता बॅटच्या दांड्याने पण कव्हर ड्राइव्ह मारेल. पण विराट कोहली अगदी प्राचीन पिढीतल्या फलंदाजांप्रमाणे कव्हर ड्राइव्ह मारतो. एकदा रुसी मोदी या प्राचीन पिढीतल्या महान फलंदाजाने मला सांगितलं होतं, ‘‘इंग्लंडमध्ये मी एका सामन्यात दोन कव्हर ड्राइव्ह मारल्यावर स्लिपमधून नापसंती दाखवत वॉली हॅमंडने मान हलवली आणि म्हटलं, ‘You must bend in your drives lad’ आणि मग तसे फटके मारल्यावर ‘That’s the way’ असं म्हटलं.’’ त्या काळी प्रतिस्पर्धी स्लिप मधून घराण्याचा उद्धार न करता चांगल्या सूचना देत. रोहितने हक्काचं शतक मिळवलं. विराटला हक्काच्या शतकाच्या उंबरठ्यावरच थांबावं लागलं.
बांगलादेशनं ३५० धावा करूनही काही फरक पडला नसता. कारण वादळ थोपवता येत नाही. तुमचं दुर्दैव असेल तर त्यात तुम्ही संपता.
बांगलादेशचं तेच झालं!
द्वारकानाथ संझगिरी.
दैनिक सामना मधील लेख.