वरळी स्पोर्ट्स क्लब कुमार गट कबड्डी स्पर्धा- Kabbadi Special!

 

विकास,एस.एस.जी.,विजय क्लब, गोलफादेवी यांनी वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित व नमन ग्रुप पुरस्कृत कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. विकास वि.एस.एस. जी.फाउंडेशन आणि विजय क्लब वि. गोलफादेवी अशा उपांत्य लढती होतील. आदर्श नगर येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या मुलांच्या सामन्यात विकासने दिलखुशचा ४०-१४असा धुव्वा उडविला. सावध सुरुवात करीत मध्यांतराला१७-०७अशी आघाडी घेणाऱ्या विकासने नंतर आणखी जोरात खेळ करीत २६गुणांनी सामना खिशात टाकला. आकाश मयेकर, राज सिंग या मोठ्या विजयाचे शिल्पकार ठरले.दिलखुशच्या सुमित कदमला आज म्हणावा तसा सूर सापडला नाही.
 
एस.एस.जी.फाउंडेशनने ओम् श्री साईनाथ ट्रस्टचा कडवा प्रतिकार ३०-२४असा परतवून लावला.पंकज मोहिते, सरोज चाचे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर फाउंडेशनने विश्रांतीला २२-०७अशी मोठी आघाडी घेतली होती.उत्तरार्धात मात्र साईनाथच्या श्रेयश कामतेकर,सिद्धेश राऊत यांनी जोरदार प्रतिहल्ला करीत ही आघाडी भरून काढण्याचा सपाटा लावला. परंतु वेळेचे गणित त्यांना न साधता आल्यामुळे ६गुणांनी पराभव पत्करावा लागला.विजय क्लबने ओम् ज्ञानदीपचे आव्हान ३२-२१असे सहज संपविले. पूर्वार्धत १५-०८अशी आघाडी घेणाऱ्या विजयने उत्तरार्धात सावध खेळ करीत आहे ती आघाडी ठिकविण्यावर भर दिला व सामना आपल्या नावे केला.राजू नाटेकर, अभिषेक रुपकर, अभिषेक रामाणे या विजयात चमकले. ज्ञानदीपच्या राहुल शिरोडकर, ओमकार येणापुरे यांचा खेळ संघाला विजयी करण्यात कमी पडला.
 
शेवटच्या सामन्यात गोलफादेवीने सिध्दीप्रभाचा ५४-१९असा फडशा पाडला.शार्दुल हरचकर, धनंजय सरोज यांच्या धारदार चढाया त्याला कल्पेश म्हात्रे याची पकडीची मिळालेली भक्कम साथ यामुळे त्यांनी पूर्वार्धातच ३४-०८अशी विजयी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात त्यात सावधपणे भर टाकत सहज उपांत्य फेरीत धडक दिली. सिध्दीप्रभाच्या ओमकार पवार,विवेक मोरे यांचा खेळ आज बहरलाच नाही.
By SPORTSNASHA
 

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons