Cricket with Dwarkanath Sanzgiri

पुणे सुपरजायंटच!

द्वारकानाथ संझगिरी

पुण्याने मुंबईला आयपीएल मॅचमध्ये हरवलं असं मी मुळीच म्हणणार नाही. अंबानीच्या संघाशी माझं भावनिक नातं असायचं काही कारण नाही. मुंबईच्या रणजी संघाच्या बाबतीत ते असतं. श्रीमंतांनी सोनेरी दाणे टाकून झुंझवलेल्या कोंबडय़ांच्या बाबतीत अजून एक कोंबडा आपला का वाटावा? पण मॅच टी-20 ची व्हायला हवी तशी झाली.

मुंबई इंडियन्सने सुरुवात चांगली केली. मग इम्रान ताहीर या लेगस्पिनरने मधल्या फळीची दाणादाण उडवली. लेगस्पिनर यशस्वी ठरलाकी मला बरं वाटतं. ती कठीण कला आहे, पणएकदा ती आत्मसात केली की त्या कलेचा अविष्कार भन्नाट असतो. एकेकाळी वन डे क्रिकेटच्या अंगणात, ‘‘तुम्हारा क्या काम है’’ असं लेगस्पिनरला म्हटलं जाई. 1984 ची गोष्टआहे. सुनील गावसकर कर्णधार होता. आपला संघ बेन्सन ऍण्ड हेजेस साठी ऑस्ट्रेलियाला जायला निघाला होता. आमच्या वासू परांजपेने(मुंबईचा माजी रणजी खेळाडू) सुनीलला सांगितले, ‘‘शिवरामकृष्णनला घेऊन जा. लेगस्पिनर दहा षटकांत किती धावा देईल? 50-60? पण तो तीन-चार विकेटस् काढून देईल. वन डेत विकेटस् महत्त्वाच्या असतात. विकेट्स मुळे प्रतिस्पर्ध्याच्या शेपटापर्यंत लवकर जाता येतं. सुनीलने वासूचं ऐकलं.शिवरामकृष्णन ऑस्ट्रेलियाला गेला. आपण तो कप जिंकला. त्यात शिवाचा वाटा मोठा होता.शिवाचा लेगस्पिन त्याचा तिसरा डोळा ठरला.तिथपासून लेगस्पिनरला संधी मिळत गेली. कादीर, शेन वॉर्न, कुंबळे वगैरेने सामने जिंकूनदिले. इम्रान ताहीर तेच करतोय.

पण ताहीरच्या कामगिरीवर अशोक दिंडाने शेवटच्या षटकांत पाणी फेरलं होतं. हार्दिक पंडय़ाने दिंडाच्या गोलंदाजीचे धिंडवडे काढले म्हणून मुंबई इंडियन्सला 182 पर्यंत जाता आलं.

पुण्याच्या रायझिंग सुपर जायंटस्ने आपल्यात सुपर जायंटस् आहेत हे दाखवून दिले.

पहिला सुपरजायंट होता अजिंक्य रहाणे. जिंकलेल्या कसोटीची दुसरी खेळीच तो पुढे नेतोय असं वाटलं. कोण म्हणतो तो आक्रमकपणे खेळू शकत नाही आणि षटकारठोकू शकत नाही? कुणाच्या मनात हा विचार असेल तर तो भूतकाळात वावरतोय. फक्त पुन्हा मला त्याला एकच सांगायचंय, “बाबा रे, द्रविडचा आदर्श ठेव, पण मैदानावर हसायला बंदी नाही. परफॉर्मन्स दिल्यावर बिलकूल नाही. जमत नसेल तर अजय जाडेजाची शिकवणी ठेव. तो तरुण मुलीने ‘दादा’ म्हटलं तरी हसायचा.’’

दुसरा सुपर जायंट स्टिव्हन स्मिथ! त्याने पॅडस् बांधले की गोलंदाज आता भयभीत होतअसतील. कसोटी आणि टी-20 यात त्याला काही फरक पडत नाही. फक्त कपडय़ाचे रंग बदलतात. अर्जुनाच्या अक्षय भात्यासारखी बॅट आता अक्षय वाटतेय. धावाचं महारुद्र सुरूच आहे. त्याला रोखण्यासाठी ऑफ स्टंपच्या बाहेर मारा केला जात होता आणि तो ऑनला ‘रट्टे’ ओढत होता. कुमार गंधर्वांना तबलजीने साथ द्यावी तशी धोनी त्याला फक्त साथ देत होता. जे पूर्वी धोनी करायचा ते त्याने केले. शेवटच्या षटकात दोन षटकार ठोकून मॅच संपवली. धोनीच्या ‘बॅटला’आपलं तारुण्य आठवलं असेल.

अंबानी जिंकला की आणि कुणी काय करायचंय आपल्याला? ‘‘मजा आली’’ हे नक्की!

SPORTSNASHA
www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.
http://www.sportsnasha.com