२८वी किशोर/किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा-कोईमतूर
मुलांचा संघ उपउपांत्य फेरीत,तर मुली उपउपांत्यपूर्व फेरीतच गारद!
कोईमतूर-केरळ येथे सुरू असलेल्या “२८व्या किशोर/किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांना उपउपांत्य फेरीत,तर मुलींना उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. साई वि. तामिळनाडू व हरियाणा वि. हिमाचल प्रदेश असा मुलांमध्ये तर साई वि. छत्तीसगड व हरियाणा वि. उत्तर प्रदेश अशा मुलींमध्ये उपांत्य लढती होतील. मुलांच्या उपउपांत्य पूर्व सामन्यात महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचे आव्हान ५४-३३असे परतवून लावले. मध्यांतराला २९-२०अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने शानदार खेळ करीत हा सामना खिशात टाकला. सुरज पाटील, महेश भोईर या विजयाचे शिल्पकार ठरले. उपउपांत्य फेरीच्या सामन्यात मात्र महाराष्ट्राला हा जोश राखता आला नाही.या सामन्यात साई सेन्टरने महाराष्ट्राचा प्रतिकार ५५-२२असा सहज मोडून काढला.मध्यांतराला ३६-११अशी मोठी आघाडी घेणाऱ्या साईने महाराष्ट्राला डोकं वर काढू दिले नाही. महाराष्ट्राच्या खेळाडूंना या सामन्यात शेवट पर्यंत सूरच सापडला नाही.यामुळे महाराष्ट्राचा दारुण पराभव झाला.
महाराष्ट्राच्या मुलींना उपउपांत्य पूर्व फेरीत हिमाचल प्रदेशकडून २०-३०असा १०गुणांनी पराभव पत्करावा लागला.मध्यांतराला ११-१७अशा पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राला नंतर सूर सापडला नाही. पायल वसवे, ऋतुजा लांडे यांचा या सामन्यात खेळ बहरलाच नाही.
उपउपांत्य फेरीचे इतर निकाल:-
मुले:- १)हरियाणा वि. वि. दिल्ली (६२-४१); २)छत्तीसगड वि. वि. राजस्थान ३६-१४); ३)उत्तर प्रदेश वि. वि. कर्नाटक (४६-१८)
मुली:- १)साई सेंटर वि. वि. उत्तर प्रदेश (३२-१५); २)हरियाणा वि.वि. आसाम (४०-०९); ३)हिमाचल प्रदेश वि. वि. प.बंगाल (४९-२८); ४)तामिळनाडू वि.वि. मध्य प्रदेश(२९- २४).