माजी राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडे विजयी
पी. एम. बाथ स्विमिंग अँड बोट क्लबच्यावतीने आणि मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या आयोजित केलेल्या आमंत्रितांच्या स्पर्धेत माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेने आंतर राष्ट्रीय खेळाडू संदीप देवरुखकरला २५-९,१९-१८ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून विजेतेपद पटकाविले. योगेशने पहिला सेट सहज जिंकून आघाडी घेतली आणि दुसऱ्या सेटमध्येही तो ४ थ्या बोर्डानंतर ११-६ असा आघाडीवर होता. परंतु ५ व्या बोर्डात संदीपने व्हाईट स्लॅम करून ११-१८ अशी आघाडी घेतली. मात्र ८ व्या बोर्डात शेवटच्या क्षणी संदीपला नशिबाची साथ न मिळाल्याने केवळ १ गुणांच्या फरकाने १९-१८ असा सामना गमवावा लागला. योगेशने अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी माजी राज्य विजेता अनंत गायत्रीला २५-५,२५-६ असे सहज पराभूत केले होते. तर संदीपने दिलेस खेडेकरवर २२-१६,२२-१२ अशी मात केली होती.
विजेत्यांना मफतलाल क्लबचे सचिव हितेश शाह यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी क्लबचे स्पर्धा आयोजक भूषण जॅक, मुंबई संघटनेचे सचिव यतीन ठाकूर, उपाध्यक्ष अरुण केदार व बुजुर्ग माजी राष्ट्रीय विजेते खेळाडू सुहास कांबळी उपस्थित होते