
जय भारत, सर्वोत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव, श्री.छत्रपती, बालवीर यांनी अशोक मंडळ आयोजित द्वितीय श्रेणी प्रौढगट कबड्डी स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने मफतलाल कंपाऊंड मैदान,करिरोड नाका,लोअर परेल येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या सामन्यात जय भारत सेवा संघाने जय खापरेश्वरचा ३०-१५असा सहज पराभव केला. मध्यांतराला १४-०८अशी आघाडी घेणाऱ्या जय भारतने उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय सोपा केला.मनिष दळवी,सौरभ खामकर,चेतन परब या विजयाचे शिल्पकार ठरले.खापरेश्वरचा जयेश होरंबळ एकाकी लढला. सर्वोत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शिवाजी स्पोर्ट्सचा ४०-३०असा पाडाव केला. गणेश पार्टे,गणेश कदम यांच्या चतुरस्त्र खेळाने गणेशोत्सव मंडळाने विश्रांतीला १८-०९अशी भक्कम आघाडी घेतली होती.उत्तरार्धात मात्र त्यांना शिवाजीच्या सरन, अय्यप्पा यांनी कडवा प्रतिकार केला.अन्य सामन्यात श्री छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेने महाराष्ट्र स्पोर्ट्सला ३५-२२ तर बालवीरने रत्नकुमारला ३५-१९असे नमवित दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.