CRICKET WITH DWARKANATH SANZGIRI
इच्छाशक्ती, टेंपरामेंट अन् दर्जा! – द्वारकानाथ संझगिरी
स्मिथ-पुजारा-हॅण्डस्कोम्ब वगैरे मंडळीने दाखवून दिले की, कसोटी फलंदाजीची कला अजून जिवंत आहे. ती म्युझियममध्ये जाऊन पडलेली नाही. आजच्या टी-20 च्या जमान्यात इच्छाशक्ती, टेंपरामेंट आणि दर्जा असेल तर केवळ घडय़ाळावर नाही तर एक डोळा कॅलेंडरवर ठेवून फलंदाजी करता येते.
स्मिथ आणि पुजारा एकाच रस्त्यावरून चालले, पण त्यांच्या समोरची आव्हानं वेगवेगळी होती.
स्मिथला जिंकलेला टॉस सार्थ ठरवायचा होता. त्याची जबाबदारी त्याच्यावर जास्त आहे याची त्याला जाणीव होती. कारण त्याची उरलेली फौज तशी नवखी आहे. तो खेळपट्टीवर पेइंग गेस्ट म्हणून आला. मग भाडोत्री झाला आणि शेवटी नाबाद राहून त्याने जवळपास मालकीहक्क गाजवला. एकेकाळी मी म्हणायचो की सुनील गावसकरला पाहून दहाव्या क्रमांकाचा फलंदाजही चेंडूच्या रेषेत येऊन खेळायला लागला. मोठा खेळाडू हा परिणाम घडवू शकतो. स्मिथला समोर पाहून मॅक्सवेल किती बदलला! आक्रमणाशिवाय त्याच्या रक्तात दुसऱया पेशी नाहीत असं वाटत असताना नुसत्या स्मिथला पाहून त्याच्या रक्तातल्या बचावात्मक पेशी वाढल्या. मॅक्सवेलमधला बदल पाहून मला उगीच वाटलं की जबाबदारीमुळे उद्या योगी आदित्यनाथ महात्मा गांधींसारखा बोलायला लागला तर आश्चर्य वाटू नये. स्मिथ हा आजच्या जगातल्या सर्वश्रेष्ठ फलंदाजांच्या मांडीला मांडी लावून बसणारा फलंदाज आहे. ज्यो रूट आणि विल्यमसनची साजूक तुपातली तंत्रशुद्धता आणि क्लासिकल सौंदर्य त्याच्या फलंदाजीत नाही. विराट कोहलीच्या फलंदाजीतला उद्धटपणा नाही, पण त्याचं सामर्थ्य, त्याची फलंदाजी जो परिणाम साधते त्यात आहे. त्यांचं हे चेंडू टाकण्यापूर्वी बॅक ऍक्रॉस येणं गोलंदाजाच्या मनात ‘पायचीतचं गिऱहाईक’ असा संभ्रम उगाच निर्माण करते. असा संभ्रम एकेकाळी जावेद मियांदाद निर्माण करायचा. पण जावेदप्रमाणेच स्मिथ कसलेला ‘लोहार’ आहे. सोनाराच्या कलाकुसरीची त्याच्याकडून अपेक्षाच नको. पण त्याची ‘एक लोहारकी’ पंच महत्त्वाचा ठरतो.
पुजारा हा काही बाबतीत स्मिथच्या शाळेचा क्लासमेट आहे. पुजाराची फलंदाजी पाहायला मी हातचं काम सोडून जाणार नाही. पण हिंदुस्थानात कसोटी असेल तर संघ काढताना मी विराट कोहलीनंतर फलंदाज म्हणून त्याचं नाव लगेच लिहीन. तिसऱया क्रमांकाच्या फलंदाजीच्या अस्सल स्वरूपात तो बसत नाही. बापजाद्यांनी सांगितलेलं तिसऱया क्रमांकाच्या फलंदाजीचं तत्त्वज्ञान असं होतं. ‘लवकर विकेट पडली तर डाव सावरायचा. चांगला स्टार्ट मिळाला तर आक्रमण करायचं. म्हणून तिसऱया क्रमांकावर आक्रमक फलंदाज हवा.’ आमच्या पिढीच्या डोळय़ांसमोर येणारे तिसऱया क्रमांकाचे फलंदाज म्हणजे डॉन ब्रॅडमन, रोहन कन्हाय, विव्ह रिचर्डस्, इयान चॅपेल, झ्हीर अब्बास वगैरे! ते त्या व्याख्येत बसणारे! पण ती व्याख्या धुडकावून लावूनही यशस्वी होणारे म्हणजे केन बॅरिंग्टन, राहुल द्रविड वगैरे. त्याच ट्रेनमधला पुजारा प्रवासी! ही गाडी उच्चभ्रूंची राजधानी नसते, पण संघाला सामावून घेऊन जाणारी मेल असते. पुजाराच्या या रांची कसोटीतल्या खेळीचा विचार केला तर सुरुवातीला जवळपास शतकी भागीदारी होऊनही पुजाराची सुरुवात ‘संथ वाहते कृष्णामाई’ थाटाची होती, पण त्याला या खेळीच्या बाबतीत संशयाचा फायदा द्यायला हवा. 450 धावांचा पाठलाग करताना त्याच्या डोक्यात विराटच्या दुखापतीचा विचार असेलच. पण त्याचबरोबर 450 धावांचा पाठलाग करताना चौथ्या डावातली फलंदाजी पाचव्या दिवशी टाळण्याचाही विचार असेल. आणखीन एक गोष्ट, हा चेंडू मृदू (Soft) झाला की त्यावर फटके मारणं कठीण जातं. त्याची हुशारी कुठे दिसली तर नवा चेंडू मिळाल्यावर त्याने ऐंशीच्या स्ट्राइक रेटने शतकापर्यंत घोडदौड केली. मग नवीन डावाची सुरुवात केल्याप्रमाणे त्याने पुन्हा चालायला सुरुवात केली. पण त्याने आणि साहाने भक्कम भागीदारी केल्यामुळे आघाडी तर मिळालीच. पण जाडेजाला. बिनधास्तपणे फटके मारता आले आणि मनात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळपट्टी चांगली असली तरीही पुणे, बंगळुरूच्या तुलनेत चांगली होती. फटकेबाजीसाठी कधीही योग्य नव्हती. त्यामुळे पुजाराने जे काही केलं ते योग्यच केलं. ते त्याच्या बॅटच्या स्वभावाला पूरकही होते. म्हणून तर हिंदुस्थानी संघाला विजयाच्या दरवाजाजवळ जाता आलं. दरवाजा उघडला नाही. त्याचं क्रेडिट हॅण्डस्कोम्ब–मार्शला जातं. पण पुजाराच्या खेळीला यशाचं कुंकू लागलं असतं तर तिचं ऐतिहासिक मूल्य वाढलं असतं.
पण या दोन खेळींनी दाखवून दिले की कसोटी फलंदाजीच्या खडतर कलेची ज्योत पेटवत ठेवणारे फलंदाज आजही जगात आहेत.