पॅडी नावाचा दधिची… द्वारकानाथ संझगिरी
पॅडी शिवलकर आणि राजेंद्र गोयलला ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन नियामक मंडळात वेगळे सुखद वारे वाहत असल्याची ग्वाही मिळाली. त्या दोघांना थेट विस्मृतीच्या पडद्याआडून काढून काही क्षणापुरतं का होईना, मखरात बसवलंय. तसे ते माझ्या पिढीच्या मखरातलेच खेळाडू! त्यांच्या कपाळावर कसोटी क्रिकेटचं कुंकू नाही म्हणून ते आम्हाला कधीच तसूभरही निम्न वाटले नाहीत. ते हिरेच होते. ‘दुर्दैव’ या एकमेव कारणामुळे ते कसोटी क्रिकेटपासून वंचित राहिले.
राजेंद्र गोयलला मी फारसं पाहिलं नाही. पण त्याने रणजीची सुरुवात बेदीपूर्वी केली आणि निवृत्त ४३व्या वर्षी बेदीनंतर झाला. पॅडीची कारकीर्द माझ्या डोळय़ांसमोर उभी आहे. लांबून कौतुकाने ज्या पॅडीकडे मी आधी पाहायचो तो बघता बघता माझा मित्र कधी झाला कळलंच नाही. त्या दोघांना पुरस्कार मिळाल्यावर तो मला मिळालाय असा आनंद झाला. पॅडीला काल सकाळी फोन केल्यावर त्याने मला आमच्या लाडक्या साहीर लुधियानवीच्या दोन ओळी ऐकवल्या.
‘‘जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया,
जो खो गया उसको भुलाता चला गया.’’
या वृत्तीने पॅडी जगला म्हणून आजही तो क्रिकेटची सेवा करतोय. वयाच्या 76व्या वर्षी उन्हात उभं राहून उद्याच्या पिढीवर संस्कार करतोय. पण खरं सांगू का, पॅडी या साहीरच्या गाण्याच्या दोन वाक्यांवरून पुढे जाऊन त्या गाण्यातल्या सर्वात महत्त्वाच्या या ओळींवर स्थिरावलाय. ते तत्त्वज्ञान त्याने आत्मसात केलंय…
‘गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां.
मैं दिल को उस मकामपे लाता चला गया.’’
मला वेगवेगळय़ा पर्वातला पॅडी आठवतो. सुरुवातीला शिवाजी पार्क जिमखान्याच्या पायरीवर बसून पाहिलेला पॅडी! तो आणि रमाकांत देसाई असताना समोरचे महान फलंदाजही आम्हाला पिग्मी वाटत. मग मुंबईला रणजी जिंकून देणारा पॅडी. १९७३ साली मद्रासला रणजीच्या अंतिम सामन्यासाठी खेळपट्टी बनवलीच नव्हती. एक शेतजमिनीचा तुकडा त्यांनी खेळपट्टी म्हणून जाहीर केला. व्ही. व्ही. कुमार आणि वेंकट राघवनला त्या शेतजमिनीचा फायदा व्हावा ही त्यांची अपेक्षा! परवा पुण्यात घडलं तेच तिथे घडले. त्यांनी लावलेल्या चक्रव्यूहात तेच धारातीर्थी पडले. कारण पॅडीला तो चक्रव्यूह कसा भेदायचा ते माहीत होते. दोन दिवस आणि एका चेंडूत मॅच संपली. मुंबई जिंकली. त्या काळात एकदा दिलीप सरदेसाईची मुलाखत मी घेतली होती. त्याला मी बेदी आणि पॅडीबद्दल विचारलं होतं. तो म्हणाला, ‘‘कुठे बेदी, कुठे पॅडी! कुठे इंद्राचा ऐरावत कुठे शाम भट्टाची तट्टाणी!’’ माझ्यासाठी मोठ्ठी स्टोरी होती. पण अख्खे मुंबईचे खेळाडू सरदेसाईवर नाराज होते. पण त्या सरदेसाईला नंतर म्हणावे लागले. ‘‘पॅडी आहे म्हणून आम्ही जिंकतो.’’ बेदी महानच होता, पण पॅडीला बेदीचा आंतरराष्ट्रीय अनुभव मिळाला असता तर तोसुद्धा बेदीप्रमाणे मोठा झाला असता. त्यावेळी हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये एकाच वेळी प्रसन्ना, वेंकट, चंद्रशेखर, बेदी, गोयल आणि पॅडी होते. तीन फिरकी गोलंदाज खेळवताना बऱयाचदा प्रसन्ना-वेंकट हे दोन ऑफस्पिनर खेळले; पण दोन डावखुरे फिरकी गोलंदाज कधीच खेळले नाहीत. त्यामुळे ना पॅडीला संधी मिळाली, ना गोएलला!
पॅडी शिवलकर केवढा चांगला गोलंदाज होता, हा प्रश्न मला आजच्या पिढीतल्या काही क्रिकेटप्रेमींनी अनेकदा विचारलाय. त्या पूर्वीच्या पॅडीला आज जाडेजाचं तारुण्य आणि खेळपट्टय़ा दिल्या तर तो करीयरमध्ये सहज ५०० कसोटी विकेट्स घेऊन गेला असता. रवी शास्त्रीसह त्याच्या पुढच्या पिढीपासून आजतागायत जेवढे जगाच्या कानाकोपऱयात डावखुरे फिरकी गोलंदाज झाले त्यातला एकही पॅडीच्या दर्जाचा नव्हता. जाडेजा कमरेच्या वर जाणार नाही. त्याची ती सुंदर ऍक्शन, ती चेंडूला फसवी उंची द्यायची कला, गवताला केवळ गुदगुल्या होतील असे फॉलो थ्रू. टर्न आणि निरुपद्रवी वाटणारा पण अचानक नागाच्या फण्याचं बळ दाखवणारा आर्मर. एकंदरीत तंत्रशुद्धता ही त्याच्या गोलंदाजीची खासियत होती आणि सर्वात महत्त्वाचं टेंपरामेंट, फिटनेस आणि महान फलंदाजाचं आव्हान स्वीकारायला लागणारी त्याची छाती. त्यामुळे कसोटी क्रिकेट न खेळताही तो महान गोलंदाज होता. आज कालचा कुठलाही डावखुरा गोलंदाज पहिल्या चेंडूपासून स्वीपर कव्हर किंवा डीप पॉइंट ठेवतो कारण आपल्या हातून शॉर्ट चेंडू पडणार नाही याची त्याला खात्री नसते. पॅडीने असे कधीच केले नाही. इतका आत्मविश्वास त्याच्यात होता.
त्याच्या रणजी कारकीर्दीचा शेवट तर सर्वात सुंदर होता. त्याचं वय होतं फक्त ४८ वर्षे! मुंबईचा कर्णधार दिलीप वेंगसरकर कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज शोधत होता. मुंबईची मैदानं त्याने पालथी घातली, पण एकही सापडला नाही. त्याने पॅडीला सांगितलं.‘‘तू खेळ.’’ तो पॅडी नावाच्या ‘दधिची ऋषींकडे’ वळला असं म्हणायला हवं. इंद्राला एका राक्षसाला मारायला एक अस्त्र हवं होतं. त्याला सांगण्यात आलं की, दधिची ऋषीच्या हाडापासून तयार झालेल्या अस्त्रानेच तो राक्षस मरेल. दधिची ऋषीने इंद्राला आपली हाडं दिली. पॅडीनेही तेच केलं. त्याने दिलीपला आपला डावा हात दिला. ४३ षटकं त्या हाताने टाकली. दोन बळी घेतले. त्यातला विश्वनाथचा बळी मी विसरणार नाही. उंची दिलेल्या चेंडूवर विश्वनाथने कव्हर्समध्ये झेल दिला. जगातल्या एका श्रेष्ठ फलंदाजाला ४८ वर्षांच्या पॅडीने फसवलं.
त्या दधिचीचा सन्मान उशिराने का होईना, पण झाला. त्याबद्दल मंडळाचे आभार!