

महिंद्राचा आनंद पाटील स्पर्धेत ” सर्वोत्तम”!
एअर इंडियाने ” ९व्या औधोगिक राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत महिंद्रा आणि महिंद्रा या संघाचा ५२-३० असा पाडाव करीत अंतिम विजेतेपदाचा चषक व रोख रु. २,००,०००/-(₹ दोन लाख )आपल्या नावे केले.उपविजेत्या महिंद्राला रोख रु.१,००,०००/-(₹ एक लाख)व उपविजेत्या चषकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत “सर्वोत्तम” ठरला तो मात्र महिंद्राचा आनंद पाटील. त्याला ” महिंद्रा ज्युपिटर” देऊन सन्मानित करण्यात आले. एअर इंडियाचे या स्पर्धेतील हे तिसरे जेतेपद. पिंपरी-चिंचवड या पहिल्या स्पर्धेत त्यांना हे यश मिळाले होते,त्यानंतर अमरावती येथे झालेल्या स्पर्धेत त्यांना दुसऱ्यादा हि संधी प्राप्त झाली. होसंगाबाद मध्य प्रदेश येथे झालेल्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने सुरुवाती पासूनच आक्रमक खेळ करीत पूर्वार्धातच २४-१३ अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने आगेकूच सुरु केली होती. दोन्ही संघ मुंबई-महाराष्ट्र येथील असल्यामुळे एकमेकांच्या ताकदीचा त्यांना अंदाज होता. त्यामुळे एअर इंडियाला हा विजय सोपा गेला. अजय ठाकूर,राहुल चौधरी यांच्या चढाया त्याला टी. विजयनची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय सहज शक्य झाला. आनंद पाटील, ओमकार जाधव,स्वप्निल शिंदे यांचा खेळ महिंद्राचा पराभव टाळण्यात कमी पडला. महिंद्रा या स्पर्धेत दोन वेळा अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली होती. पण दोन्ही वेळा त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली.स्पर्धेत उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकडीचा खेळाडू म्हणून अजय ठाकूर व टी. विजयन हे दोन्ही एअर इंडियाचे खेळाडू ठरले.
दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. ११,०००/-(₹ अकरा हजार) देऊन गौरविण्यात आले. एअर इंडियाच्या राहुल चौधरीला आकर्षक खेळाडू म्हणून रोख रु. ११,०००/-(₹ अकरा हजार) देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा दिल्यामुळे स्पर्धेत चुरस पहावयास मिळाली.
या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीत एअर इंडियाने इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाचा तर महिंद्राने ओ. एन.जी.सी.चा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी रोख रु.५०,०००/-(₹पन्नास हजार) व चषक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत २१ व्यावसायिक संघांनी सहभाग घेतला होता.या संघाची ४गटात विभागणी करण्यात आली होती. या चार गटातील प्रत्येक गटातून दोन अशा आठ संघांनी बाद फेरी गाठली होती.
Attachments area