Cricket with Dwarkanath Sanzgiri-22.1.17

अलीकडे अश्वमेध यज्ञ नसतो. त्यामुळे अश्वमेधाचा घोडा कुणी सोडत नाही. पण आपण द्वापारयुगात असतो तर असं म्हटलं गेलं असतं की विराट कोहलीने अश्वमेधाचा घोडा सोडलाय आणि किमान भरतभूमीत तो अडवण्याची हिंमत कुणाची नाही. हिंदुस्थानमधील हिंदुस्थानी फलंदाजी पाहिली की वाटतं आपल्या संघात किमान चार-पाच मॅचविनर आहेत. त्यात विराट बाहुबली. पण विजयाच्या पाऊलवाटेवर विराट पडला तरी केदारमध्ये बाहुबली कायाप्रवेश करतो आणि अशक्य वाटणारा विजय इतका सोपा वाटतो की दादरला विरार लोकलमध्ये शिरणं जास्त कठीण वाटावं. कालपरवा तर 3 बाद 24 आणि विराट गेला. म्हणजे इंग्लंडच्या कर्णधाराला असा आनंद झाला असावा जेव्हा नॉटिंगहॅमच्या मेयरला रॉबीनहूड सापडल्यावर झाला असता. तेवढय़ात युवराजचं चक्क पुनर्जीवन किंवा एकदम योग्य शब्द वापरायचा तर रिसरेक्शन झालं. अगदी येशू ख्रिस्ताच्या थाटात आणि धोनीलाही वाटलं की त्याच्या चाहत्यांना थोडं भूतकाळातून फिरवून आणावं.
2011 पूर्वीचा युवराज हा वन डेतला एक महान फलंदाज होता. मॅचविनर तर तो होताच, पण त्याची फलंदाजी स्कोअरबुकात विजयाची फक्त नोंद करणारी नव्हती. सौंदर्यासाठी भुकेल्या डोळय़ासाठी ते सेव्हन कोर्स डिनर वाटायचे. त्यात त्याचे ड्राइव्हज म्हणजे रेसट्रकवरची फेरारी. पण असं वाटायचं की बॅट फक्त फुंकर मारतेय. डावखुरे फलंदाज आकर्षक वाटतातच. त्यात उंचपुरे आणि ज्यांची बॅकलिफ्ट मोठी आहे त्यांना पाहताना ते ड्राइव्हज राजेशाही वाटतात. युवराजकडे ते होते. 2002 साली लॉर्डस्वर इंग्लंडला हरवताना आपण जो 325 धावांचा पाठलाग केला तेव्हा युवराज डावखुऱया फलंदाजांमधला ‘युवराज’ वाटावा अशी फलंदाजी करून गेला. लॉर्डस्वरून परतताना तिथला एक ऐंशीच्या पलीकडे आलेला म्हातारा मला म्हणाला, ‘पोराने फ्रॅन्क वुलीच्या आठवणी जाग्या केल्या.  फ्रॅन्क वुली हे भूतपूर्व काळातल्या इंग्लिशमनसाठी डावखुऱया फलंदाजीतली कांचनजंगा! युवराजने त्याला भावनाविवश करून टाकलं होतं. 2011 च्या विश्वचषकात तो असा खेळला की वर्ल्ड कप जिंकण्यासाठी त्याने चाणक्याप्रमाणे शेंडीला गाठ मारलीय. त्याची बॅट हा त्याचा चंद्रगुप्त होता. पण त्यानंतर अचानक नियतीलाच त्याचा हेवा वाटायला लागला. नियती क्रूर झाली. कॅन्सरसारख्या आजाराने त्याला घेरले. तो कडवटपणे लढला. कॅन्सरमधून बाहेर आला, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणं सोपं नसतं. त्यात त्याच्यातला तो स्टॅमिना, ते रिफ्लेक्सेस, तो आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटला. त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणं लखलखतं नव्हतं. डळमळतं होतं. नियतीने त्याचं शरीर कॅन्सरच्या क्रुसावर लटकवून त्याची गुणवत्ता पोरकी केली असं वाटलं. युवराजला घेऊन कशाला उगाच घडय़ाळाचे काटे उलटे फिरवले जातायत असंही वाटलं, पण कटकची खेळी हे युवराजच्या शारीरिक क्षमतेचं आणि गुणवत्तेचं रिसरेक्शन वाटलं. जणू 2011 नंतर मधल्या काळातही घडलंच नाही. दीर्घ विश्रांती घेतली आणि ताजातवाना होऊन तो बाहेर पडला. त्याला सुरुवातीला त्याच्या लाडक्या ड्राइव्हसाठी चेंडू मिळाले आणि सिनेमात वयस्कर हीरो फ्लॅशबॅकमध्ये जातो, तरुण होतो तसा युवराज फ्लॅशबॅकमध्ये गेला. त्याला फ्लॅशबॅकमध्ये जायला खेळपट्टी आदर्श होती. मोठय़ा खेळीला वाव होता आणि इंग्लिश गोलंदाजी त्याचे ड्राइव्हज पाहायला उतावीळ वाटत होती. आठवण झाली तेव्हा काही उसळते चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. पण उसळत्या चेंडूला खेळपट्टीची साथ नसते तेव्हा असे चेंडू युवराजसाठी पुल-टुलचा खुराक असतो.
समोर धोनीने आधी स्वतःकडे पॅसेंजर ट्रेनची भूमिका घेतली. एकेरी धावा घेऊन युवराजला स्ट्राइक दिला. त्यालाही जाणवत होतं की दुष्काळानंतर आलेल्या पावसात नदीने दुथडी भरून वाहावं तशी युवराजची बॅट वाहतेय. तो सेट झाला. मग दोन्ही बाजूंनी आक्रमण सुरू झालं. धोनीची पॅसेंजर बघता बघता दख्खनची राणी झाली. शेवटी धोनीने त्याचा स्ट्राइक रेट आपल्या लौकिकाजवळ आणून ठेवला. धोनीची ही जुनी खासियत. धोनी असाच पुढेही भूतकाळातच रमला तर बरं होईल.
पण एक गोष्ट शेवटी जाणवली. वन डेत अलीकडे 381 धावा हा मोक्ष नाही. खोलवर फलंदाजी करणारी इंग्लंड, कर्णधार मॉर्गनचं शतक आणि इतरांच्या साथीने जवळपास विजयाच्या दारापर्यंत पोहोचली होती. जाडेजाने कंजूष गोलंदाजी टाकून, अश्विनने विकेटस् घेऊनही विराट कोहलीने शेवटी शेवटी काही केस काळजीने गमावले. शेवटच्या काही षटकांत भुवनेश्वर कुमारने विविध चेंडूंची भेळ पेश केली नसती किंवा मॉर्गन धावचीत झाला नसता तर 381 धावाही अपुऱया ठरल्या असत्या. म्हणून वन डेत प्रत्येक धाव महत्त्वाची! म्हणून 15 धावांनी जिंकल्यावर शिखर धवनच्या 15 धावाही महत्त्वाच्या! सध्या त्याच्याकडे दुसरं मिरवायला काय आहे? अजिंक्य रहाणेच्या आशा पुन्हा पालवल्या असाव्यात.

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons