धोनीने काळाची पावले ओळखली – द्वारकानाथ संझगिरी
महेंद्रसिंग धोनीने नेतृत्वाचे कपडे इतक्या अचानक उतरवले की सलमान खानसुद्धा सिनेमात गंजी फ्रॉक काढताना जास्त विचार करीत असावा. क्षणभर मलाही कौतुक वाटलं – ‘व्वा! खुर्चीचा जरासुद्धा मोह नाही!’ पण मग अनेक प्रश्न निर्माण होतात. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डेसाठी फक्त आठवडा असताना त्याला का खुर्ची सोडावीशी वाटली? क्रिकेट नियामक मंडळावर जो शिस्तीचा बडगा सर्वोच्च न्यायालयाने उचलला त्यानंतर धोनी अचानक एखाद्या बोधीवृक्षाखाली जाऊन बसला का? मला वाटतं धोनीचं कौतुक हे आहे की त्याने काळाची पावलं ओळखली. अचानक कुणाच्या तरी पावलाचा आवाज त्याला भिववायला लागला. क्रिकेट मंडळातला कुठला तरी आधारवड कोसळल्याची भावना त्याला झाली असावी.
धोनी हा कसोटीतला ‘चांगला’ फलंदाज-यष्टिरक्षक होता. पण वन डे आणि टी-20त ‘महान’ हे विशेषण त्याच्यातल्या फलंदाज-यष्टिरक्षकाला लावावेच लागेल. थोडे फार जे काही अस्सल मॅचविनर्स वन डे, टी-20त मी पाहिले त्यात धोनी एक नक्की आहे. पूर्वी 30 चेंडूंत 50-55 धावा जिंकायला हव्या आहेत आणि धोनी आहे ही एकमेव गोष्ट फटाके आणायला पुरेशी होती. त्याचं ते विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अचानक वरच्या क्रमांकावर येऊन विजयाचा कळस उभारण्याची संधी न सोडणं! त्याने इतक्या सहजतेने ते केलं की, पाठीवर पृथ्वी उचलणाऱया ग्रीक ऍटलासलाही त्याच्या जबाबदारी उचलायच्या सहजतेला सलाम ठोकावा वाटला असता. नेतृत्वातलं त्याचे निर्णय आणि टायमिंग काही वेळा इतके धक्कादायक होते की, इंदिरा गांधी किंवा नरेंद्र मोदीही विस्मयचकित झाले असते. काही निर्णयाच्या बाबतीत धोनीचं नशीब काहीवेळा एवढं चांगलं होतं की, तो पंतप्रधान असता आणि त्याने शंभराची नोटसुद्धा रद्द केली असती तरी यशस्वी झाला असता. वन डेतलं त्याचं कर्णधार म्हणून निर्णय आणि त्याचं यश त्यामुळे महानतेवरचा त्याचा हक्क कुणी नाकारू शकत नाही. कसोटी कर्णधार म्हणून मला तो कधी असामान्य वाटला नाही.
पण अलीकडच्या भूतकाळात एक-दोन अपवाद वगळता त्याचे काही निर्णय अंगाशी आले. 2007 साली टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात त्याने ज्या जोगिंदर सिंगच्या हातात शेवटची ओव्हर दिली तेव्हा स्वर्गात फ्रँक वॉरेल, सी. के. नायडू, लाला अमरनाथनेसुद्धा डोक्यावर ठेवायला बर्फ मागितला असेल, पण त्या एका षटकाने हिंदुस्थानी क्रिकेटचं, धोनीचं आणि जोगिंदर सिंगचं आयुष्य पालटलं. पण असा प्रत्येक निर्णय यशस्वी होत नाही. गेल्या काही त्याच्या नेतृत्वाखालच्या सामन्यांत त्याचे असे निर्णय अंगाशी आले. त्यात आता तो पूर्वीप्रमाणे हुकमी मोठे फटके चांगल्या चेंडूवर मारू शकत नाही. पूर्वी चेंडू चांगला की वाईट हे त्याची बॅट ठरवायची, चेंडू नाही. आता काहीवेळा त्याची बॅट चेंडूपुढे हाणामारीच्या षटकांत नतमस्तक होते. धोनीला याचीही जाणीव आहे की अजून वर्ल्ड कपला दोन वर्षे आहेत. तोपर्यंत कसोटी क्रिकेट न खेळता वन डे, टी-20वर फॉर्म टिकवणं सोपं नाही. मॅचेस हरल्यावर नेतृत्व सोडण्याचा दबाव येऊ शकतो. बिशनसिंग बेदी, गावसकर, कपिलदेव, सचिनसारखे देव्हाऱयातले देवही मर्त्य मानवासारखे खुर्चीवरून ढकलले गेले आहेत. धोनी हा काही परशुरामासारखा चिरंजीव नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीची सावली आता महाकाय होतेय. क्रिकेटमध्ये धोनीला राहुल गांधीसारखा प्रतिस्पर्धी असता तर त्याने कधीच नेतृत्व सोडलं नसतं. हिंदुस्थानला पर्याय शोधायचा नाहीए, पर्याय फक्त मुकुटाची वाट पाहतोय.
त्यामुळे स्वाभिमानी धोनीने योग्य मार्ग स्वीकारला. नेतृत्वाची वस्त्र्ा ही कवचकुंडलासारखी असतात. ती द्रविडने अचानक काढून टाकली आणि द्रविड आधारहीन झाला होता. धोनीला ते सांभाळावं लागलं. कारण भीष्मासारखा इच्छामरणी फक्त सचिन होता. धोनी तेवढा मोठा नाही.