Cricket with Dwarkanath Sanzgiri

विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडला हिंदुस्थानने चिरडलं. त्या चिरडण्यात विराट कोहली नावाचा रणगाडा महत्त्वाचा ठरला. ज्या खेळपट्टीवर पहिल्या डावातला पुजारा सोडला तर इतरांना खेळपट्टीने केलेली बेइज्जती झेलत खेळावं लागतं होतं तिथे विराट कोहलीसाठी खेळपट्टी स्वत:हून संगमरवर होते की काय अशी शंका येत होती.

 सुनीलनंतर कोण, असा प्रश्नत मनात येत असताना सचिनचा उदय झाला. सचिननंतर ‘कुणाला पाहायला आता पैसे मोजून स्टेडियमवर जायचं?’ असं वाटत असताना, विराट कोहली त्याच्या ‘विराट’ या नावाला जागायला लागला. आज क्रिकेटची नाक्यानाक्यावरची चर्चा बंद झालीए. संघ जिंकल्यावर फटाक्यांचा आवाज येत नाही. हा नोटबंदीचा परिणाम नाही.अति क्रिकेटचा हा परिणाम आहे. पण संघात, चाहत्यांनी ‘पे्रमात पडावं’ अशी व्यक्तिमत्त्वंसुद्धा कमी झाली आहेत. विराट कोहली हे एकमेव असं व्यक्तिमत्त्व सध्या संघात आहे की ज्याच्यासाठी क्रिकेटप्रेमी कदाचित पैसे टाकून मॅचला जातील. सुनील गावसकरच्या काळात राज्य सुनीलच्या बॅटचं असलं तरी विश्वठनाथची बॅटिंग पाहण्यासाठी मी ठणठणीत बरा असताना अनेकदा ‘सिक लिव्ह’ टाकलीय. आजही ‘सुनील श्रेष्ठ की विश्वणनाथ’ या प्रश्नााचं उत्तर देताना मन ठामपणे मत व्यक्त करत नाही. बरं, नंतरच्या काळात कपिलदेव हे सुनीलइतकंच लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होतं. सचिनच्या काळात, एक नव्वदीच्या दशकातला काही काळ सोडला तर नंतर चार महत्त्वाची व्यक्तिमत्त्वं उभी राहिली. ‘राहुल द्रविड’ सुरवातीला युगे अठ्ठावीस एकोणतीसवर उभा वाटला तरी नंतर त्याचं रूपांतर ‘विठ्ठलात’ झालं. काही मंडळींना सचिनपेक्षा द्रविड मोठा फलंदाज वाटायला लागला. सेहवागला पाहताना पापणी मिटली तरी चिडचिड व्हायची. एखादी बाऊंड्री चुकली तर? लक्ष्मणावरही आपलं रामाएवढंच प्रेम होतं, किंबहुना तो खेळत असताना मित्राकडून आणखी दोन डोळे उसने घ्यावेत असे वाटायचे. ‘दादा’ गांगुलीचा एक वेगळाच चाहतावर्ग होता. आणि तो सर्व बंगाली नव्हता. मी बंगाली नाही. ब्रह्मदेवालाही निर्मितीचं काम थांबवून गांगुलीचे ऑफ ड्राइव्हज् पाहायची इच्छा झाली असती. आजच्या संघाकडे पाहताना विराट सोडून असं कुठलं व्यक्तिमत्त्व दिसतं की जे पाहायला तुम्ही प्रेयसीची अपॉइंटमेंट सोडून जाल? गोलंदाज अगदी शेन वॉर्नच्या दर्जाचा असल्याशिवाय तो ‘प्रेक्षणीय’ होत नाही. मी शाळेत असताना रमाकांत देसाईची गोलंदाजी पाहायला जात असे. रमाकांतचा, रनअप अॅेक्शन आणि त्याने उडवलेली दांडी पाहणं हा वैजयंतीमालाच्या नाचासारखा कलात्मक आनंद वाटायचा. लिली, मार्शल, थॉमसन,ट्रुमन, हॉल अगदी शोएब याच्या गोलंदाजीवर आणि व्यक्तिमत्त्वावर प्रेम बसावं अशी ताकद त्यांच्यात होती. पण गोलंदाजांना ‘पाहायला’ गर्दी क्वचित होते. अश्विणन हा आजचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे; पण मला अश्वि नने फ्री पास दिल्याशिवाय मी अश्विानला पाहायला जाणार नाही. जाडेजाचा मी नातेवाईक असलो तरी मी केवळ त्याच्यासाठी मॅचला जाणं टाळलं असतं. आज पुजारा फॉर्मात आहे. दुसर्याा कसोटीच्या पहिल्या डावात तो खूप सुंदर खेळला; पण पुजारा खेळतोय म्हणून मैदानावर जाणं जाऊ देत, टीव्हीच्या बटणाकडेही मी धाव घेत नाही. जी इमोशनल गुंतवणूक पूर्वी गावसकर, कपिल, विश्व नाथ, सचिन, सेहवाग वगैरेमध्ये होती, तशी हळूहळू विराटच्या बाबतीत व्हायला लागली आहे. आजच्या पिढीची तर नक्की असेल. मी अशा गुंतवणुकीच्या पलीकडे गेलोय. क्रिकेटकडे बघणं व्यावसायिक झालं की पूर्वीचे काही आनंद संपतात. विशेषत: कुणाच्या तरी यशापयशात जीव गुंतणे… कविता अभ्यासक्रमात आलं की असंच व्हायचं. विराट कोहली मात्र सध्या एकमेव फलंदाज आहे, ज्याच्याकडे ‘क्लास’ आहे आणि मागे ‘मास’ (जनताजनार्दन) आहे. तांत्रिकदृष्ट्या त्याच्यापेक्षा कदाचित इंग्लंडचा ज्यो रूट जास्त सक्षम आहे; पण विराट सध्या एकमेव हुकूमशहा वाटतो. अर्थात फलंदाजीतला. इंग्लंडमध्ये झालेल्या खोल जखमेची खपली कधीच भरली नव्हती; पण ती वाहणारी जखम विराटला सूडाची आठवण करून देत असावी. जोपर्यंत इंग्लिश वातावरणात विराट धावा करत नाही तोपर्यंत ती जखम वाहतच राहणार… त्यावर खपली धरणार नाही, पण इंग्लंडविरुद्धचं हिंदुस्थानातलं आव्हानही कमी नव्हतं. पहिल्या कसोटीच्या दुसर्यार डावात त्याने फिरणार्याी खेळपट्टीवर मॅच वाचवण्याचा दबाव लहान मूल अंगावर खेळवावं तसा खेळवला. त्याच्या टेंपरामेंटचा त्यात जेवढा मोठा वाटा होता तेवढाच तंत्राचाही होता. माझा मित्र विजय लोकापल्लीच्या विराटवरच्या पुस्तकात सेहवाग म्हणतो, ‘‘विराट ‘दलदलीत’सुद्धा धावा करू शकेल.’’ ते त्याने विशाखापट्टणमला दाखवलं. खेळपट्टी ‘दलदल’ नव्हती; पण चेंडूचं फिरणं, उसळणं चेंडू खाली राहणं यात खेळपट्टीची हुकूमशाही होती. ती फटकेबंदीचा निर्णय घेत होती आणि फलंदाज ‘यस सर’ म्हणत होते. एकट्या विराटने (पुजाराचा पहिल्या डावाचा अपवाद वगळता) ही हुकूमशाही मोडून काढून स्वत:च्या बॅटची हुकूमशाही लादली. त्यात सर्व प्रकारचे फटके मारले. खरं तर विराटची ग्रिप ही ऑनच्या फटक्यासाठी सुयोग्य आहे. विशेषत: खालच्या हाताची पकड. तरीही त्याच्या फटक्यापैकी पंचवीस टक्के कव्हर ड्राइव्हज् असतात. त्याचा बॅट स्पीड आणि लवचिक मनगटाचा वाट मोठा आहे. अझरची ग्रिप साधारणपणे अशी होती. मोठे फलंदाज तंत्राचे गुलाम होत नाहीत. तंत्रांना गुलाम करतात. सचिनची ग्रिप पाहून मुंबईतल्या सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाने मला सांगितले होते. ‘‘याला ड्रायव्हिंग कठीण जाईल.’’ एक मोठा माजी फलंदाज म्हणाला होता, ‘‘सचिन कव्हर्समध्ये झेल खोलून देणार.’’ तिथल्या क्षेत्ररक्षकांनी पंचवीस वर्षे वाट पाहिली, पण झेल आलाच नाही. विराटचंही तसंच आहे. त्याला इंग्लंडने ऑफला खेळवलं. त्याने ऑफ मिडलवर पवित्रा घेऊन लीलया फटके मारले. खरं सांगू, मला हुकूमशाही आवडत नाही. त्यामुळे उरलेल्यांमधून आणखी एक-दोन ‘व्यक्तिमत्त्वं’ निर्माण व्हावीत अशी इच्छा आहे. पण इच्छापूर्ती कधी होईल देव जाणे. तोपर्यंत विराटची हुकूमशाही सुरू राहील. किमान क्रिकेटमध्ये तरी हुकूमशाही लोभसवाणी वाटू शकते हे विराट दाखवतोय.
द्वारकानाथ संझगिरी.

SPORTSNASHA

www.sportsnasha.com is a venture of SRC SPORTSNASHA ADVISORS PVT LTD. It is a website dedicated to all sports at all levels. The mission of website is to promote grass root sports.

Show Buttons
Hide Buttons